साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन  प्रस्ताव शासनाकडे ः जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या सातारा तालुक्‍यातील टोळेवाडी, मोरेवाडी, पाटण तालुक्‍यातील जिमनवाडी, म्हारवण, म्हसुगडेवाडीचा या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. पूरग्रस्त गावांमध्ये बाधित झालेले रस्ते, शाळा, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून १२ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही धोकादायक स्थितीत राहावे लागले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. 

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सिंघल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की २७ ते ८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ७०७ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध गावांत घरांची पडझड, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. पूरस्थितीमुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले, अशा कुटुंबांना तत्काळ रोखीने पाच हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे.

जिल्ह्यातील विविध संस्था, व्यक्तींनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली मदत सातारा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांनाही देण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून ४७ लाख ७१ हजार ३०४ रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा झाले आहेत, तसेच दोन हजार ३३८ कुटुंबांना तांदूळ, गहू, केरोसीन वाटप केले आहे. 

सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्‍वर या तालुक्‍यांतील गावांमध्ये भूस्खलनाचे प्रकार घडले आहेत. परिणामी सातारा तालुक्‍यातील १५८, पाटण तालुक्‍यातील १०८, जावळी तालुक्‍यातील १७९ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले. भूगर्भशास्त्रज्ञ संबंधित गावांचा अभ्यास करून प्रशासनास अहवाल देतील; परंतु काही गावांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची आवश्‍यकता असल्याने शासनास संबंधित गावांचा प्रस्ताव पाठविलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com