जळगाव जिल्हा परिषदेतील कामांना आचारसंहितेची अडचण

जिल्हा परिषदेतील कामांना आचारसंहितेची अडचण
जिल्हा परिषदेतील कामांना आचारसंहितेची अडचण

जळगाव : जिल्हा परिषदेच्या विविध कामांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे अडथळे येण्याची शक्‍यता आहे. त्यात लघुसिंचन विभागाची १२ कोटी रुपयांची नियोजित कामेही रखडण्याची शक्‍यता आहे.  

लघुसिंचन विभागाने काही महिन्यांपूर्वी बारा कोटींच्या कामांचे नियोजन केले होते. पण त्या संदर्भात सदस्यांना माहिती दिली नव्हती. ही कामे रद्द करण्याचा ठराव सदस्यांनी मध्यंतरी सभेत केला होता. यातच या कामांबाबतची नेमकी माहिती मागील शनिवारी (ता. ३१ ऑगस्ट) स्थायी समितीच्या सभेत नेमकेपणाने ठेवली नाही. ही नियोजित कामे जलयुक्‍त शिवार अभियानाच्या निकषांप्रमाणे आहेत किंवा नाही याची खात्री करून द्यावी, असे सदस्यांचे म्हणणे आहे. याबाबत सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यवाही करीत आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. पुढील १०-११ दिवसांत या कामांबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर, ती रखडण्याची चिन्हे असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. 

बीओटीचा मुद्दा मागे पडणार जिल्हा परिषदेची जुनी इमारत पाडून तेथे नवी इमारत उभारण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमध्ये नियोजन सुरू आहे. परंतु आगामी निवडणुका लक्षात घेता सर्व कायदेशीर बाबी तपासून नवीन इमारत ‘बीओटी’ तत्त्वावर न उभारता त्यासाठी शासनाकडून निधी घ्यावा, असे सदस्यांचे म्हणणे आहे. तर जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील शिवतीर्थ मैदानावर व्यापारी संकुल उभारण्यासह राजकमल सिनेमागृहानजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागीदेखील नवीन इमारत बीओटी तत्त्वावर बांधण्याचा मुद्दाही निवडणुकीमुळे मागे पडण्याची स्थिती आहे. कारण या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांना विरोधक अडचणीत आणू शकतात, असे सांगण्यात आले. 

पंचायतींचा निधी अखर्चित ग्रामपंचायतींना थेट मिळणारा १४ व्या वित्त आयोगाचा निधी अनेक ग्रामपंचायतींनी खर्च केलेला नाही. याबाबत आढावा घेण्यासाठी सर्व तालुक्‍यांच्या पंचायत समित्यांना ४ ते १२ सप्टेंबरदरम्यान सीईओ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पदाधिकारी भेटी देऊन तेथे सभा घेणार आहेत. यावेळी चर्चा करून सर्व निधी मार्चपर्यंत खर्च करण्याचे नियोजन करण्याचे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठरविण्यात आले. तसेच ग्रामनिधी कर्ज म्हणून २० कोटी रुपये थकीत असून, वर्षभरात केवळ ६० लाख वसूल केले आहेत. आगामी निवडणुकांच्या धामधुमीत हा मुद्दाही मागे पडू शकतो, असे सदस्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com