आढावा बैठक
आढावा बैठक

मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ. अनिल बोंडे

कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता टिकविणे हे आव्हान बनत आहे. येथून पुढील काळात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामावर जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवावी. नावीन्यपूर्ण उपक्रमातून मृदसंधारणासाठी वैविध्यपूर्ण प्रयत्न करावेत यासाठी शासन संपूर्णपणे अर्थसाहाय्य करेल, असे आश्‍वासन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १८) येथे दिले.  कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ. बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार शिवाजीराव नाईक, अमल महाडिक, सौ. शौमिका महाडिक आदी या वेळी उपस्थित होते. विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी जिल्हावार कामाचा आढावा डॉ. बोंडे यांना सादर केला. सध्या तिन्ही जिल्ह्यांत लष्करी अळी व हुमणी किडीचा प्रादुर्भाव आहे. यावर कृषी विभागाने कारखान्यांची मदत घेऊन मोहीम स्वरूपात हुमणी किडे पकडल्याचे सांगितले. ‘‘लष्करी अळीच्या प्रादुर्भावाबद्दल माहिती घेतली. याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. कोल्हापूर विभागात याबाबतचा पायलट प्रोजेक्‍ट राबवून तो राज्याला आदर्शवत ठरेल असा सक्षम पर्याय निवडा,’’ अशा सूचना डॉ. बोंडे यांनी दिल्या. यासाठी लवकरच मंत्रालयात बैठका बोलावू. त्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करून विविध पातळीवर कार्यशाळांचेही आयोजन करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ‘‘अतिरिक्त पाणी व रासायनिक खतांमुळे तिन्ही जिल्ह्यांमध्ये क्षारपड जमिनी झाल्या आहेत. सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने शेतजमिनी नापिक होत आहेत. यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत. माती परीक्षणासारख्या प्रयोगशाळा गावातच होण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करावे. कृषी पदवीधर युवकांना यात सहभागी करून घ्यावे. सेंद्रिय शेती, गुळाबाबत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठवून द्यावा. शासन याला मंजुरी देइल,’’ असे डॉ. बोंडे यांनी या वेळी सांगितले.  या वेळी कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिक्षक अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी अधिकारी उमेश पाटील, साताऱ्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बोरकर, सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. साबळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह तिन्ही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी सहायकांनी ग्रामपंचायतीत हजर राहावे अद्यापही कृषी सहायक ग्रामपंचायतीत उपस्थित राहात नसल्याचे सांगताच डॉ. बोंडे यांनी याबाबत आक्षेप नोंदवला. सूचना देऊनही याबाबत कार्यवाही होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. कृषी सहायकाने गावात येताना व जातानाही समजावे यासाठी ट्रॅकिंग यंत्रणा राबवावी. कोल्हापुरातून याबाबतचे प्रयत्न प्राधान्याने अपेक्षित आहेत. कोल्हापूर विभागात होणारे नावीन्यपूर्ण प्रकल्प राज्यासाठी लागू करणे शक्‍य आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यातील इतर विभागांतील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा तरच संपूर्ण राज्याचा विकास होऊ शकेल, असे डॉ. बोंडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com