‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. १८) विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन भोसले यांच्या द्राक्षाच्या मळ्यात मोठ्या दिमाखात झाले. 

‘सकाळ’चे मुख्य संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, सोलापूर ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वितरण विभागाचे व्यवस्थापक दिनेश शेट्टी, पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे आनंद दंतकाळे, ‘ॲग्रोवन’चे मुख्य वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, ‘ॲग्रोवन’चे उपवृत्तसंपादक रमेश जाधव आदी उपस्थित होते. यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रेझेंटिंग स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ आणि सन्स आहेत. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या बाजूने लिहणं, बोलणं, त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम ॲग्रोवन नित्य करतं. पण, सरकारी धोरणावर, निर्णयावर शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेपही ॲग्रोवन करतं. जेजे उत्तम, उदात्त ते देताना सकारात्मक ऊर्जाही शेतकऱ्यांना दिली जाते. ‘ॲग्रोवन’मधील यशकथेतले शेतकरी त्या दिवासाचे सेलिब्रिटीज होतात, असा अनुभव आहे. दिवाळी अंक या सगळ्यातला महत्त्वाचा भाग आहे, जो नवीन माहिती आणि संशोधनात्मक आशय देतो.’’

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सरकारी धोरणे, कायद्यात बदल होत आहेत. मॉडेल ॲक्ट, नियमनमुक्ती यासारख्या कायद्यात बदल झाले. पण, अंमलबजावणी पुरेशी नाही. आज शेतीत पिकवण्यपेक्षा विकायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. यंदाचा दिवाळी अंक याच विषयाला केंद्रीभूत ठरवून करण्यात आला आहे. बाजारांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नक्कीच त्यातून दिशा मिळेल.’’

शेतकरी सचिन भोसले म्हणाले, ‘‘ॲग्रोवन’ आमचा खऱ्या अर्थाने गुरू आहे. उत्पादन असेल किंवा द्राक्षासह अन्य बाजारातील नवीन बदल, धोरणे याची माहिती ॲग्रोवन आमच्यापर्यंत पोचवते. ‘ॲग्रोवन’मुळेच आम्हाला शेतीसाठी दिशा मिळाली.’’

 सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे बातमीदार सुदर्शन सुतार यांनी केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी आभार मानले.

प्रगतशील, तरुण शेतकऱ्याच्या मळ्यात प्रकाशन विरवडे बुद्रुक येथील सचिन भोसले हे प्रयोगशील, उच्चशिक्षित तरुण शेतकरी आहेत. सुमारे ७० एकर क्षेत्रावर त्यांच्याकडे द्राक्ष बाग आहे. वर्षाकाठी एक हजार टन द्राक्ष ते उत्पादित करतात, त्यापैकी १५० टन ते बेदाणा उत्पादित करतात. याच बेदाण्याचे महाफ्रुट या नावाने त्यांनी ब्रँड तयार केला आहे. देशभरातील शंभर मॉलमध्ये हा बेदाणा विक्री होतो आहे. शिवाय, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन साइड्सवरही त्याची विक्री होते, यंदाचा दिवाळी अंक सचिन भोसले यांच्यासह प्रयोगशील १६ शेतकऱ्यांच्या यशकथा आणि अन्य पूरक विषयांनी सजला आहे. त्यामुळे थेट द्राक्षमळ्यात हा सोहळा पार पडला.

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही भारतीयांच्या जीवनाचा गाभा आहे. आमची संस्थाही ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली आहे. त्यामुळेच आम्ही ‘ॲग्रोवन’सारख्या ग्रामीण क्षेत्राशी नाते असलेल्या माध्यमाशी गेल्या तीन वर्षांपासून जोडलो आहोत. - अमित मोडक, संचालक-सीईओ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com