थेट बांधावर माशांची विक्री करत मिळवला दुप्पट नफा 

अडचणीच्या काळात पायघन यांनी शेततळ्यातील मासे व्यापाऱ्यांना विक्री न करता थेट ग्राहकांना विकण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनच्या एक महिन्याच्या काळात सुमारे ७८ हजारांची मासे विक्री त्यांनी केली असून दुप्पट दरही मिळविला. ​
थेट बांधावर माशांची विक्री करत मिळवला दुप्पट नफा 
थेट बांधावर माशांची विक्री करत मिळवला दुप्पट नफा 

अकोला ः लॉकडाऊनमुळे शेती आणि पूरक उद्योगातील कामांना चांगलाच फटका बसला आहे. शेतमाल विक्रीची मोठी अडचण असल्याने अनेकांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र अशा परिस्थितीतही बाजारपेठेतील संधी हेरून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत काही शेतकऱ्यांनी तयार केला. यापैकीच एक आहेत, कवठा (ता. रिसोड,जि. वाशिम) येथील केशव पायघन. कवठा येथील केशव गोविंदा पायघन हे प्रयोगशील शेतकरी. त्यांची पाच एकर शेती आहे. त्यामध्ये दोन एकरावर दशहरी आंबा लागवड आहे. शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी २४ बाय ३० बाय ४ मीटर आकाराचे शेततळे केले आहे. मागील तीन वर्षांपासून शेततळ्यात पायघन हे रोहू, कटला, मृगल माशांचे संगोपन करीत आहेत. गेली दोन वर्षे ते ठरलेल्या व्यापाऱ्यास माशांची विक्री करून मोकळे व्हायचे. व्यापारी प्रति किलोस ८० रुपये दर द्यायचा. यातून सरासरी साठ हजारांची मिळकत व्हायची. परंतु कष्टाच्या मानाने ही मिळकत कमी असायची. यंदा केशव यांनी शेतीतील बहुतांश कामे मार्चमध्ये आटोपली. केशव यांचा लग्न समारंभासाठी मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. लग्नसराईत हा व्यवसाय जोरात असतो. लॉकडाऊनमुळे लग्नसोहळ्यावर बंदी असल्याने हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला. अशा परिस्थितीत केशव तसेच त्यांचा चुलत भाऊ संजय आणि भागवत यांनी निर्णय घेतला की, आपापल्या शेततळ्यातील मासे स्वतःच विकूयात. 

मासे विक्रीला सुरवात ः  पायघन बंधुंकडे प्रत्येकाची शेततळी असून त्यात मत्स्यपालन केले आहे. प्रत्येकाने एक आठवडा मत्स्य विक्रीचा ठरविला. या काळात प्रत्येकजण एकमेकाला मासे विक्रीसाठी मदत करतात. याबाबत केशव पायघन म्हणाले की, मी २४ मार्चपासून शेततळ्याच्या बांधावरून परिसरातील ग्राहकांना थेट मासे विक्री सुरु केली. या काळात चिकन, मटण मिळणे बंद झाले होते. अशा परिस्थितीत मांसाहारींना माशांचा आधार होता. हीच संधी मी साधली. दररोज मागणीचा अंदाज घेत शेततळ्यातील माशांची विक्री सुरु केली. सध्या दररोज १५ ते २० किलो माशांची विक्री होते. माशाच्या आकारानुसार सरासरी १५० ते २०० रूपये प्रति किलोस दर मिळतो. आत्तापर्यंत मी चार क्विंटल मासे विक्री केली आहे. या कालावधीत मला ७८ हजार रुपयांची मिळकत झाली. अजून शेततळ्यात किमान तीन क्विंटल मासे मिळतील असा अंदाज आहे. या माशांची देखील मी थेट विक्री करणार आहेत. त्यामुळे यंदा मासे विक्रीतून एक लाखांच्यावर मिळकत जाईल, असा अंदाज आहे. माशांच्या खाद्य व्यवस्थापनासाठी तीस हजारांचा खर्च आला आहे. थेट विक्रीमुळे मला व्यापाऱ्याच्या दरापेक्षा दुप्पट दर मिळाला. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन ः  करडा (जि. वाशीम) कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठा गावात पायघन बंधुंनी शेततळ्यात रोहू, कटला, मृगल या माशांचे संवर्धन सुरू केले. हैद्राबाद येथील राष्ट्रीय मत्‍स्य विकास मंडळामार्फत त्यांना मत्स्यपालनाचे प्रात्यक्षिक देण्यात आले होते. यंदा लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना माशांची विक्री करून केशव पायघन यांनी मिळकतीचा नवा पर्याय उभा केला आहे.  संपर्क ः केशव पायघन, ९०४९१२८६१०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com