धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी मंगळवारी (ता.१४) सकाळी पदाची सूत्रे स्वीकारली. ‘‘केंद्र आणि राज्याच्या योजना शेतकऱ्यांच्या दारात पोहोचविण्यासाठी झटून काम करू,’’ असा निर्धार नव्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
dhiraj kumer
dhiraj kumer

पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी मंगळवारी (ता.१४) सकाळी पदाची सूत्रे स्वीकारली. ‘‘केंद्र आणि राज्याच्या योजना शेतकऱ्यांच्या दारात पोहोचविण्यासाठी झटून काम करू,’’ असा निर्धार नव्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे.  भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र संवर्गाच्या २००५ च्या तुकडीतील धीरज कुमार या आधी उत्तर प्रदेशच्या समाज कल्याण मंत्रालयात कार्यरत होते. कृषी व ग्रामविकासात विशेष रुची असलेल्या नव्या आयुक्तांना विदर्भातील शेती प्रश्नांची चांगली जाण आहे.  कृषी आयुक्तपदावरून सुहास दिवसे यांची पीएमआरडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारिपदाची बदली झाल्यानंतर एका दिवसात कायमस्वरूपी नवा आयुक्त मिळाल्याने आयुक्तालयातील संभ्रम दूर झाला.  कानपूर आयआयटीमधून विद्युत अभियांत्रिकीमध्ये बी. टेक पदवी घेतलेल्या धीरज कुमार यांनी २००५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर २००७ मध्ये ते अकोला येथे सहायक जिल्हाधिकारी बनले. २००८ मध्ये ते वर्धा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारीपदावर कार्यरत होते. नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हाधिकारी तसेच शिक्षण आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या धीरज कुमार यांनी २००१७ पासून त्यांच्या मूळ भागात म्हणजेच उत्तर प्रदेशात काम करण्याचा निर्णय घेतला.  मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची राजवट बदलून योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर प्रशासनात मोठे बदल केले गेले होते. महाराष्ट्रातून प्रतिनियुक्तीवर धीरज कुमार यांना योगी सरकारच्या प्रशासन व्यवस्थेत पाठविले गेले. तेथे त्यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्य कृषी उत्पादन बाजार समिती मंडळाचे संचालकपद देण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ते समाज कल्याण मंत्रालयात विशेष सचिवपदी कार्यरत होते.  उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर भागातील धीरज कुमार हे मूळ शेतकरी कुटुंबातूनच पुढे आलेले आहेत. धान उत्पादन कामकाजाशी त्यांचा जवळून संपर्क आलेला आहे. ‘‘उत्तर प्रदेशातील शेती धान तसेच इतर मर्यादित पिकांभोवती असून महाराष्ट्रात विविध पिकांमुळे कृषी क्षेत्र आव्हानात्मक बनले आहे. नव्याने तयार होत असलेल्या शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) धोरणांवर राज्यात खूप चांगले काम करता येईल. शेतकऱ्यांना बाजाराशी संलग्नता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच प्रक्रिया क्षेत्रात देखील काम करण्यास भरपूर वाव आहे,’’असे नव्या आयुक्तांनी स्पष्ट केले. 

जबाबदारी आव्हानात्मक; पण पार पाडू  ‘अॅग्रोवन'शी बोलताना धीरज कुमार म्हणाले की, ‘‘राज्याचा कृषी विभाग खूप मोठा आहे. त्यामुळे जबाबदारी देखील आव्हानात्मक आहे. मात्र, ती कसोशीने पार पाडू. शासकीय धोरण आणि योजना शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा निर्धार आमचा आहे. अलिकडेच केंद्र शासनाने कृषी विषयक अनेक महत्त्वाचे धोरणात्मक बदल केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अभ्यास आणि कष्ट घेण्याची तयारी आमची आहे. राज्याच्या देखील अनेक चांगल्या योजना असून त्याचे बळकटीकरण करणे आणि त्या गावपातळीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com