जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व 

सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकींचा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. या बँकांमध्ये महाविकास आघाडी प्रणीत स्थानिक पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले.
Dominance of Mahavikas Aghadi over District Central Banks
Dominance of Mahavikas Aghadi over District Central Banks

सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकींचा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. या बँकांमध्ये महाविकास आघाडी प्रणीत स्थानिक पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले.  पुणे ः सातारा जिल्हा बँकेच्या निकालाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला. सांगलीत महाआघाडीला दमदार यश मिळाले. भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीप्रणीत ‘सहकार पॅनेल’ने आपले वर्चस्व सिद्ध करत २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. येथे भाजपने माघार घेतली होती. धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील दिग्गज राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने चुरस व उत्सुकता निर्माण झाली होती. यात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील ‘सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल’ने पुन्हा एकदा बाजी मारली. चारही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत  स्थानिक राजकीय बेरीज-वजाबाकी ठरली महत्त्वाची; भाजपला कुठेच सूर गवसलाच नाही. 

साताऱ्यात गृह राज्यमंत्री देसाईंचा पराभव 

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक सहकार पॅनलेची सत्ता कायम राहिली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी, तर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला. समान मते मिळाल्याने शिवसेनेचे माणचे नेते शेखर गोरे व भाजपचे सुनील खत्री यांचा चिठ्ठीद्वारे जिल्हा बॅंकेत प्रवेश झाला. काँग्रेस मात्र बॅंकेतून हद्दपार झाली आहे. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, शिवाजीराव महाडिक व मनोजकुमार पोळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी साताऱ्यातील बॅंक्स असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणी झाली. एकाच वेळी दहा टेबलांवर पहिल्यांदा सोसायटीची मतमोजणी झाली. यामध्ये पाहिल्याच निकालाने राष्ट्रवादीला धक्का दिला. जावळीत आमदार शशिकांत शिंदेंचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मतांनी पराभव केला. पाटणमध्ये राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सात मतांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव केला. कराडमधून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आठ मतांनी विजयी झाले. 

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड  जावळीत आमदार शशिकांत शिंदेंचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मतांनी पराभव केला. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जावलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.  शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे,‘‘मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभे केले, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया सुळे यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये.’’’ 

जळगावात महाविकास आघाडीला २० जागा 

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीप्रणीत ‘सहकार पॅनेल’ने आपले वर्चस्व सिद्ध करत २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकीत सोमवारी (ता. २२) मतमोजणी झाली. चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे घनश्‍याम अग्रवाल विजयी झाले. त्यांना ६४ पैकी ६३ मते मिळाली, तर एक मत बाद झाले. विरोधकांना एकही मत मिळाले नाही. यावल विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ‘सहकार’चे विनोद पाटील विजयी झाले. त्यांना ४७ पैकी २५, तर विरोधी गणेश नेहते यांना २२ मते मिळाली.  रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात काँग्रेसच्या सहकार गटाच्या उमेदवार जनाबाई महाजन यांनी जाहीर माघार घेत अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्ष मतदानात मात्र त्या एका मताने त्या विजयी झाल्या. त्यांना २६ मते मिळाली, तर पाटील यांना २५ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेतली असली, तरी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा अर्ज मात्र कायम होता. भुसावळ विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून त्यांनी बाजी मारली. 

. सांगलीत भाजपला फक्त चार जागा 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाआघाडीच्या पॅनेलने बाजी मारली. १८ जागांच्या लढतीत १४ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. तर भाजपने चार जागा राखत ताकद दाखवून दिली. यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे अंतिम बलाबल महाआघाडी १७ व भाजप ४ असे झाले आहे. महाआघाडीने गड राखला तरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा पराभव धक्कादायक म्हणावा लागेल. जतमध्ये ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याचे सिद्ध झाले आहे. आटपाडीत भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचाही चुरसीच्या लढतीत पराभव झाला.  जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी लढत लागली. महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल विरूद्ध भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत झाली. सहकारचे १८ तर शेतकरी पॅनेलचे १६ उमेदवार आणि अपक्ष १२ उमेदवार रिंगणात होते. महाआघाडीचे उमेदवार तथा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आटपाडीतून शिवसेनेचे तानाजी पाटील, कवठेमहांकाळमधून माजीमंत्री अजितराव घोरपडे, कडेगावमधून काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम विजयी झाले.  सर्वपक्षीयांच्या ‘शेतकरी विकास’चा  धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेवर झेंडा 

धुळे : धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील दिग्गज राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने चुरस व उत्सुकता निर्माण झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. २२) जाहीर झाला. यात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील ‘सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल’ने पुन्हा एकदा बाजी मारली.  दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील ‘किसान संघर्ष पॅनेल’ला एका बिनविरोधसह चार जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, या निवडणुकीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांचे पुत्र अक्षय सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक प्रक्रियेत १७ पैकी सात जागा या पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित दहा जागांच्या निकालाची उत्सुकता होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com