ड्रोनव्दारे फवारणीचा अमरावतीत पथदर्शी प्रकल्पः कृषीमंत्री डाॅ. अनिल बोंडे

अनिल बोंडे
अनिल बोंडे

अमरावती ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधांचे दुष्परिणाम दोन वर्षांपूर्वी अनुभवण्यात आले. त्यावर नियंत्रणासाठी ड्रोनव्दारे फवारणीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. त्या संदर्भातील पथदर्शी प्रकल्प अमरावती जिल्ह्यात राबविला जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  कृषिमंत्री पदाचा प्रभार सांभाळल्यानंतर त्यांनी पहिली विभागस्तरीय बैठक विभागीय आयुक्‍त कार्यालयात घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. अनिल बोंडे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी दरम्यान विषबाधा होत अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातही असेच प्रकार घडले. त्यावर नियंत्रणासाठी ड्रोनव्दारे फवारणीचा पर्याय विचाराधीन आहे. त्यासंदर्भातील प्रयोग अमरावती जिल्ह्यात पायलट प्रोजेक्‍टच्या माध्यमातून होतील. हे प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर बचतगटांच्या माध्यमातून ड्रोनव्दारे फवारणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावीत आहे. या माध्यमातून शेतकरी बचतगटांना उत्पन्नाचा  स्रोत उपलब्ध होईल. ट्रॅक्‍टरव्दारे फवारणीसाठी देखील काही कंपन्या पुढे आल्या आहेत. त्या १०० रुपये प्रती एकरप्रमाणे फवारणीस तयार आहेत. त्या प्रस्तावावर देखील विचार सुरू आहे.  ‘‘राज्यात कोठेही बनावट बियाणे किंवा खत आढळल्यास त्याबाबत थेट व्हॉटसअप करा. संबंधित ठिकाणी तत्काळ प्रभावाने कारवाई केली जाईल. त्याकरिता त्याच जिल्ह्यातील नाही तर अन्य जिल्ह्यातून किंवा लगतच्या जिल्ह्यातूनही प्रसंगी पथक पाठविले जाईल. बोगस निविष्ठा आढळल्यास संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर कारवाई होईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी सहायकांचे ट्रॅकिंग कृषी सहायक हा शेतकरी व कृषी विभागांमधील दुवा आहे. त्यामुळे त्यांनी गावात जात योजनांचा प्रसार करणे, तंत्रज्ञान पोचविणे गरजेचे आहे. त्यांना आता बसण्याकरिता ग्रामपंचायमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासोबतच ते गावात रोज गेले पाहिजे, याकरिता त्यांचे अटेंडन्स ट्रॅकिंग करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com