नगर जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची फक्त चार टक्के पेरणी

नगर जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची फक्त चार टक्के पेरणी
नगर जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची फक्त चार टक्के पेरणी

नगर ः पाण्याचे दुर्भिक्ष्य, दुष्काळाची वाढती तीव्रता पाहता मार्चअखेर जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची फक्त चार टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात भुईमूग आणि मका पिकांचे एक हजार २७ हेक्‍टरवर उत्पादन घेण्यात आले होते. बळिराजाच्या हातात अन्नधान्य येणार नाही; मात्र चारापिकांबाबतही गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यात बाहेरच्या जिल्ह्यातून चारा उपलब्ध करावा लागणार आहे.

जिल्ह्यात उसाशिवाय सरासरी ८४ हजार हेक्‍टरवर उन्हाळी पेरणी अपेक्षित होती. मार्चअखेर त्यापैकी फक्त तीन हजार ४३ हेक्‍टरवर पेरणी केली होती. जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील पाणीपातळी पाहता शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले. विशेष म्हणजे, भात, सूर्यफूल, तीळ व उडीद या पिकांची पेरणी शून्य टक्के राहिली. उन्हाळी बाजरीही फक्त एक हेक्‍टरवर पेरली गेली. उन्हाळी भुईमूग व गळीतधान्याची पेरणी इतर पिकांपेक्षा बरी झाली असून, त्यांची सरासरी दोन हजार ३९ हेक्‍टर आहे. गेल्यावर्षी १ जून ते ३१ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ३४५.५० मिलीमीटर पाऊस झाला होता. 

पावसाची टक्केवारी फक्त ६९.४७ टक्के राहिली होती. पावसाळ्याच्या पाच महिन्यांमध्ये फक्त जूनमध्ये अपेक्षेपेक्षा चांगला (१५०.९ मिलीमीटर) पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. संपूर्ण पावसाळ्यात १३० दिवस कोरडे गेले आणि फक्त २३ दिवस पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा, मुळा आणि निळंवडे ही महत्त्वाची धरणे बऱ्यापैकी भरल्यानंतरही डिसेंबरअखेर त्यांच्यात फक्त ४२.८६ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला. त्यामुळेच शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात पेरणी करणे टाळले.

संगमनेर, श्रीगोंदे, पाथर्डीत पेरणी जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांपैकी फक्त श्रीगोंदे (१.९१ हेक्‍टर), संगमनेर (१.४३ हेक्‍टर) आणि पाथर्डी (०.०९ हेक्‍टर) या तीनच तालुक्‍यांत पेरणी झाली. श्रीगोंद्यात फक्त भुईमूग आणि संगमनेरमध्ये भुईमूग (०.३९हेक्‍टर), मका (०.८६ हेक्‍टर) आणि बाजरीची (०.०१ हेक्‍टर) पेरणी झाली. पाथर्डीत (०.०९ हेक्‍टर) क्षेत्रावर फक्त भुईमूग पेरला गेला. मात्र, नगर, पारनेर, कर्जत. जामखेड, शेवगाव, नेवासे, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी मार्चअखेरपर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी टाळली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com