‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भाले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास मधुकरराव भाले
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास मधुकरराव भाले

मुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शनिवारी (ता.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती जाहीर केली.  डॉ. विलास भाले हे सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या दिवसांपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. यामुळे गेले काही दिवस लागलेली या नियुक्तीबाबतची उत्सुकता पूर्ण झाली. डॉ. रविप्रकाश दाणी यांना नागरिकत्वाच्या मुद्यावर राज्यपालांनी पदमुक्तीची कारवाई केल्यानंतर परभणीचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू विद्यापीठाचा पदभार पाहत अाहेत. अाता नवीन कुलगुरुपदी डॉ. भाले यांची पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे.  कुलगुरुपदाच्या व्यक्तीची निवड करण्यासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कुलगुरू शोध समितीचे गठण करून पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कुलगुरू शोध समिती सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत एल. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली होती. या समितीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक त्रिलोचन महापात्रा आणि राज्याचे कृषी व पणन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार हे दोन सदस्य होते. या समितीने पात्र व्यक्तींचे अर्ज मागविले असता २२ जणांनी अर्ज केले. त्यातून अंतिम पाचमध्ये विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. विलास भाले, दापोलीचे डाॅ. यू. व्ही. महाडकर, अमरावती येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले,  डाॅ. ए. के. चौधरी,  डाॅ. वीरेंद्रकुमार सिंग या पाच जणांना शुक्रवारी राज्यपालांनी सादरीकरणासाठी बोलावले होते. त्यातून डॉ. भाले यांच्या नावाची जवळपास दहा दिवसांनंतर घोषणा करण्यात अाली.  कुलगुरुंसमोर असंख्य अाव्हाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कारभार विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये चालतो. अमरावती व नागपूर या दोन विभागांची पीकपद्धती वेगवेगळी असून त्यादृष्टीने संशोधन, वाण, तंत्र देण्याची जबाबदारी कुलगुरू या नेतृत्वाकडे येते. सध्या विद्यापीठाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप तसेच अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. हे प्रकार थांबविताना विद्यापीठाच्या संशोधनाची दिशा ठरविण्याची जबाबदारी या कुलगुरुंच्या खांद्यावर येणार अाहे. शेतकरी अात्महत्यांचा हा प्रदेश सातत्याने देशभर चर्चेत असतो. विविध पॅकेज, कर्जमाफी देऊनही शेतकरी अात्महत्यांवर नियंत्रण मिळवता अालेले नाही. विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे अाहे, अशा प्रकारच्या टीकांना सामोरे जावे लागत अाहे. एकूणच याला छेद देत नव्या उमेदीने या विद्यापीठाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग कसा होईल याची जबाबदारी नव्या कुलगुरुंना स्वीकारावी लागणार अाहे.  प्रदीर्घ अनुभव डॉ. विलास भाले यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५७ मध्ये झाला. त्यांनी १९९२ मध्ये गांधी कृषी विज्ञान केंद्र (जीकेव्हीके), बंगळूर येथून ‘अॅग्रोनोमी’ या विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रात एकूण ३७ वर्षांचा अनुभव आहे.डॉ. विलास भाले यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची संशोधन प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. भाले हे इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनोमी या संस्थेचे फेलो अाहेत. त्यांना ‘डॉ. अब्दुल कलाम जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ उमेदवारांनी पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ. विलास भाले यांनी १३ पुस्तके लिहिली अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com