पॉलिहॉउस शेडनेटधारकांची बुधवारी कर्जमुक्ती परिषद

पॉलिहॉउस शेडनेटधारकांची बुधवारी कर्जमुक्ती परिषद
पॉलिहॉउस शेडनेटधारकांची बुधवारी कर्जमुक्ती परिषद

नगर : संकटात सापडलेल्या पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर येथे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या कर्जमुक्ती परिषदेसाठी राज्यभरातून हजारो पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.  नगर येथील सैनिक कल्याण समिती लाॅन्स  येथे सकाळी ११ वाजता होत असलेल्या या परिषदेमध्ये शेडनेट पॉलिहाउस धारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढण्याबाबत तयारी केली जाणार आहे. उद्योग तोट्यात गेल्याने बँका उद्योगांना कर्जात सूट देतात त्याच धर्तीवर पॉलिहाउस शेडनेट धारकांना तोट्यात गेल्यावर कर्जात सूट मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयात यासाठी दाद मागणे आवश्यक आहे. तोट्यात गेलेल्या पॉलिहाउस शेडनेटधारकांनी या न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी सुरू केली आहे. परिषदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्हावार याद्या बनवून अशा शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात दाद मागण्यांबाबत कार्यवाही केली जाणार आहे. संकटग्रस्त पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांनी यासाठी आपला सातबारा उतारा, बँकेचे कर्ज स्टेटमेंट सोबत घेऊन यावे असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठीचे अर्जही या वेळी भरून घेतले जाणार आहेत. पॉलिहॉउस शेटनेटधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समितीच्या पुढाकाराने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. बैठकीत कर्जबाजारी शेडनेट पॉलिहाउसधारकांच्या याद्या व माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून गोळा करण्याबाबत निर्णय झाला आहे. कृषी राज्य मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. परिषदेत या निर्णयांची माहिती देऊन आगामी कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार आहे. पॉलिहॉउस शेटनेटधारक शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पॉलिहॉउस शेटनेटधारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर, अण्णा सुंब, शिवाजी तळेकर, अनिरुद्ध रेडेकर, शिवाजी नाईक, संजय तळेकर, नामदेव जाधव, विकास वाघ, भालचंद्र दौंडकर, वासुदेव चौधरी आदींनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com