अथर्व कंपनी चालवणार दौलत साखर कारखाना

अथर्व कंपनी चालवणार दौलत साखर कारखाना
अथर्व कंपनी चालवणार दौलत साखर कारखाना

कोल्हापूर : दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निविदेची २५ टक्के म्हणजेच १६ कोटी, ८२ लाख इतकी रक्कम अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जिल्हा बँकेत जमा केली. तसेच, या कंपनीने व्याजापोटी चार कोटी पाच लाख रुपयांचा धनादेशही जिल्हा बँकेच्या ताब्यात दिला आहे. आता या पुढील काळात दौलत कारखाना ही कंपनी चालवणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्युट्रियंटस कंपनीने चालविण्यासाठी घेतला होता. परंतु, या कंपनीने करारातील अटी शर्तीप्रमाणे रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा केली नाही. त्यामुळे २१ डिसेंबर २०१८ ला बँकेने या साखर कारखान्याचा ताबा स्वतःकडे घेतला. त्यानंतर हा साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी चार जानेवारी २०१९ रोजी बँकेने जाहिरात प्रसिद्धीला देऊन निविदा मागविल्या. त्यानुसार अथर्व इंटर ट्रेड प्रा लिमिटेड या कंपनीने ३९ वर्षे कालावधीसाठी निविदा भरली. अर्थात सर्वात कमी कालावधीची निविदा ही अथर्व कंपनीची असल्यामुळेच बँकेने हा साखर कारखाना या कंपनीला चालविण्यास देण्यासाठीचा निर्णय एकमताने घेतला. 

त्यानुसार बँकेचे संचालक मंडळ आणि कंपनीमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार ता. ३१ मार्च २०१९ अखेर निविदेपैकी २५ टक्के रक्कम आणि व्याजाची रक्कम भरण्याची सूचना बँकेने या कंपनीला केली होती. त्यानुसार अथर्व कंपनीने २५ टक्के रक्कम व एवढ्या व्याजाचा अलाहिदा धनादेश बँकेकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, चंदगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने या निविदा प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही सुनावणी १ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. दरम्यान, व्याजाच्या रकमेचा धनादेशही अथर्व कंपनी न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहून बँकेकडे जमा केलेला आहे. 

शेतकरी, कामगारांना मिळावा न्याय दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीत चंदगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व केडीसीसीचे संचालक राजेश पाटील यांना बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात यावी व बँकेच्या हिताच्या विरोधात कोणतीही कृती करू नये. तसेच दौलत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा व आपल्या भागातील शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळावा, असा विश्वास सर्व संचालक मंडळाने व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com