सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत कर्ज व्याजदरात पाच टक्के सूट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस प्रथमच करपूर्व १२६.५४ कोटी, तर करोत्तर १०५.३६ कोटींचा नफा झाला आहे. बॅंकेने सात हजार कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शून्य टक्के दराने वितरित केले असून, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्जावरील व्याजात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची माहिती देताना आमदार भोसले म्हणाले, की या आर्थिक वर्षात मार्च २०१९ अखेर बॅंकेस ढोबळे एनपीएचे प्रमाण ०.१४ टक्का इतके, तर निव्वळ एनपीए शून्य टक्का ठेवण्यात बॅंकेला यश आले आहे. गेली अकरा वर्षे शून्य टक्का एनपीए ठेवल्याबद्दल रिझर्व्ह बॅंक व नाबार्ड यांनी बॅंकेला विशेष सन्मानित केले आहे. वसूल भाग भांडवलात विक्रमी ३१ कोटींनी वाढ होऊन भाग भांडवल १९७ कोटींवर गेले आहे. भरीव निधीमध्ये २१ कोटींनी वाढ झाली आहे. सरकारी कर्जरोख्यांच्या ट्रेडिंगमधून या आर्थिक वर्षात सव्वा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ९५३ विकास सेवा सोसायट्यांपैकी ८७६ विकास संस्था नफ्यात आणण्यात यश आले आहे. या वर्षी सभासदांना १२ टक्के लाभांशाची तरतूद करण्यात आली आहे.

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्क्याने वितरित केले असून, यासाठी गतवर्षी दोन कोटी २५ लाखांची तरतूद केली होती. या वर्षी यामध्ये वाढ करून ती चार कोटी केली आहे. दुष्काळी स्थितीची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दोन कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तीन लाख ३५ हजार ५४६ रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामांसाठी बॅंकेने ९२.४४ लाखांची मदत केली असून, पुढील आर्थिक वर्षाकरिता दोन कोटींची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बॅंकेची २९ एटीएम कार्यरत असून, ६५० मायक्रो एटीएमच्या माध्यमातून दुर्गम भागात बॅंकिंग सेवा पुरविली जात आहे. नजीकच्या काळात शंभर एटीएम सुरू करण्याची योजना आहे. विकास संस्थांच्या सचिवांना १२ टक्के बक्षिस पगारासाठी नफ्यातून एक कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. महिला बचत गटांना चार टक्के या अत्यल्प दराने कर्जपुरवठा केला जात आहे. आजअखेर १७ हजार ९८६ बचतगटांना २६ कोटी ८० लाखांचे कर्जवितरण केले आहे. 

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत बॅंकेच्या एक लाख ३५ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी ३९ लाखांची मदत जमा करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, सुरेख पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com