थेट विक्रीचे देशी मॉडेल

थेट विक्रीचे देशी मॉडेल
थेट विक्रीचे देशी मॉडेल

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व रेसिड्यू फ्री उत्पादनांची ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपातील साखळी विकसित होत आहे. अलीकडील काळात, पुणे शहरात मेरा किसान, हेल्दी हार्वेस्ट, ऑरगॅनोबेस्ट, दी ऑरगॅनिक कार्बन, श्री स्वामी समर्थ एफपीओ, ग्रीन टोकरी आदी संस्थात्मक शेतकरी रिटेलर्स लक्षवेधी ठरत आहेत. गुलबर्गा येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत पाटील यांनी ऑस्ट्रेलियात १४ वर्षे आयटी सल्लागार म्हणून काम पाहिले. मायदेशात परतून शेती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये भारतात `मेरा किसान` या कंपनीची स्थापना केली. शेतमालाची ऑनलाइन मंडई असे `मेरा किसान`चे वर्णन करता येईल. देशातील विविध प्रकारच्या प्रमाणिकरण केलेल्या (सर्टिफाईड) सेंद्रिय मालाची शेतकऱ्यांकडून खरेदी आणि बिगबझार सारखे मॉल्स वा कंपन्यांना विक्री, ही `मेरा किसान`ची खासियत आहे. या स्वरूपात काम सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत अधिक परतावा मिळाला तर ग्राहकांच्या खर्चात १४ टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे श्री. पाटील सांगतात. शेतमाल उत्पादनापासून ते विक्रीच्या सर्व टप्प्यांवर सेंद्रिय मालाची गुणवत्ता राखण्यासाठी `ट्रेसेबिलिटी सिस्टिम` कार्यरत आहे. यात गुणवत्ता नियंत्रण आणि पडताळणी केली जाते. अलीकडेच, ऑरगॅनिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कार्यान्वित केला आहे. पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे कंपनीचे रिटेल विक्री केंद्र आहेत. आपल्या ताटातील अन्न ताजं व सुरक्षित असावं. ते कोठून, कोणी व कसे पुरवले हे कळावे; फॅमिली डॉक्टरसारखा फॅमिली फार्मर असावा; या संकल्पनेतून जयवंत पाटील यांनी दी ऑरगॅनिक काबर्न ही कंपनी आठ वर्षांपूर्वी स्थापन केली. कंपनीद्वारे सध्या दररोज पुण्यातील दीड हजार कुटुंबांना Humpy A2 या ब्रॅंडने देशी दूध पुरवले जाते. प्लॅस्टिक पिशवीऐवजी एक लिटरच्या काचेच्या बाटलीमधून दूध पुरवले जाते. कंपनी ४० शेतकऱ्यांकडून करार पद्धतीने दूध खरेदी करते. उत्पादन ते वितरणसाखळी ही मोबाईल अॅपद्वारे इंटिग्रेट केलेली आहे. पुढच्या टप्प्यात देशी तूप, गूळ, कच्च्या घाण्याचे तेल आणि आणखी उत्पादने वितरणात येणार आहेत. सेंद्रिय शेतीत ४२२ शेतकरी समूहांबरोबर सहयोग आहे. दुधासारख्या नाशवंत उत्पादनात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनचे आश्वासक उदाहरण म्हणून दी ऑरगॅनिक कार्बन कंपनीकडे पाहिले जातेय. सेंद्रिय उत्पादने ही समाजातील शेवटच्या ग्राहकापर्यंत किफायती किमतीत पोचवावीत, या सूत्रावर तुषार कदम या युवकाने ऑरगॅनोबेस्ट ही कंपनी उभी केली आहे. त्या माध्यमातून मागील दोन वर्षांत सातारा जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांना सातारा शहरात आश्वासक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. अलीकडेच, पुण्यातही कंपनीने थेट विक्री केंद्र सुरू केली आहेत. शेतकरी आणि वितरक यामधील ऑपरेटर असे नवे मॉडेल म्हणूनही ऑरगॅनोबेस्टकडे पाहता येईल. सर्व सेंद्रिय किराणामाल, ताजी फळे-भाजीपाला पुरवठा व विक्रीची अत्यंत शास्त्रीय आणि व्यवहार्य यंत्रणा उभी केलीय. ऑरगनाईज्ड रिटेलमधील सर्व प्रकारचे दोष शोधून त्यावर उपाय म्हणून पुढे येणारी ऑपरेशनल व्यवस्था उभे करण्याचे श्रेय ऑरगॅनोबेस्ट कंपनीला द्यावे लागले. स्थानिक शेतमाल स्थानिक बाजारातच अत्यंत वेगवान व किफायती किमती पोचवणे, हे ही कंपनीचे वैशिष्ट्य ठरेल. गेल्या काही दशकापासून भारत रासायनिक अंश मुक्त (रेसिड्यू फ्री) उत्पादने परदेशात निर्यात करत आहेत. मात्र, देशांतर्गत बाजारातही अशा मालाची एक मोठी रेंज उपलब्ध असणे गरजेचे आहे. पुण्यातील मगरपट्टास्थित ''हेल्दी हार्वेस्ट''मध्ये ते आता पहावयास मिळतेय. शहरी व ग्रामीण गरीब तसेच मध्यमवर्गासाठी रेसिड्यू फ्री उत्पादने पुरवणे हा तातडीचा अग्रक्रम आहे. भारतात सेंद्रिय उत्पादनांसाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहेच, पण त्यापेक्षाही मोठा वाव हा रेसिड्यू फ्री उत्पादनांसाठी आहे. सेंद्रियच्या तुलनेत रेसिड्यू फ्री उत्पादने स्वस्तही आहेत. आजघडीला भारतातील ७० टक्के ग्राहकांना सेंद्रिय उत्पादने प्रिमियम रेटमध्ये खरेदी करणे शक्य नाही. तसे रेसिड्यू फ्री उत्पादनांबाबत म्हणता येणार नाही. सेंद्रिय शेती चळवळीतील अग्रणी वसुधा सरदार म्हणतात, त्याप्रमाणे `आधी रेसिड्यू फ्री त्यानंतर नंतर सेंद्रिय आणि सर्वांत शेवटी संपूर्ण नैसर्गिक अशी टप्प्याटप्प्याने शेतमालाची बाजारपेठ विकसित होईल.` लोकांचे राहणीमान जसजसे उंचावत जाईल, उत्पन्न वाढत जाईल, तशी रेसिड्यू फ्री आणि सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढेल. या पार्श्वभूमीवर, ''हेल्दी हार्वेस्ट''ची सुरवात लक्षणीय आहे. आज एकूणच भाजीपाल्यात मंदीची लाट पाहता `रेसिड्यू फ्री`च्या रूपाने एक नियंत्रित आणि ग्राहकांसाठी सुरक्षित शेतीमालाच्या पुरवठ्याचा मार्ग खुला झालाय. त्यात शेतकऱ्यांनाही किफायती परतावा मिळण्याची हमी आहे. श्री स्वामी समर्थ कंपनीने पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरात आठवडे बाजार व्यवस्था उभारून शेतमालाच्या खपवृद्धीला एक चांगले आटउलेट दिले. भविष्यकाळात सेंद्रिय आणि रेसिड्यू फ्री उत्पादनांसाठी आठवडे बाजार हे प्रभावी माध्यम ठरू शकते. सध्याचा मुख्य प्रवाहातील शेतमाल हा संघटित आणि ब्रॅंडेड स्वरूपात पोचवण्यासाठी आठवडे बाजार सर्वात उपयुक्त आहे. ही बाब लक्षात घेऊन कंपनीने आता आठवडे बाजारात विविध देशी वाण, रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांना अधिकाधिक प्राधान्य द्यायला सुरवात केलीय. आठवडे बाजारासाठी राज्य शासन व स्थानिक यंत्रणांनी कायमस्वरूपी मोठ्या जागा आरक्षित करून उपलब्ध देणे गरजेचे आहे. सारांश, वरील पाचही उद्यमांमधून ऑर्गनाईज्ड रिटेलर्सचे देशी मॉडेल उभे राहताना दिसते आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेत शेतकरीपुत्रांचाच सहभाग आहे. सध्याचा ९९.९९ टक्के असंघटित आणि विखुरलेल्या शेतमाल बाजार व्यवस्थेतला वरीलप्रमाणे पर्याय उभा राहत आहे. या लहान-सहान पर्यायी व्यवस्थांचे इंटिग्रेशन करून मोठा पर्याय उभा करणे हेच खरे आव्हान आहे. (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com