देशी गोवंश पालनातून रोजगार निर्मिती करणार ः डॉ. कथारिया

indigenous cattle conference
indigenous cattle conference

पुणे: देशी गोवंशाचा केवळ सांभाळ करून चालणार नाही, तर त्यांच्या सांभाळातून ग्रामीण भारतात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार एक योजना आखत आहे. ग्रामीण बेरोजगारांना कौशल्य विकास, स्टार्टअप आणि स्टॅंडअप योजनेतून प्रकल्प उभारले जाणार आहेत. ही योजना केंद्रातील ४० विभागांशी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती कामधेनू राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभ कथारिया यांनी दिली.  कामधेनू सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय गो परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कथारिया यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २९) झाले. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्‍वर स्वामी, रवींद्र सरस्वती महाराज, आयोगाचे सदस्य आणि गो सेवा केंद्राचे सुनील मानसिंगका, जैविक जिवन शैलीचे ताराचंद बेलजी, रवींद्र सरस्वती महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कथारिया म्हणाले, देशी गोवंशाच्या दिवसेंदिवस घटणाऱ्या संख्येमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. यामुळे आपण विकासाकडे चाललो आहोत की विनाशाकडे असा प्रश्‍न पडतो. देशी गोवंशाकडे आणि आयुर्वेदाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक मानवी आरोग्याच्या शेतीच्या आणि पर्यावरणीय समस्या उद्भवल्या आहेत. यामुळे देशात एम्सच्या मोठ्या प्रमाणावर उभारणी होत आहे. ही शरमेची बाब आहे. भावी पिढीला देशी गोवंशाचे महत्त्व जाणून देण्यासाठी त्यावर शास्त्रीय संशोधन होणे गरजचे आहे. देशी गोवंश संवर्धनाची चळवळ उभी राहत असून, या चळवळीतून ग्रामीण रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात पंचगव्य उत्पादनासाठी योजना आखत आहे. या योजनेतून ग्रामीण बेरोजगारांना कौशल्य विकास, स्टार्टअप आणि स्टॅडअप योजनेतून प्रकल्प उभारले जाणार आहेत. ही योजना केंद्रातील ४० विभागांशी जोडण्यात येणार आहे.  डॉ. भटकर म्हणाले, कि जगात हवामान बदल आणि विषयुक्त अन्न आणि कर्करोग या तीन गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यामुळे २१ व्या शतकात मानव जात राहील की नाही अशी भीती व्यक्त होत असून, यावर जगभरात रोज राष्ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय परिषदा होत आहेत. मात्र या परिषदांमधून उपाय सापडत नाहीत ही आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी गोवंश रक्षण हा अध्यात्मिक मार्ग असून, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतींवर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी मी सर्व आयआटीमध्ये गोशाळा सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या १०० पेक्षा अधिक आयआयटीचे विद्यार्थी यावर संशोधन करत आहेत. तर अध्यात्मिक गुरूंनीदेखील एकत्र येऊन संशोधनाची गरज आहे.  काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले, विषयुक्त अन्नामुळे मानवाची क्रयशक्ती कमी झाली आहे. पूर्वी १०० किलोचे पोते उचलणारा माणूस आता २० किलोचे देखील पोते उचलू शकत नाहीत. अशा आजारी लोकसंख्येवर भारत बलशाली देश बनू शकत नाही. गोवंशाच्या घटत्या संख्येमुळे त्यांच्या शेण आणि गोमूत्रामुळे शेतातील समृद्ध असणारे जिवाणू नष्ट होत आहेत. यामुळे शेतीचे पोषणमुल्ये कमी झाल्याने मानवाच्या आरोग्याबरोबर प्राणी पक्ष्यांच्या आणि जैवविविधतेवरदेखील विपरित परिणाम झाला आहे. यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन होणे ही काळाची गरज ठरत आहे. गीर शिल्लक राहणार नाही  गुजरात प्रचार आणि प्रसारावर आघाडीवर असल्याचे म्हणत गुजरातने गीर गोवंश देशभरात पोचवला. मात्र हे चुकीचे असून, देशात १२७ पर्यावरणीय हवामान विभाग असून, प्रत्येक विभागातील गोवंशाची वेगळी ओळख आहे. हे त्या विभागात चांगल्या पद्धतीने राहतात. त्यामुळे गोवंश इतरत्र स्थलांतर केले तर गुजरात मध्ये गीर शिल्लक राहणार नाही. असे काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले.  देणगी नको, गुंतवणूक करा  सध्या देशी गोवंश संवर्धन ही चळवळ होत असून, अनेक जण यासाठी आपले योगदान असावे म्हणून गोशाळा, पांजरपोळ यांना देणगी देतात. मात्र देणगी न देता या ठिकाणी गुंतवणूक करा आणि व्यावसायिक व्हा, असा सल्लादेखील डॉ. वल्लभ कथारिया यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com