पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटका

Disease-pest attacks on greener crops
Disease-pest attacks on greener crops

पुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशीराने हरभरा पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, बदलते हवामान आणि रोग-किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे पुणे जिल्ह्यात हरभऱ्यांच्या उत्पादनात ३० टक्केपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

साधारणपणे रब्बी हंगामात थंडीची सुरूवात झाल्यानंतर पेरणी केली जाते. यंदा उशीराने पडलेल्या थंडीमुळे अनेक शेतकऱ्यांनी उशीराने हरभऱ्यांची पेरणी केली. हरभऱ्यांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विजय, विशाल यासारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली. 

यंदा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली होती. यंदा पुरेसा पाऊस झाला असला तरी वेळेवर वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत. काही ठिकाणी सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी केली नाही.

थंडीमुळे हरभरा पीक जोमात येऊन या पिकांचे उत्पादनही चांगले मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परंतु यंदा शेतकऱ्यांच्या शेतामधील ऊस कारखान्यास गाळपासाठी उशिरा तुटून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिराने हरभरा पिकांची लागवड केली. मात्र, सध्या वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यातच रोग-किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाच्या फवारण्या करूनही आटोक्यात न आल्याचे चित्र होते. त्यामुळे हरभरा पिकांचे उत्पादन म्हणावे तसे न मिळण्याची शक्यता आहे.  

पुणे विभागात ५८ हजार ४२६ हेक्टरपैकी ३३ हजार ६३१ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाली आहे. अजूनही सुमारे २४ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे. जिल्ह्यात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु कोरडवाहू भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाणी टंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात हरभऱ्यांच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांमधून बोलले जात आहे.

पुणे जिल्ह्यात झालेली हरभरा पिकांची पेरणी हेक्टरमध्ये ः
तालुका पेरणी झालेले क्षेत्र
हवेली ४८८
मुळशी ३०७
भोर १२५०
मावळ ५०२
वेल्हे २४९
जुन्नर ११,६४९
खेड १८७९
आंबेगाव  २६०६
शिरूर ३३३४
बारामती ३५१४
इंदापूर २३२८
दौड  १३६७
पुरंदर  ४१५८
एकूण ३३६३१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com