पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे

पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव चितळे

अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या प्रक्रियेत पाण्याचा वापर वाढेल. समृद्धीचे नागरिकीकरण, कारखानदारी हे भाग आहेत. पुढील दहा वर्षात यासाठी पाणी लागेल. यासाठी लागणाऱ्या पाण्याचे वाटप कसे असावे यावर चर्चा होणे खूप गरजेचे आहे, असे मत अभ्यासक डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले. येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या २० व्या सिंचन परिषदेचा रविवारी (ता. १९) समारोप झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. चितळे बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. विलास भाले, सिंचन परिषदेचे डॉ. दि. मा. मोरे, डॉ. बापू आडकिने, डॉ. सुधीर वडतकर, डॉ. महेंद्र नागदेवे उपस्थित होते. डॉ. चितळे म्हणाले की, देशाच्या शेती विकासाची गती दोन ते तीन टक्क्यांदरम्यान राहिलेली आहे. ही गती वाढवून इतर क्षेत्राच्या बरोबरीने कसे येता येईल हा आपल्यासाठी चिंतनाचा विषय आहे. जगातील काही देशांची विकासाची गती आपल्यापेक्षा सरस आहे. चीनसारख्या देशाची ही गती आपल्यापेक्षा तिप्पट चौपट आहे. यासाठी आपल्याला चीनचा अभ्यास करावा लागेल. आपल्याकडे अनेक उपलब्धी आहेत, परंतु आपण त्या दृष्टीने विचार केलेला नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने भारताचे स्थान खालावले आहे. कुठल्याही नद्या बघितल्या तर त्या दूषित झाल्याचे बघायला मिळते. पर्यावरणाचे आक्रमण हा मोठा शत्रू आगामी काळात ठरू शकतो. यासाठी काही उपाय शोधावे लागतील. यापुढील काळात नागरी उद्योग, शेतीसाठीच्या पाण्यासोबतच पर्यावरणाकडे एक घटक म्हणून बघावे लागेल. जसजसा विकास होत जाईल, तसे कृषीसाठीचे पाणीही पर्यायाने कमी होत जात जाईल. हे सत्य स्वीकारावे लागले. हा बदल स्वीकारून आपल्याला नवीन पर्यायाच्या दृष्टीने पुढे जावे लागेल. वेळ प्रसंगी आपली पीकपद्धती असेल, नवीन बी-बियाणे, तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पर्याय असतील या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे. जग या बाबतीत विचार करीत पुढे निघाले आहे. या समारोपीय सत्रात डॉ. मोरे यांनी परिषदेचा आढावा घेतला. २१ व्या परिषदेसाठी सांगोला, पोपटराव पवार, नाशिक व इस्लामपूर यांच्याकडून आमंत्रण आल्याचे सांगितले. डॉ. मोरे यांनी परिषदेत दिले जाणारे लेखन पुरस्कारही जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आडे यांनी केले. 

नव्या पिढीला समृद्धीचीच स्वप्ने पडावीत डॉ. चितळे म्हणाले,  समृद्धीला जग मानते. आपणही आपल्या नव्या पिढीला अशी समृद्धीचीच स्वप्ने कशी पडतील अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आपणाला यासाठी सार्वत्रिक क्षेत्रांमध्ये काम करावे लागले. देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी तशा प्रकारच्या पीक पद्धती विकसित कराव्या लागतील.  निसर्गाला अभिप्रेत असलेले काम करीत एक दिग्विजय पिढी उभी करावी लागेल. नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा टप्पा डॉ. चितळे म्हणाले, ‘‘देशात नदीजोड प्रकल्प हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गोदावरीचे पाणी कृष्णेला जोडले जात आहे. देशात ३० नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत. असाच प्रयत्न विदर्भात वैनगंगेचे पाणी पश्‍चिम विदर्भात आणण्यासाठी होणे गरजेचे आहे. हे पाणी इकडे कसे आणता येईल, यासाठी शास्त्रज्ञांनी या विषयाला हात घातला पाहिजे. पाणीवाटपात राष्ट्रीय बदल होत आहेत. यावर चर्चा व्हायला हवी.’’ या भागातील खारपाण पट्ट्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मोठी कर्तबगारी दाखविण्याची गरज अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com