थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती देऊन कृषिमंत्र्यांचीच दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.२५) अमरावतीत घडला. इफ्को-टोकियो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश भुसे यांनी दिले.
 थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल : ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश  Directly misled by the Agriculture Minister: Order to file a case against 'IFFCO Tokyo'
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल : ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश  Directly misled by the Agriculture Minister: Order to file a case against 'IFFCO Tokyo'

अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती देऊन कृषिमंत्र्यांचीच दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.२५) अमरावतीत घडला. या प्रकरणी इफ्को-टोकियो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.  कृषिमंत्री दादा भुसे नुकसान पाहणी करण्याकरिता रविवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी विश्रामगृहावर विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची चर्चा केली. या वेळी विमा हप्ते भरल्यानंतर देखील विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. ही बाब कृषिमंत्री दादा भुसे यांनी गांभीर्याने घेतली. तेथे उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांना विमा कंपनीचे कार्यालय कुठे आहे? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र विमा कंपनीचे पूर्वीचे कार्यालय बंद झाले असून, काही कर्मचारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बसतात, अशी माहिती कृषिमंत्र्यांना देण्यात आली. त्यावर जेथे विमा कंपनीचे प्रतिनिधी बसतात, ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जागा पाहण्याची इच्छा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कृषी विभागाचे कर्मचारी गोंधळले. त्याच वेळी इफ्को-टोकियो कंपनीचे प्रतिनिधी नितीन साळवे, त्या ठिकाणी दाखल झाले. ज्या जिल्ह्याकरिता जी कंपनी नियुक्त आहे, त्या कंपनीचे कार्यालय त्या जिल्ह्यात असावे, असा नियम आहे. तुमचे कार्यालय अमरावतीत कोणत्या भागात आहे, ते दाखवा असा प्रश्न कृषिमंत्र्यांनी साळवे यांना केला. त्यावर शहराच्या अमुक भागात आमचे कार्यालय असल्याची माहिती नितीन साळवे यांनी कृषिमंत्र्यांना दिली. त्या जागेवर जाण्याची इच्छा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केल्यावर त्यांना तिथे नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कोणतेही कार्यालय नव्हते, साधा करारनामा देखील करण्यात आलेला नव्हता. या प्रकारामुळे संतापलेल्या कृषिमंत्र्यांनी कंपनी प्रतिनिधी चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर थेट इफ्को टोकियो कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले.  दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे यांनी दर्यापूर येथे पीक नुकसान आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची माहिती दिली. नुकसानीची तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन देखील दिले. जिल्ह्यात दोघे जण पुरात वाहून गेले होते. त्या कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती देखील त्यांनी आढावा बैठकीत दिली. 

ताफा अडविण्याचा प्रयत्न 

कृषिमंत्री यांचा ताफा पाहणीसाठी जात असताना भातकुली मार्गावर भाजपचे तालुकाध्यक्ष विकास देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तो अडविण्याचा प्रयत्न केला. भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी कृषिमंत्र्यांनी करावी, असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांचा होता. या विरोधात कृषिमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी रामा, साहूर, वलगाव, खारतळेगाव, खिलोरी, दर्यापूर येथे नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी केली. ​ 

प्रतिक्रिया गेल्या हंगामात विमा कंपन्यांचा नफा ४८३४ कोटी होता. यातून उद्धव ठाकरे सरकारमधील अनेकांना वाटा मिळाला. त्यामुळेच विमा कंपन्यांची मुजोरी वाढली आहे. शेतकऱ्यांना कधीच न जुमानणारे विमा कंपनीचे प्रतिनिधी आता थेट कृषिमंत्र्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यावरून या बाबीला दुजोरा मिळत आहे. विमा योजनेवरचा शेतकऱ्यांचा विश्वास देखील उडाला असून, १३८ लाख शेतकरी विमाधारक होते. त्यांची संख्या या वर्षी ७० लाख म्हणजे अर्ध्यावर आली आहे. त्या वरूनच या योजनेच्या वाटचालीची एकूण स्थिती लक्षात येते.  -डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com