दुधाळ जनावरांना द्या सकस आहार

गाई, म्हशींच्या आहारात सुका वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयरित्या ठरवावे.दुधाळ गाई,म्हशींच्या आहारात एकदल, द्विदल चाऱ्याचा समावेश करावा. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे.
diet management of milch animals
diet management of milch animals

गाई, म्हशींच्या आहारात सुका वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयरित्या ठरवावे.दुधाळ गाई,म्हशींच्या आहारात एकदल, द्विदल चाऱ्याचा समावेश करावा. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. गाई, म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकाची योग्य प्रमाणात गरज असते. दूध उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार हा खूप महत्वाचा आहे. गाई,म्हशीच्या पचनसंस्थेवर गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन तिचे चारा, पाणी व इतर आहार याबाबतचे नियोजन करावे. दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते. दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात, म्हणूनच दूध निर्मितीसाठी दुधाळ गाई, म्हशींच्या आंचळामार्फत साधारणतः ४०० ते ४५० लिटर रक्ताचे अभिसरण होते. म्हणजेच गाई, म्हशीच्या रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार केले जातात. जर आपण खाद्यामार्फत अन्नघटक पुरविले नाहीत, तर जनावरे स्वतःच्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा वापरतात. शेवटी याचा एकंदरीत परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. हे सर्व टाळण्याकरिता जनावरांसाठी समतोल आहार व्यवस्थापन महत्वाचे आहे. हिरवा चारा 

  • गाई,म्हशींचे प्रकृतिमान सुधारणे, दूध उत्पादन वाढवणे आणि वाढलेले दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे असते. हिरवा चारा वाळलेला चारा व खुराक यांच्या माध्यमातून आपण जनावरांना समतोल आहाराचा पुरवठा करतो. जनावरांच्या आहारातील खुराक हा त्यांचे दूध उत्पादनावर ठरावला जातो. चाऱ्याचे प्रमाण हे त्यांच्या शारीरिक वजनानुसार ठरवितात.
  • पूर्ण वाढ झालेल्या जनावराला त्याच्या वजनाच्या ६ टक्के हिरवा चारा, १ ते १.५ टक्के वाळलेला चारा द्यावा लागतो. ३०० किलो जनावरांसाठी १८ किलो हिरवा चारा, ३ ते ५ किलो वाळलेला चारा २४ तासासाठी आवश्यक असतो.
  • चांगला पौष्टिक हिरवा चारा जनावरांना दिल्याने दूध उत्पादनात वाढ तर होते. त्याव्यतिरिक्त आलाप खुराकावरील खर्चही कमी होतो.
  • जनावरांच्या आहारात सुका वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयरित्या ठरवावे.
  • साधारणपणे ४०० किलो वजनाच्या जनावराला १२ किलो शुष्क आहार द्यावा. त्यातील दोन तृतीयांश भाग सुका वैरणाच्या आणि एक तृतीयांश हिरवा चारा स्वरूपात द्यावा. जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्रॅम पशुखाद्याची गरज असते. दुधावाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शिअम, फॉस्फरस या घटकांच्या भरपाईसाठी खाद्यासमवेत ५० ते १०० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.
  •  ६ ते ७ किलो लुसर्न चारा, बरसीम किंवा चवळी चारा जनावरांना दिल्याने आलाप वरील खर्च कमी होतो. दुधाळ जनावरांच्या आहारात एकदल, द्विदल चाऱ्याचा समावेश करावा. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यात मका, बाजरा, ज्वारी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ आणि हायब्रीड नेपियर गवताचा समावेश असतो.
  • एकदल चाऱ्यात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त तर प्रथिनांचे प्रमाण कमी असते. द्विदल प्रकारातील हिरव्या चाऱ्यात बरसीम, लुसर्न, चवळी स्टायलो, दशरथ गवत यांचा समावेश असतो. द्विदल चारा एकदल हिरव्या चाऱ्याच्या तुलनेत जास्त पौष्टिक असतो यामध्ये प्रथिने, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.
  • हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांच्या कोठीपोटातील प्रोपिऑनिक आम्लाचे प्रमाण वाढते. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते; तर उच्च गुणवत्तेच्या कोरड्या चाऱ्याने ॲसिटिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढते. यामुळे दूधातील फॅट उत्पादनात वाढ होते.
  • हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्वे अधिक प्रमाणात असतात. हिरवा चारा चिकाच्या किंवा फुलोऱ्यात असताना जनावरांना खायला द्यावा, अशा चाऱ्यातून जास्तीत जास्त अन्नघटक मिळू शकतात.
  • हिरवा चारा पालेदार असावा. हिरवा चारा व गवतामध्ये लवकर विरघळणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे जनावरांना हिरवा चारा दिल्याने रवंथ करण्याच्या प्रकियेला कमी वेळ लागतो. तसेच, पचन क्रियेमध्ये प्रोपिऑनिक आम्लाचे प्रमाण वाढते आणि मिथेन वायूचे कोठीपोटातील प्रमाण कमी होते. अप्रत्यक्षरित्या पर्यावरण संरक्षण होते. हिरव्या चाऱ्यामध्ये कॅरोटीन चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे प्रजनन क्षमता चांगली राहते.
  • वाळलेला चाऱ्याचा वापर

  • वाळलेल्या चाऱ्यामध्ये ज्वारी, मका, बाजरी यांची कडबा कुट्टी, भात पेंढा, गव्हांडा आणि पर्याय नसल्यास सोयाबीनचे कुटार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वाळलेल्या चाऱ्यात ५-१० टक्के पाण्याचे प्रमाण असते. हिरव्या चाऱ्यात ७० ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.
  • वाळलेला चारा हिरव्या चाऱ्यापेक्षा कमी पौष्टिक असतो यामुळे जनावरांना पोटभरल्याचा समाधान वाटते. सुका चारा खाल्याने दुभत्या जनावरांच्या कोठीपोटातील ॲसिटिक आम्लाचे प्रमाण वाढते. ॲसिटिक आम्ल दुधातील फॅट तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने कोरड्या चाऱ्यामुळे दुधातील फॅट चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • संपर्क - डॉ कुलदीप देशपांडे, ८७८८४४५८१२ (पशूविज्ञान आणि पशूवैद्यकीय महाविद्यालय, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com