शेती समस्यांसाठी डिजिटल शेती प्रकल्प देशात मार्गदर्शी ः डॉ. घोष

शेती समस्यांसाठी डिजिटल शेती प्रकल्प देशात मार्गदर्शी ः डॉ. घोष
शेती समस्यांसाठी डिजिटल शेती प्रकल्प देशात मार्गदर्शी ः डॉ. घोष

परभणी ः ‘‘शेतीमधील समस्यांची उकल करण्याच्या दृष्टीने डिजिटल शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे. सध्याच्या डिजिटल युगात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर शेतकरी, उद्योजक, तज्ज्ञांच्या सहभागातून परभणी कृषी विद्यापीठातील हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी मार्गदर्शी ठरावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. पी. के. घोष यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला मंजूर केलेल्या कृषी उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती यावरील सेंटर ऑफ एक्सलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पाच्या उद्‍घाटन कार्यक्रमामध्ये बुधवारी (ता. ४) डॉ. घोष बोलत होते.कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. प्रभात कुमार, आयआयटी खरगपूरचे डॉ. व्‍ही. के. तिवारी, आयआयटी पवईचे डॉ. अमित अरोरा, प्राचार्य डॉ. यू. एम. खोडके, अकोला कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. आर. काळबांडे, प्रकल्‍पाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. गोपाल शिंदे, माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील आदी उपस्थित होते. डॉ. घोष पुढे म्हणाले, ‘‘या प्रकल्पांमुळे डिजिटल शेतीविषयक संशोधनासाठी विद्यापीठामध्ये पायाभूत सुविधा विकसित होतील. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.’’

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध मोबाईल अॅप्स विकसित केले आहेत. त्यांचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होत आहे. डिजिटल शेती प्रकल्पामुळे शेतीविषयक समस्यांची उकल करून उपाय सुचविता येतील.’’डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘तीन वर्षे कालावधीच्या या प्रकल्पांतर्गत यंत्रमानव, ड्रोन, स्‍वयंचलित यंत्र आदी डिजिटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे.’’ विद्यार्थी तसेच संशोधक प्राध्‍यापकांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्राद्वा‍रे कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. यात डिजिटल शेतीच्‍या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाणासाठी अमेरिकेतील वॉशिंग्‍टन स्‍टेट युनिव्‍हर्सिटी तसेच स्‍पेन, युक्रेन तसेच बेलारुस येथील विद्यापीठांशी करार करण्यात आले आहेत. पवई आणि खरगपूर येथील आयआयटी संस्‍थांचे नॉलेज सेंटर म्‍हणून सहकार्य लाभणार आहे. प्रास्ताविक डॉ. खोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. तर प्रकल्‍प मुख्‍य समन्‍वयक डॉ. आर. पी. कदम यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com