कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदासाठी डॉ. कोकाटे, डॉ. सावंत चर्चेत

कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदासाठी डॉ. कोकाटे, डॉ. सावंत चर्चेत
कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदासाठी डॉ. कोकाटे, डॉ. सावंत चर्चेत

पुणे : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची मुलाखत प्रक्रिया पार पडली आहे. या पदासाठी पाच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यातील  डॉ. किरण कोकाटे व डॉ. एस. डी. सावंत यांची नावे जास्त चर्चेत आहेत.  डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरू पदाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दापोली विद्यापीठाला कुलगुरू मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे कुलगुरू निवड समितीकडून शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल घेतात. त्यानंतर सायंकाळी लगेचच निवडलेल्या कुलगुरूच्या नावाच्या घोषणा राजभवनातून होत असते. यंदा मात्र घोषणा न झाल्यामुळे कृषी शास्त्रज्ञांची उत्सुकता शिगेला गेली आहे.  निवड समिती आधी कोणती पाच नावे राज्यपालांकडे सुचविते याविषयी उत्सुकता असते. या निवड समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा व कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. निवड समितीसमोर १८ कृषी शास्त्रज्ञांनी अर्ज केले होते. कुलगुरू पदासाठी विद्यापीठाच्याच जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम कदम हे आधी जोरदार आघाडीवर होते. मात्र, पहिल्या पाच उमेदवारांमध्येही त्यांचा समावेश झाला नाही. या उलट डॉ. किरण कोकाटे यांचे नाव मागे असताना अंतिम मुलाखतीत ते कुलगुरू पदाचे प्रबळ दावेदार ठरले.  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पाचही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठाचे डॉ. किरण कोकाटे व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (ता. बारामती) चे संचालक डॉ. नरेंद्र प्रताप सिंह तसेच दापोली विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. जी. भावे व दापोली कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर यांचा समावेश होता.  दरम्यान, राज्यपालांकडून अंतिम नावाची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. राज्याचा अर्थसंकल्प तसेच भारत-पाक तणावामुळे कुलगुरू निवड प्रक्रियेबाबत काही बाबी मागे पडल्या होत्या, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  डॉ. कोकाटे कायम उमेदवारच कसे? ‘‘देशाच्या सर्व कृषी विद्यापीठांची मातृसंस्था म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेचा उल्लेख केला जातो. या परिषदेवर उपमहासंचालक म्हणून महाराष्ट्रातून कामकाज केलेले डॉ. कोकाटे हे सध्याचे एकमेव कार्यरत शास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली. विविध कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून अंतिम पाच उमेदवारांमध्ये डॉ. कोकाटे यांना बोलावले जात असते. मात्र, अंतिम निवडीत वेगळेच नाव समोर येतो. त्यामुळे डॉ. कोकाटे कायम उमेदवार असतात; पण निवडले का जात नाहीत,’’ असा सवाल शास्त्रज्ञांचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com