हवामानाच्या अंदाजानुसार करा हंगामाचे नियोजन

प्रत्येक कामांच्या नियोजनापूर्वी दैनंदिन हवामान अंदाज पाहण्याची सवय करून घ्यावी. त्यायोगे पाणी देणे, खुरपणी करणे, खते देणे, फवारणी करणे, काढणी व साठवण करणे, विक्रीसाठी पाठविणे अशा कामांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या पाऊस व अन्य आपत्तीमुळे अडचणी येणार नाहीत. केवळ एका हंगामापुरता तात्पुरता विचार न करता पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामांचाही विचार करून पीक व पुरक व्यवसायांचे नियोजन करावे.
Hellnet is useful for protection of cash crops.
Hellnet is useful for protection of cash crops.

प्रत्येक कामांच्या नियोजनापूर्वी दैनंदिन हवामान अंदाज पाहण्याची सवय करून घ्यावी. त्यायोगे पाणी देणे, खुरपणी करणे, खते देणे, फवारणी करणे, काढणी व साठवण करणे, विक्रीसाठी पाठविणे अशा कामांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या पाऊस व अन्य आपत्तीमुळे अडचणी येणार नाहीत. केवळ एका हंगामापुरता तात्पुरता विचार न करता पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामांचाही विचार करून पीक व पुरक व्यवसायांचे नियोजन करावे. आपल्या देशात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील पाणी साठ्याचा वापर बेफिकिरीने करून चालणार नाही. या मॉन्सुन अंदाजामुळे शेतकऱ्यांसह शहरवासियांनी हुरळून जाण्याची गरज नाही. त्याऐवजी सन २०१२ व २०१६ च्या दुष्काळाची आठवण ठेवावी. कारण, यावर्षीचा मॉन्सून अंदाज नीट अभ्यासल्यास तो सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०० टक्के पडण्याची शक्यता ६२ टक्के आहे. म्हणजेच अर्ध्यापेक्षा थोडी अधिक शक्यता आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे जवळपास अर्धी शक्यता सरासरीपेक्षा थोडी कमी आणि खुपच कमी पाऊस पडण्याची आहे. त्याच प्रमाणे जिल्हा व तालुकानिहाय वितरणाबाबत काही अचूकतेने पावसाचा अंदाज सांगण्याइतकी क्षमता आपल्याकडे नाही. कारण भारत हा विषुववृत्ताजवळ असून, येथे वातावरणीय बदल अगदी अल्पकाळात होतात. यामुळे येथील हवामानाचे दीर्घकालीन किंवा मध्यम कालीन हवामान अंदाज देणे अवघड असते. भारतातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस पडेलच असे नाही. कारण या आधीही असे घडलेले नाही. मागील वर्षाची महाराष्ट्राची स्थिती पाहता विशेषतः मराठवाडा व विदर्भात पावसाचे असमान वितरण हे नैसर्गिक आहे. जगभरातील बहुतांश सर्व प्रकारचे कृषीहवामान विभाग आपल्या देशात आढळतात. हीच आपल्या देशाची हवामानदृष्ट्या ताकद आहे. महाराष्ट्रात फक्त बर्फ वगळता, थंड, समशितोष्ण, उष्ण अशा प्रकारचे हवामान विभाग आपल्याकडे आहेत. यामुळे विविध हंगामात विविध प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, चारा, वनौषधी पिकांची हंगामानुसार, विभागनिहाय लागवड करता येते. सध्या काही प्रमाणात वातावरणात बदल घडून आले आहेत. यामुळे थोडासा काही विभागात पिकांचा हंगाम बदलला आहे, असे दिसते. आधीच कोरोनामुळे शेतीचे कंबरडे पुरते मोडले आहे. विशेषतः भाजीपाला, वेलवर्गीय फळपिके आणि इतर फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अगदीच विदारक झाली आहे. या संकटामुळे आणि आर्थिक अडचण अशा अनिश्चिततेच्या सावटाखालीच यंदाचा खरीप हंगाम जाण्याची शक्यता आहे. विभागनिहाय पीक उत्पादनातील समस्या वेगवेगळ्या असल्या तरी पाण्याची उणीव ही सर्वत्र समान समस्या आहे. आपला ८० टक्के भाग कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोडतो. यामुळे पाण्याची उपलब्धी व वापर हे यावरील समस्येचे उत्तर ठरते. सध्याच्या अंदाजाप्रमाणे पाण्याची उपलब्धता यावर्षी चांगली होण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ खरिपाचा विचार करून न थांबता पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विचार केला पाहिजे. त्यातून शेती आणि शेतीपुरक जोड व्यवसायाची आखणी केली पाहिजे. अर्थातच याकरिता पाण्याची उपलब्धी, त्याचा वापर, पाणी वापर कार्यक्षमता (वॉटर यूज इफिशियन्सी), सिंचन वापर कार्यक्षमता (ईरिगेशन यूज इफिशियन्सी) याविषयी माहिती असणे आवश्‍यक आहे. यावरच आधारीत पिकांस सिंचन देणे अत्यावश्‍यक आहे. भविष्यात पाण्याच्या कमतरतेमुळे येणारा रब्बी व उन्हाळी हंगाम संकटात येऊ नये, यासाठी या पावसाळ्यापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पुढील बाबी उपयुक्त ठरतील.

  • मे महिन्यात येणारे भारतीय हवामान विभागाचे दुसऱ्या सुधारीत पावसाचा अंदाज अभ्यासावा. त्यानंतर खरीप पिकाचे नियोजन करावे.
  • कोकणात भात (धान), वरई, नागली पिकांची लागवड करताना हळवे अथवा निमगरव्या वाणांची निवड करावी. विदर्भातील भात शेतीलाही हाच सल्ला लागू पडतो. विद्यापिठांच्या शिफारशीप्रमाणे यावर्षी वेळेवर लागवड करता येईल.
  • उर्वरीत महाराष्ट्रात कापूस, सोयाबीन, तुर, बाजरी, खरीप ज्वारी, कारळा, तीळ, उडीद, हुलगा इत्यादी पिकांची पेरणी वेळेवर करण्याकामी शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीला सुरवात करावी. हळव्या आणि निमगरव्या वाणांची, कीड व रोग प्रतिकारक वाणांची कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र येथील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निवड करावी.
  • विशेषतः कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या वाणांची निवड व बियाणांची खात्री नीट करून घ्यावी. या कामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचे व त्यांच्या घटक कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे यांची प्रामुख्याने मदत घ्यावी.
  • भूईमुग शक्यतो उपट्या जातीचा घ्यावा.
  • सर्व पिकांची पेरणी करताना जैविक खतांचा वापर, जैविकांची बीजप्रक्रिया करूनच बियाणांची पेरणी करावी. यामुळे प्राथमिक पिकांची वाढ जोमदार, निरोगी तर होईलच. तसेच हंगाम प्रारंभी येऊ शकणाऱ्या कोरड्या काळात पीक पाण्याच्या ताणाला बळी पडणार नाही.
  • कापूस, सोयाबीन, तूर पिकांस १ ते ३ संरक्षित पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी आताच्या मशागतीपासून मृद, जल व्यवस्थापनाचे तंत्र अवलंबावे.
  • हवामाननिहाय देण्यात येणााऱ्या जिल्हानिहाय सल्ल्यांचा वापरपिकांच्या व्यवस्थापनामध्ये जरूर करावा. (हा विभागनिहाय सल्ला अॅग्रोवनमधून वेळोवेळी दिला जातो.)
  • भाजी व वेलवर्गीय फळे घेताना शक्य असल्यास संरक्षित शेतीचा मार्ग (पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस) स्वीकारावा. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यांनी टनेल, मल्चिंग, जैविक व प्रतिजैविकांचा वापर करावा. उत्पादनाच्या शाश्‍वततेसाठी प्रयत्न करावेत.
  • फळबागांसाठी वारा प्रतिबंध (विंडब्रेक) वृक्षाची लागवड करणे अनिवार्य आहे. हवामान अंदाजानुसार गारपीटीची शक्यता असल्यास द्राक्ष, डाळिंब फळबागांसाठी ‘टनेल’ अथवा हेलनेट’ची व्यवस्था करावी.
  • जुनमध्ये भारतीय हवामान विभागाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या मान्सून अंदाजावर आधारीत आपत्कालीन पीक नियोजन कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याप्रमाणे करावे.
  • खरीपात पाऊस चांगला झाला तरीही ऊस व फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी बचतीचे सर्व उपाय करून पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याची अधिक उपलब्धी करून ठेवणे आवश्‍यक आहे.
  • खरीपाचे पिकाच्या नियोजनामध्ये जनावरांसाठी चारा पिकांचा अंतर्भाव करणे अत्यावश्‍यक आहे. कारण शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे यांसाठी चाऱ्याची उपलब्धीबरोबरच सेंद्रिय खताचा पुरवठा होऊ शकतो.
  • उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म वातावरणशास्त्र उपयुक्त 

  • शेतीमालाच्या उत्पादनावर वातावरणातील विविध घटकांचा सातत्याने परिणाम होत असतो. वातावरणातील हे घटक ओळखून पिकांसाठी आवश्यक ते सूक्ष्म वातावरण शेतामध्ये तयार करण्याची आवश्यता आहे. यातून उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
  • जागतिक पातळीवर भारताच्या वाट्याला २.४ टक्के जमीन आली आहे. येथे हवामानाची विविधताही मोठी असून, ४५ हजारापेक्षा अधिक वनस्पतीची जैवविविधता आहे. या वनस्पतींवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जगणाऱ्या एक लाखापेक्षा अधिक प्रकारचे प्राणी, पशू यांचे जीवनमान त्यावर अवलंबून आहे. भारतामध्ये शेतीतून मिळणाऱ्या रोजगाराचा विचार केला असता कोरोनानंतर आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने कृषी उत्पादनाचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. एकरी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीतील सूक्ष्म वातावरणामध्ये अपेक्षित ते बदल घडवून आणावे लागतील. आपल्याकडे कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे (सुमारे ८० टक्के) आहे. बागायती क्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थापनाचे ढिसाळ तंत्र वापरून चालणार नाही. उत्पादकता वाढीतील महत्त्वाचा अडसर सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता हाच आहे.
  • भाजीपाला लागवड भारतातील मध्य आणि दक्षिण भागामध्ये भाजीपाल्याची लागवड केली जाते. उत्तर आणि उत्तर पूर्व भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण आणि सह्याद्रीच्या उपपर्वतीय रांगामध्ये भाजीपाला लागवडीचे प्रमाण कमी आहे. या भागासह नाशिक, नवेगावपर्यंत भाजीपाला लागवडीला मोठा वाव आहे. योग्य तंत्राच्या साह्याने कमी पाण्यामध्ये अधिक क्षेत्र भाजीपाला लागवडीखाली आणावे लागणार आहे.

  • सध्या भारतातून फळे आणि भाजीपाल्याचे सुमारे ९४ लाख हेक्टर क्षेत्रातून सुमारे १६.५ लाख टन उत्पादन घेतले जाते. अनेक पिकांमध्ये क्षेत्र आणि उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर चीननंतर भारताचा क्रमांक लागत असला तरी उत्पादकता अत्यंत कमी आहे. ही उत्पादकता भारतीय गरजेपेक्षा कमी आहे. भाजीपाला उपलब्धता जागतिक आरोग्य संघटनेच्या ३०० ग्रॅम प्रती व्यक्ती प्रती दिवस या निश्चित मानकापेक्षा अत्यंत कमी (१८० ग्रॅम ) आहे.
  • उत्पादकता वाढीसाठी संरक्षित रोपवाटिकांपासून काढणीपर्यंतच्या सर्व जैविक आणि अजैविक ताण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अजैविक ताणांमध्ये हवामानातील उष्णता, थंडीची लाट, गारपीट, वादळे, दुष्काळ, पूरस्थिती अशा अनेक घटकांचा समावेश होतो. हे ताण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे.
  • संपर्क - डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com