दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः जलसंधारणमंत्री डॉ. सावंत

पुरस्कार
पुरस्कार

पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव योजनेच्या चळवळीने दिशा मिळते आहे. त्यामुळे पोपटराव पवार यांना बरोबर घेत १०० गावे दरवर्षी आदर्श करण्याचे वचन मी तुम्हाला देतो आहे, अशी घोषणा जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली. आदर्श गाव योजनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘आदर्श गाव भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, मृद्संधारण संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादासाहेब सप्रे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जलसंधारण विभागाचे अवर सचिव रवी व्हटकर उपस्थित होते. मृद व जलसंधारण मंत्रालयाच्या या उपक्रमातील राज्यस्तरीय पाच लाखांचा पहिला पुरस्कार यंदा यवतमाळच्या कोठोडा गावाने पटकावला. ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कोठोडा गावाचे यश पाहून सभागृहाने ग्रामस्थांचे कौतुक केले. आदर्श गावे आणि त्यासाठी झटणाऱ्या संस्था व व्यक्तींना टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार देण्यात आले.   “शासनाची मदत घेताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मदतीविना मी स्वतः उस्मानाबाद जिल्ह्यात कशी कामे केली याची माहिती अवश्य तुम्ही घ्यावी. मी मंत्री नसतानाही जलयुक्त शिवाराला पर्यायी ठरणारी अशी कामे शिवजलक्रांती योजनेतून केली. २०१६ मध्ये आम्ही १४८ किलोमीटरचे नाला खोलीकरण केले. त्यामुळे साडेचार टीएमसी पाणी साचले. ही कामे आता साडेपाचशे किलोमीटरच्याही पुढे जातील. त्यामुळे सामूहिक संकल्प केल्यास गावांचा विकास दूर नसतो,” असे सावंत म्हणाले.

राज्यकर्त्यांशिवाय चळवळ पुढे जाणार नाही ः पवार आदर्श गावासाठी पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळेल, अशा शब्दांत पोपटराव पवार यांनी जलसंधारणमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “हिवरे बाजारला १९९७ आदर्श गावचा पुरस्कार मिळाला. तो घेण्यासाठी मी व्यासपीठावर गेलो होतो. पुढे त्याच योजनेचा कार्याध्यक्ष म्हणून संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते. १९९२ ते २०१९ या काळात आदर्श गावे का वाढली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आम्ही योजनेतून अनेक गावे आदर्श केली. मात्र, प्रसिद्धी न करता कामे सुरू ठेवली. त्यामुळे आदर्श गावांची संख्या वाढली आहे. मात्र, राज्यकर्ते ठरवीत नाहीत तोपर्यंत ही चळवळ पुढे जाणार नाही.” पुरस्कारार्थींची नावे अशी उत्कृष्ट आदर्श गाव ः प्रथम - कोठोडा (ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ), द्वितीय - मौजे शेळगाव गौरी(नायगाव, जि. नांदेड), भागडी (आंबेगाव, जि. पुणे), तृतीय - गोधनी (उमरेड, जि. नागपूर), वीरसई (दापोली, जि. रत्नागिरी). उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था ः प्रथम - ज्ञानशक्ती विकास वाहिनी (मंचर, आंबेगाव, जि. पुणे), द्वितीय - प्रादेशिक बहुउद्देशीय शिक्षण व आरोग्य सेवा संस्था (गोधनी, उमरेड, जि. नागपूर), तृतीय - विकास सामाजिक संस्था (वरोरा, जि. चंद्रपूर). उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता ः प्र थम - सुनील पावडे (कोठोडा, पांढरकवडा, जि. यवतमाळ), द्वितीय - काशिनाथ शिंपाळे (शेळगाव गौरी, नायगाव, नांदेड), तृतीय - परम काळे (गोधनी, उमरेड, जि. नागपूर), ज्ञानेश्वर उंडे (भागडी, आंबेगाव, जि. पुणे) गावांची निवड तावूनसुलाखून ः डवले जलसंधारण सचिव श्री. डवले यांनी आदर्श गाव योजनेत निवडली जाणारी गावे तावूनसुलाखून घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. “आदर्श गाव योजनेत पाणलोट नियोजनाला महत्त्व दिले गेले आहे. मधल्या काळात उपक्रम थोडे संथ झाले होते. मात्र, पोपटराव पवार यांनी या चळवळीला वेग दिला आहे. आदर्श गाव संकल्पनेत केवळ हिवरे बाजार व राळेगणसिद्धीचीच चर्चा का होते, असा प्रश्न विचारला जात असे. मात्र, राज्यात १०३ गावे आदर्श म्हणून पुढे येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानात रब्बी इंडेक्स किंवा वॉटर बजेटची संकल्पना हिवरे बाजारच्या प्रयोगातूनच घेण्यात आली,” असे श्री. डवले यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com