‘नाणार’बाबत समन्वयातून तोडगा : मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : नाणार (जि. रत्नागिरी) येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिक, सहकारी पक्ष, विरोधी पक्ष सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयाने चर्चा करूनच तोडगा काढला जाईल. हा प्रकल्प लादला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतरही विधानसभेत ‘नाणार’चा पेच कायम राहिला. नाणार प्रकल्प तसेच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा लावून धरली. कामकाज तीन वेळा तहकूब करूनही गोंधळ कायम राहिल्याने शेवटी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. ‘नाणार’च्या मुद्यावर  शुक्रवारी (ता.१३) सलग तिसऱ्या दिवशी विधानसभा ठप्प झाली.

प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘नाणार’चा मुद्दा उचलून धरला. विधानसभेत गेले दोन दिवस नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन करावे, अशी मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की देशाच्या इंधन सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सागरी किनारपट्टीवर मेगा रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्याने या रिफायनरीसाठी मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्राला हा प्रकल्प मिळाला. तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला हा प्रकल्प ग्रीन रिफायनरी असून यासाठी उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. सिंगापूर येथे असाच प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे प्रदूषण होत नाही. नाणार येथील स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटनांच्या प्रकल्पाबाबत प्रदूषण व अन्य बाबींविषयी असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी पवई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केली आहे. 

यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण तसेच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करत नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी कायम ठेवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com