‘गुगलेश्वरा’मुळे कृषी विद्यार्थी भाग्यवान : डॉ. विश्वनाथा

Dr. vishnatha
Dr. vishnatha

पुणे: “आम्ही कृषी शिक्षण घेताना शिक्षक आणि साधनांची कमतरता होती. पण, विद्यार्थ्यांनो तुम्ही भाग्यवान आहात. लॅपटॉप आणि मोबाईलच्या रूपाने ‘गुगलेश्वर’ हा सर्वात मोठा गुरू कायम तुमच्या सोबत आहे. देशाच्या समृध्दीसाठी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात अजिबात मागे राहू नये,”असे आवाहन महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले. राहुरी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावर आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वाय. जी. फुलपगारे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, उपप्रमुख डॉ. एम. जी. शिंदे, तसेच विदेशी शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.   ग्रामीण भागातून पुढे येत विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी आलेले २० विद्यार्थी नुकतेच थायलंडहून परतले आहेत. यंदा आणखी ४० विद्यार्थी मलेशियात तर २० विद्यार्थी थायलंडला जाणार आहेत. कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांना भाग्यवान म्हणत त्यांना अभिनंदन केले. “मी कुलगुरू असूनही अजून अमेरिकादेखील पाहिलेली नाही. पण, माझे विद्यार्थी शिकण्यासाठी अमेरिकेला जातात ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. जगातील कृषी तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही प्रत्येक टप्प्यावर काळजी घेत आहोत,” असे कुलगुरू म्हणाले.  सावध व्हा..आव्हाने वाढली आहेत “कृषी क्षेत्रातील शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही पातळ्यांवर आव्हाने वाढली आहेत. आमच्या काळात असे तंत्रज्ञान आणि आव्हानेही नव्हती. मात्र, आता जग भविष्यात काटेकोर शेती आणि कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या शेतीकडे झुकणार आहे. जागतिककरणाचा वेग अफाट आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः विद्यार्थी म्हणून भरपूर ज्ञान आत्मसात करा. अभ्यासक व तज्ज्ञांचे ऐका, प्रश्न विचारा आणि शेतकऱ्यांसाठी चांगले काम करा,” असाही सल्ला कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com