सुजय.विखे यांच्या भाजप प्रवेशाने दिलीप गांधी समर्थक अस्वस्थ

डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाने खासदार गांधी समर्थक अस्वस्थ
डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाने खासदार गांधी समर्थक अस्वस्थ

नगर ः नगर जिल्ह्यामधील युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १२) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवाय त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डाने पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाकडे शिफारस केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. सुजय हे भाजपचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाल्याने येथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांत मात्र अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे सोमवारी (ता. ११) गांधी समर्थकांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करून डॉ. सुजय यांना उमेदवारी देण्याला विरोध केला होता.  नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादीकडे आहे. कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे येथून निवडणूक लढवणार हे कधीच स्पष्ट झाले.

त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून त्या दृष्टीने मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. अनेक वेळा त्यांनी ‘‘आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणवार,’’ असे स्पष्ट केले होते. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ती कॉंग्रेसला सोडावी, अशी मागणी केली जात होती. राष्ट्रवादीने जागा सोडण्याला नकार दिला, तरीही डॉ. सुजय ठाम होते. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यश आले नसल्याने अखेर मंगळवारी डॉ. सुजय यांनी भाजपत प्रवेश केला. डॉ. सुजय भाजपमध्ये आले तर उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव असल्याने खासदार गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सुजय यांना उमदेवारी देण्याला विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कार्यकत्यांनी घोषणाबाजीही केली. मंंगळवारी डॉ. सुजय यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. जिल्ह्यामधील भाजपचे आमदार, पदाधिकारी या वेळी हजर होते. 

उमेदवार अजूनही ठरेना  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला जागा सुटली नाही. त्यामुळे डॉ. सुजय विखे भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. आता त्यांची लढत राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत होणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून सुरवातीला माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, त्यानंतर आमदार अरुण जगताप, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांची नावे चर्चेत होती. गुरुवारी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार ठरला नाही. आता आमदार संग्राम जगताप यांचेही नाव चर्चेत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com