काळजी करू नका, नियमानुसार मिळेल : पवारांचा कृषी विद्यापीठ आंदोलनकर्त्यांना दिलासा

“तुम्ही काळजी करू नका; नियमानुसार तुम्हाला नक्की मिळेल,” अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांमधील आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती डाॅ. चिंतामणी देवकर यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली. यामुळे विद्यापीठांमधील कामे बेमुदत बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Don't worry, you will get it as per rules: Sharad Pawar
Don't worry, you will get it as per rules: Sharad Pawar

पुणे : “तुम्ही काळजी करू नका; नियमानुसार तुम्हाला नक्की मिळेल,” अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांमधील आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती डाॅ. चिंतामणी देवकर यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली. यामुळे विद्यापीठांमधील कामे बेमुदत बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी कामबंद आंदोलन सुरू केलेल्या राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी श्री. पवार यांनी विद्यापीठ प्रतिनिधींना मुंबईत चर्चेसाठी निमंत्रित केले होते. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर (राहुरी) तसेच डॉ. विठ्ठल नाईक (दापोली), डॉ. संजय कोकाटे (अकोला), डॉ. रणजित चव्हाण (परभणी) यांचा समावेश होता.

“आम्ही आमच्या अडचणी श्री. पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मांडल्या. त्यांना लेखी पत्रदेखील सादर केले. ‘सातवा वेतन आयोग इतर अकृषी विद्यापीठांना लागू केला गेला. मात्र आम्हाला वंचित ठेवण्यात आले,’ असा मुद्दा आम्ही चर्चेत सांगितला. यावर ‘तुम्ही राज्याच्या कृषिमंत्र्यांना भेटला होता का,’ असा सवाल श्री. पवार यांनी आम्हाला विचारला. त्यावर ‘आम्ही अनेकदा भेटलो. मात्र प्रश्न सुटलेला नाही.’ अशी माहिती प्रतिनिधींनी दिली. त्यावर ‘तुम्ही काळजी करू नका. आहे ते लवकरच तुम्हाला मिळेल,’ असे आश्वासन श्री. पवार यांनी दिले,” अशी माहिती श्री. देवकर यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली. विद्यापीठ प्रतिनिधींनी कृषिमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली. त्यांना श्री. पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली. बुधवारी आंदोलनाचा नववा दिवस होता. तथापि, सायंकाळपर्यंत तरी आंदोलन मागे घेतल्याबाबतची घोषणा कोणत्याही संघटनेकडून झालेली नव्हती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com