कांदा बाजार व्यवस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष : डॉ. कीर्ती सिंह

कांदा चर्चासत्र
कांदा चर्चासत्र

पुणे : देशातील कांदा पिकाच्या संशोधनात शास्त्रज्ञांनी प्रगती केली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, बाजार व्यवस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्या समस्येवर शास्त्रज्ञ काहीही करू शकत नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कीर्ती सिंग यांनी दिला.  ‘कांदा, लसूण संशोधनातील आव्हाने व संधी’ या विषयावर यशदात आयोजित केलेल्या जागतिक पातळीवरील चर्चासत्राचे उदघाटन करताना ते बोलत होते. आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, सहायक उपमहासंचालक डॉ. जानकीराम, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, कांदा लसूण संशोधन संचालनालय शास्त्रज्ञ डॉ. मेजर सिंग, शास्त्रज्ञ डॉ. विजय महाजन व्यासपीठावर होते.  आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद, राजगुरूनगर येथील कांदा लसूण संशोधन संचालनालय व भारतीय कांदा लसूण सोसायटीच्या वतीने या चार दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘‘कांद्याचे विविध वाण तयार करणे, लागवड तंत्राचा विकास आणि पीक संरक्षणाच्या विविध पद्धती शोधणे असे फक्त तीन मुद्दे संशोधकांच्या कक्षेत येतात. त्यात संशोधक आपआपल्या पद्धतीने पुढे जात आहे. मात्र, बाजार व्यवस्थेमुळे शेतक-यांना लाभ मिळत नाही. बाजार व्यवस्थेचा मुद्दा कृषी शास्त्रज्ञांच्या कक्षेत नाही. तो सरकारचा मुद्दा आहे. पण सरकार लक्ष देत नाही,’’ अशी टीका डॉ. सिंह यांनी केली.  मूलभूत संशोधनाचे आव्हान कायम  देशाच्या कृषी संशोधन जगतात मानाचे स्थान असलेल्या डॉ. कीर्ती सिंह यांनी शास्त्रज्ञांचेही कान उपटले. ‘‘एनएचआरडीएफ, कांदा संशोधन संचालनालयाने केलेले कामकाज विसरता येणार नाही. मात्र, आपण शेतकऱ्यांना अद्यापही संकरित कांदा वाण देऊ शकलो नाही. उत्तर भारतात खरीप कांदा उत्पादनाला संधी आहे. पण, आपण फक्त महाराष्ट्रावर अवलंबून आहे. इशान्य भारतातदेखील लागवड वाढलेली नाही. लडाख, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड भागात वाण देता आलेले नाही. पांढरा कांद्याचे चांगले वाण अजूनही प्रक्रियेसाठी उपलब्ध नाही. शास्त्रज्ञ सध्या चांगले काम करीत आहेत. मात्र, परिश्रम जादा केल्याशिवाय मूलभूत संशोधनातील आव्हान कायम राहील,’’ असेही त्यांनी नमूद केले. 

कांदा समस्येसाठी व्यासपीठ हवे  ‘‘देशातील कृषी शास्त्रज्ञांमुळे कांदा उत्पादन २३० लाख टनाच्या पुढे गेले आहे. साठवणक्षमता चार लाखांहून २० लाखांवर गेली. मात्र, ही क्षमता ४० लाख टनापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीने संशोधन आता सोडावे लागेल. कांदा शेतीत यांत्रिकीकरण, चांगले वाण, बाजारपेठांचा अभ्यास अशा सर्व विषयांमध्ये काम करावे लागेल. अर्थात, त्यासाठी धोरणकर्ते,शेतकरी, संशोधक व शासनाने एकत्रित काम करून व्यासपीठ तयार करावे लागेल,’’ असे मत माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी व्यक्त केले.  

कांदा मंडळाची स्थापना करा ः डॉ. विश्वनाथा कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी देशात कॉफी बोर्ड प्रमाणेच कांद्यासाठीदेखील ओनियन-गार्लिक बोर्डची स्थापना करण्याची मागणी केली. ‘‘कांदा कापताना रासायनिक क्रियेमुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी येते. मात्र, कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येते हे दुर्दैव आहे. कांद्यात आता उत्पादन ही समस्या अतिरिक्त उत्पादन कसे हाताळावे हाच मोठा प्रश्न आहे. कांद्याचा महापूर रोखण्यासाठी सतत सर्व्हेक्षण होण्याची ची गरज आहे. भावपातळी, बाजार अभ्यास, संशोधनासाठी पाठपुरावा यावर उपाय म्हणून ओनियन-गार्लिक बोर्डची स्थापना करावी, असा मुद्दा डॉ. विश्ननाथा यांनी मांडला. 

संशोधनाची दिशा बदला ः डॉ. सिंग आयसीए-आरचे उप महासंचालक डॉ. ए. के. सिंग म्हणाले, की शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी संशोधनात्मक कशी मदत करायची हे आव्हान आहे. काढणीपश्चात नुकसान मोठे आहे. देशात सर्वात जास्त कांद्याचा वापर पंजाबात होतो. मात्र, उत्पादन होत नाही. नाशिकचा कांदा पंजाबात जात होता. त्यासाठी हजारो रुपये ट्रकभाडे जातेच; पण इंधन जळते व निसर्गाची हानी होते. त्यामुळे प्रांतीय गरजेनुसार नव्या वाणांची निर्मिती करावी लागेल. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यासाठी संशोधकांनी दिशा बदलावी लागेल. शास्त्रज्ञांनो स्वतःला वृद्ध समजू नका.. पुणे ही देशाच्या कृषी कुलगुरूंची रोपवाटिका आहे. इथे १५ कुलगुरू सध्या रहातात, असे गौरवोद्गार डॉ. कीर्ती सिंह यांनी काढले. ‘‘कृषी शास्त्रज्ञ हे कधीही वृद्ध होत नाहीत. तुम्ही कधीही स्वतःला वृध्द समजू नका. निवृत्तीनंतरदेखील तुम्ही घरात देखील अभ्यास, संशोधन करायला हवे. निवृत्तीनंतरही तुम्ही तुमच्या संशोधनाचा विषय सोडून देवू नका. तो सोडताच तुम्ही वृद्ध बनता, असा मोलाचा सल्ला देत डॉ. सिंह यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना एक शेर ऐकविला. ते म्हणाले.. बहारे अपनी यादों की हमारे साथ रहने दो.. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com