अॅग्रोवन वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी पुण्यात चर्चासत्र

अॅग्रोवन वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी पुण्यात चर्चासत्र
अॅग्रोवन वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी पुण्यात चर्चासत्र

पुणे : शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती, ज्ञान-तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती देत शिवारात कष्टाने फुलणाऱ्या यशोगाथा सांगत सरकार दरबारी सडतोडपणे शेतीच्या व्यथा मांडणाऱ्या ''अॅग्रोवन''च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने ''जपाल माती, तर पिकतील मोती'' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी दुपारी चार वाजता होणाऱ्या या अभ्यासपूर्ण चर्चासत्रात प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे आणि डॉ. अजितकुमार देशपांडे असे मान्यवर शेतकरी आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त वीस एप्रिलपासून तीन दिवस विशेषांक प्रकाशित केले जाणार आहेत.   गावकुसातील शेतीचे प्रयोग आणि व्यथांपासून ते जगभरात सुरू अत्याधुनिक शेती संशोधनाची सखोल माहिती बांधावर पोचवत ग्रामविकासाचा वसा घेतलेला शेतकऱ्यांचा सच्चा मित्र ''अॅग्रोवन'' येत्या २० एप्रिल रोजी चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्याचबरोबर ''अॅग्रोवन''ने २०१८ हे वर्ष ''जमीन सुपीकता वर्ष'' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे जमीन सुपीकतेच्या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून पुण्यात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जमिनीची सुपीकता खालावत असून, त्यामुळे शेती व्यवसायाबरोबरच अन्नसुरक्षाही धोक्यात आल्याचा इशारा दिला जात आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हा धोका ओळखूनच ॲग्रोवनने या विषयात पुढाकार घेतला आहे. आज मातीला निरोगी ठेवले तरच धान्यरुपी मोती शेतकऱ्यांना भविष्यात मिळत राहतील, असा संदेश त्याद्वारे राज्यभर पोचविण्याचा हेतू आहे.    जमीन सुपीकतेवर होणाऱ्या या विशेष चर्चासत्रासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अॅग्रोवन व सकाळ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.  ज मिनीच्या सुपीकतेसाठी आपल्या जीवनाची अनेक वर्षे तन्मयतेने गुंतवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेल्या चार महनीय तज्ज्ञ शेतकऱ्यांचे विचार ऐकण्याची संधी अॅग्रोवन वर्धापन दिन आयोजित जपाल माती, तर पिकतील मोती या चर्चासत्राच्या निमित्ताने मिळणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी (ता. १७) दुपारी चार वाजता हे चर्चासत्र होत असून, ते शेतकऱ्यांसाठी विनामूल्य खुले असेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने प्रवेश दिला जाईल.  

फुकुओकापासून प्रेरणा घेणारे सुभाष शर्मा सुभाष शर्मा ः सुभाष शर्मा हे विदर्भातील असून बी. कॉमपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता १९७५ मध्ये वडिलोपार्जित शेतीची सूत्रे हाती घेतली. सुरवातीला रासायनिक निविष्ठांच्या वापरावर त्यांचा भर होता. जल, जंगल आणि जमीन या महत्त्वाच्या घटकांवर रासायनिक निविष्ठांचा परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात आले. तसेच रासायनिक शेती पद्धतीमध्ये खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. १९९४ साली श्री. शर्मा यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास सुरवात केली. जपानमधील मासानोबू फुकुओका यांच्या शेती पद्धतीपासून त्यांनी प्रेरणा घेतली. त्यासोबतच गुजरातमधील भास्करराव सावे यांच्या शेती पद्धतीचाही अभ्यास केला. जमिनीच्या सुपीकतेसोबत पाणी व पर्यावरणाचे शास्त्र जाणून घेत शेती व्यवस्थापनात त्यांनी बदल केले आहेत.  भूसूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे प्रताप चिपळूणकर प्रताप चिपळूणकर ः कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर बी.एस्सी.(कृषी) पदवीधर असून, १९७० पासून पूर्ण वेळ शेती करतात. जमिनीची सुपीकता जपत ऊस आणि भात पीक उत्पादनवाढीसाठी त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी चिपळूणकर यांनी १९९० पासून भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाच्या अभ्यासास प्रारंभ केला. स्वतःच्या शेतीतील प्रयोगांच्या अनुभवातून शून्य मशागत तंत्र, तण व्यवस्थापन, उपयुक्त सूक्ष्मजीव व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनावर भर देत शाश्वत शेतीचे तंत्र त्यांनी विकसित केले. राज्यभरातील प्रयोगशील शेतकरी या तंत्राचा विविध पिकांमध्ये वापर करू लागले आहेत. या तंत्राबाबत ॲग्रोवनमध्ये त्यांनी लिहिलेली लेखमालाही गाजली. त्यांनी ‘नांगरणीशिवाय शेती` हे स्व अनुभवाधारित पुस्तक लिहिले आहे.  दाभोळकरांचा वारसा चालविणारे वासुदेव काठे वासुदेव काठे : द्राक्षमहर्षी श्री. अ. दाभोळकर यांचे मार्गदर्शन वासुदेव काठे (कसबेसुकेणे, ता. निफाड, जि. नाशिक) यांना लाभले. दाभोळकर प्रयोग परिवाराचे राज्य समन्वयक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. हजारो शेतकरी या परिवाराच्या माध्यमातून शेतीतील प्रयोग व निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. वर्षातून दोन वेळा दाभोळकर प्रयोग परिवारातर्फे शेतीबाबत अभ्यासवर्ग घेतले जातात. यामध्ये शेतकरी गटांकडून केलेल्या प्रयोगांबाबत चर्चा होते. द्राक्ष शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संशोधकांना तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते. मागील तीस वर्षात काठे यांनी द्राक्षशेतीत अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांवर आधारित त्यांचे ‘द्राक्षशेतीतील ७५ प्रयोग'' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याशिवाय द्राक्षशेतीचे तंत्र आणि मंत्र, द्राक्ष उत्पादकांच्या २०० प्रश्‍नांना उत्तरे'' ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.  आंतरराष्ट्रीय मृदा संशोधक डॉ. अजितकुमार देशपांडे डॉ. अजितकुमार देशपांडे ः जमीन सुपीकता, कोरडवाहू शेती पद्धती, जल-मृद संधारण हे डॉ. अजितकुमार देशपांडे यांचे संशोधनाचे विषय आहेत. याचबरोबरीने त्यांनी शेतीसाठी खत म्हणून स्पेेंटवॉशच्या वापरावर विशेष संशोधनही केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रीय मासिकांमध्ये डॉ. देशपांडे यांचे सत्तरहून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. देशपांडे यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील दोन पुस्तके जमीन सुपीकतेविषयी आहेत. जमिनी सुपीकता, जल-मृद संधारणातील विशेष संशोधनाबाबत त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  ॲग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८  चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती  स्थळ ः टिळक स्मारक मंदिर, पुणे  दिनांक व वेळ : मंगळवार, १७ एप्रिल २०१८, दुपारी ४ वाजता  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com