युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर परिणाम कमीच 

भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी आणि प्रक्रिया पदार्थ तयार केल्यानंतर चाचणीत जीएमचे (जनुकीय सुधारित) अवशेष आढळल्याचे युरोपियन युनियनच्या अन्नसुरक्षा समितीने म्हटले आहे.
Disputes in Europe have little effect on rice exports
Disputes in Europe have little effect on rice exports

पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी आणि प्रक्रिया पदार्थ तयार केल्यानंतर चाचणीत जीएमचे (जनुकीय सुधारित) अवशेष आढळल्याचे युरोपियन युनियनच्या अन्नसुरक्षा समितीने म्हटले आहे. त्यानंतर युरोपियन युनियनमधील देशांनी तांदळावर हरकती घेतल्यानंतर भारताच्या संपूर्ण तांदूळ निर्यातीलाच फटका बसल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा मुद्दा युरोपियन युनियन आणि ५ टक्के निर्यातीशी संबंधित आहे. त्यातच काही युरोपियन देश पूर्णपणे तांदळासाठी आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे भारताच्या निर्यात बाजारावर याचा फार मोठा परिणाम होणार नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.

फ्रेंच कंपन्यांनी भारतातून आयात केलेल्या ५०० टन तांदळाची पिठी आणि प्रक्रिया पदार्थ तयार करून युरोपियन युनियनमधील देशांत विक्री केली. मात्र, युरोपिय संघाच्या अन्नसुरक्षा समितीने चाचणी घेतल्यानंतर यात जीएमचे अवशेष आढळल्याचा दावा केला. युरोपियन युनियनमध्ये जीएम पिकांना मान्यता आहे, मात्र नॉन जीएम तांदळात जीएमचे अवशेष आढळल्याने सर्वप्रथम फ्रान्समध्ये आक्षेप नोंदविण्यात आला. त्यानंतर एकएक करून युरोपीयन युनियनमधील देशांनी हरकती घ्यायला सुरुवात केली. तर अमेरिकन कंपनीने याच चर्चांमुळे आयातीचे व्यवहारही रद्द केले. मात्र निर्यात करताना त्रयस्थ संस्थेकडून नॉन जीएम असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. मात्र तेथे पीठीमध्ये जीएम अवशेष मिळाल्याने चर्चांना उधाण आले. ज्या तांदळामध्ये जीएम अवशेष आढळल्याचा दावा केला जात आहे त्याचे निर्यातदार शिवप्रसाद राहुटीया यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे.

भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत तांदळाचा वाटा पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच जागतिक पातळीवर भारत हा सर्वाधिक तांदूळ निर्यात करणार देश असून जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ३१ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. यापैकी ५ टक्क्यांपेक्षाही कमी निर्यात युरोपियन देशांना होते. परंतु अनेक युरोपियन देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत. भारतानंतर थायलंडमधून २० टक्के निर्यात होते. भारत आणि थायलंड यांच्यामधील फरक हा तब्बल १० टक्क्यांचा आहे. या दोन्ही देशांतूनच ५० टक्क्यांपेक्षा अधिकची निर्यात होते, तर उर्वरित निर्यातीत इतर देशांचा समावेश आहे. २०१७ ते २०२१ या काळात भारताच्या एकूण निर्यातीत तांदूळ पाचव्या क्रमांकावर होता. या काळात ४०४  कोटी डॉलरची तांदूळ निर्यात झाली. भारतातून होणाऱ्या निर्यातीपैकी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक तांदूळ आशिया आणि आफ्रिकी देशांत जातो, तर ५ टक्क्यांपेक्षाही कमी युरोपात निर्यात होते.त्यामुळे सध्या चर्चिला जात असलेला जीएम अवशेषांच्या मुद्दा हा युरोपियन युनियनमधील देशांपुरता असला तरी नमके कोणत्या टप्प्यावर ही सरमिसळ झाली हे स्पष्ट झालेले नाही. त्यातच जागतिक तांदूळ निर्यातीत ३० टक्के हिस्सा असल्याने भारताचे महत्त्व अबाधित आहे. भारताच्या तांदळाचे प्रमुख आयातदार आशिया आणि आफ्रिकेतील देश आहेत. या देशांमध्ये मात्र तांदूळ निर्यात सुरळीत सुरू आहे. जीएम प्रकरणामुळे भारतीय तांदूळ निर्यातीला फटका बसण्याची शक्यता कमीच आहे.

आशियातील बाजारातील निर्यात आशियाचा विचार करता इराणमध्ये सव्वापाच हजार दशलक्ष डॉलरची, सौदी अरेबियात पाच हजार दशलक्ष डॉलर आणि इराकमध्ये २ हजार ७०० दशलक्ष डॉलरपेक्षा अधिकची तांदूळ निर्यात झाली. कुवेतचे भारतीय तांदळावरील अवलंबित्व तब्बल ९१ टक्के आहे. म्हणजेच कुवेतमध्ये वार्षिक वापर होणाऱ्या तांदळापेकी ९१ टक्के भारतातून जातो. कतारचे भारतीय तांदळवरील अवलंबित्व ८४ टक्के, अझरबैजान ६५ टक्के, जाॅर्डन ३८ टक्के आणि जाॅर्जियाचे भारतावरील अवलंबित्व ३७ टक्के आहे.

आफ्रिकेतही मोठी निर्यात आफ्रिकी देशांचा विचार करता बेनीन देशात सतराशे दशलक्ष डॉलर, सेनेगलमध्ये बाराशे दशलक्ष डॉलर, गीनीमध्ये साडेनऊशे दशलक्ष डॉलरची तांदूळ निर्यात झाली. तर भारतीय तांदळावरील मॉरिशसचे अवलंबित्व ८५ टक्के आहे. टोगो देश एकूण गरजेच्या ६९ टक्के तांदूळ भारतातून आयात करतो. नामीबिया ५५ टक्के, सेनेगल ३३ टक्के आणि दक्षिण आफ्रिका २८ टक्के तांदळासाठी भारतावर अवलंबून आहे.

युरोपमधील निर्यात युरोपचा विचार करता, युनायटेड किंगडमला ७०३ दशलक्ष डॉलरचा तांदूळ निर्यात झाला. नेदरलॅंडला ३१६ दशलक्ष डॉलर आणि रशियाला २१८ दशलक्ष डॉलरची निर्यात झाली. युरोपमधील भारतीय तांदळावरील अवलंबित्वाचा विचार करता युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयरलॅंडमध्ये एकूण वापराच्या २५ टक्के तांदूळ भारतातून जातो. युक्रेनमध्ये २३ टक्के, नेदरलॅंडमध्ये २२ टक्के अवलंबित्व भारतीय तांदळावर आहे. तसेच अमेरिकाही २३.५९ टक्के तांदळासाठी भारतावर अवलंबून आहे. तर कॅनडा २१ टक्के, ऑस्ट्रेलिया ३० टक्के आणि न्यूझीलंड १५ टक्के तांदूळ भारतातून आयात करतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com