थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा प्रयत्न 

आठ एकरमधून सरासरी दोनशे टन कलिंगड उत्पादन मला अपेक्षित होते. संपूर्ण माल घेण्याची हमी व्यापाऱ्याने घेतली होती. परंतु तत्पुर्वीच गोव्यात बंदी झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन झाले. ज्या स्टॉलवर व्यापारी माल देत होता ते स्टॉल बंद झाले. त्यामुळे व्यापारी माल घेण्यासाठी येत नाही. आत्तापर्यंत चाळीस टन माल वाया गेला. पुढच्या काही दिवसांत १२० ते १४० माल परिपक्व होणार आहे. त्याचे करायचे काय असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. - दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, ता. वैभववाडी
watermelon
watermelon

सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ येथील दीपक कासोटे यांनी आठ एकरावर कलिंगडाचे उत्पादन घेतले. पहिल्या टप्‍प्‍यात लागवड केलेल्या एक एकरमधून त्यांनी सरासरी २८ टन उत्पादन घेतले. त्याला १० रूपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे सात एकरमधून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असताना कोरोनाने होत्याचे नव्हते केले. आतापर्यंत ४० टन माल वाया गेला आहे. पण हिंमत न हारता त्यांनी थेट विक्री सुरु केली आहे. एकीकडे माल खराब होत आहे तर दुसरीकडे उर्वरित पिकावर त्यांनी फवारणी, खते द्यायची त्यांनी बंद केलेली नाहीत. 

जिल्ह्यातील गडमठ (ता. वैभववाडी) येथे भाडेतत्वावर पंधरा ते वीस एकर जमीन घेवुन कोल्हापूर जिल्ह्यातील दीपक कासोटे आणि त्यांचे कुटुंबीय शेती करतात. बीएस्सी ॲग्रीकल्चरची पदवी घेतल्यानंतर कुटुंबासोबत शेतीतच करिअर करायचे त्यांनी ठरविले. सुरुवातीला त्यांनी दहा एकरवर केळीचे पीक घेतले. परंतु केळीच्या दरातील चढउतारामुळे त्यांनी ऊस आणि कलिंगड पिके घेण्यास सुरवात केली. यंदा आठ एकरवर कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर केला. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांनी टप्प्या-टप्प्याने कलिंगड लागवड केली. आठ दिवसांच्या फरकाने एक-एक एकरमधील माल तयार होईल अशी पद्धतीने स्वतःच रोपे तयार करून लागवड केली. शेणखत, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्य, गरजेनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. त्यामुळे पीक चांगले आले. 

जिल्ह्यात सरासरी एकरी २० ते २२ टन उत्पादनक्षमता आहे. परंतु श्री. कासोटे यांनी पहिल्या एक एकरमधून २८ टन उत्पादन घेतले. सर्व माल व्यापारी घेवुन गेला. त्यानंतर १९-२० मार्चला पुन्हा व्यापारी मालाची उचल करणार होता. परंतु त्याच कालावधीत गोवा सरकारने संचारबंदी लागू केली. त्यापाठोपाठ दोन दिवसाने देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी चाळीस टनापेक्षा अधिक माल शेतातच सडण्याची प्रकिया सुरू झाली. सुरुवातीला संपूर्ण फळावर वेलांचे पांघरूण घालून फळ अधिक काळ टिकण्याचे दृष्टीने प्रयत्न केले. परंतु त्यानंतर मात्र फळे जमिनीवरच कुजू लागली. जितका माल स्थानिक पातळीवर विक्री करणे शक्य होता तितका विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 

दीड एकरमधील मालाची विक्री झाली तर दीड एकरमधील माल पूर्णपणे वाया गेला. दोन एकर जमिनीतील फळे येत्या चार-पाच दिवसांत तयार होतील तर तीन एकरातील फळे आठ ते दहा दिवसांनी परिपक्व होतील. एकीकडे अतिशय कष्टाने तयार केलेल्या बागेतील दहा-बारा किलोची शेकडो फळे सडून जात आहेत. तरीही श्री.कासोटे हिंमत हरलेले नाहीत. परंतु उर्वरित क्षेत्रातील वेलांना खते देणे, फवारणी करणे त्यांनी सोडलेले नाही. जे काही व्हायचे ते होऊ दे पण पीक अर्ध्यावर सोडायचे नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अंदाजे दीडशे टन माल उत्पादित होणार आहे. त्याची विक्री करणे हे मोठे संकट त्यांच्यासमोर आहे. परंतु ते अजिबात डगमगलेले नाहीत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com