दुष्काळामुळे यंदा होत्याचं नव्हतं झालं

वर्धा दुष्काळ
वर्धा दुष्काळ

जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा, गहू घेणे शक्‍य नाही. खरीप हंगामातदेखील सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाची गरज होती. त्याचवेळी पावसाने दगा दिल्याने होत्याचे नव्हते झालं. माझ्याकडे अवघी चार एकर शेती. दोन एकरांतून वीस किलो सोयाबीन अन् दोन क्‍विंटल कापूस झाल्याचे पाणावलेल्या डोळ्यांनी काकडा येथील शेतकरी चंद्रशेखर कपारे सांगत होते.  `सार कसं सामसूम तरंग नाही तलावात'' ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या या ओळीच वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचे वर्णन करण्यासाठी पुरेशा आहेत. निकषाप्रमाणे कारंजा घाडगे, आष्टी, समुद्रपूर या तीनच तालुक्यांत दुष्काळ असल्याचे शासन दप्तरी नोंदविण्यात आले असले तरी उर्वरित पाच तालुक्‍यातही परिस्थिती बरी नाही !

कारंजा घाडगे तालुक्‍यात प्रकल्प कोरडे कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये यावर्षी पाण्याअभावी आतापासूनच मारामार सुरू आहे. कार नदी प्रकल्प हा या तालुक्‍यातील अनेक गावांसाठी संजीवनी ठरतो. यावर्षी कमी पावसाच्या कारणामुळे या प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेरीस केवळ ३० टक्‍के जलसाठा उरला आहे. पिण्याकरीता तो आरक्षित करण्यात आल्याने शेतीसाठी पाण्याचे आरक्षण प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सारे गणितच बिघडल्याचे काकडा येथील चंद्रशेखर कपारे सांगतात. 

वावरात उरला कोंबडा (तण) अशोक सरोदे व त्यांच्या भावाची मिळून सहा एकर शेती. खरिपात त्यांनी कपाशी लागवड केली होती. पाण्याअभावी एकरी दोन क्‍विंटलची उत्पादकता झाल्याचे ते सांगतात. कापसाच्या लागवड खर्चाची भरपाईबी झाली नाही, असे ते सांगत होते. विहिरीने तळ गाठला, कालव्यात पाणी सोडत नाहीत, मग शेती पिकवावी कशी या विवंचनेत असलेल्या अशोक सरोदे यांनी आता दुसऱ्यांकडे मजुरी कामाला जाण्यास सुरवात केली आहे. घरच्या गरजा भागवाले, पैसा त मिळल, असे कारण ते यामागे देतात. लेकरायची शाळा, दवाखान्याचा खर्च, किराणा दुकानदाराची उधारी या साऱ्याले  पैसाच लागते. तो कोठून आणावं? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.  तुषार संच दुसऱ्याला दिला अशोक सरोदे यांचा भाऊ साहेबरावने तर शेती यावर्षी पडीकच ठेवली. त्यामुळे संपूर्ण अडीच एकर शिवारात कोंबडा (तण) उगवले होते. शेतीला पाणी मिळणे कठीण असल्याने त्यांनी आपल्या शेतातील तुषार संच आणि त्यासाठीचे पाइप इतर शेतकऱ्याला वापरण्याकामी दिले. जुनापाणी येथील विठ्ठल भस्मे यांना सरोदे भावंडांनी आपल्या शेतातील पाइप आणि तुषार संच तसेच वापरण्याकामी दिले. आपला नाही तर इतर शेतकऱ्यांचा काय तो फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.  विहिरीला पाणी जेमतेम विठ्ठल भस्मे यांची चार एकर शेती. दरवर्षी ते या क्षेत्रात गहू लावतात. पाणी नसल्याने गव्हाऐवजी काही अंशी कमी पाण्यात येणारा हरभरा लावणार असल्याचे त्यांनी सांगीतले. परंतू विहिरीला पाणी जेमतेम असल्याने तुषारच्या माध्यमातून ते देता यावे याकरीता त्यांनी एखाद्या शेतकऱ्याकडे उपलब्ध संचाची चाचपणी चालविली होती. अशोक सरोदे यांच्याकडे तुषार संच आहे आणि ते यावर्षी पाण्याअभावी कोणतेच रब्बी पीक घेणार नसल्याचे समजल्यावर विठ्ठलरावांनी त्यांच्याशी संपर्क साधला; शेतकरी भावंडालाच मदत होते म्हणून अशोक सरोदे यांनीदेखील त्यांना तत्काळ तुषार संच देण्यास सहमती दर्शविली. दोन एकर सोयाबीनवर फिरविला रोटाव्हेटर पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा किंवा गहू घेता येईल असा विचार काकडा गावातील महादेव न्याहरे यांचा होता. दोन एकर शेतीच्या त्यांच्या उपजीविकेचे साधन. पण खरिपातच पाण्यानं दगा देला अन् सोयाबीनला फुलोरच धरला नाई. दोन एकरातून काईच हाताला लागणार नाई ! हे समजलं अन् दोन एकरावर रोटाव्हेटर फिरवला, असे खिन्न मनाने महादेव सांगत होता. गावातील असे अनेक समदुःखी शेतकरी आपल्या वेदना एकमेकांसोबत व्यक्‍त करत होते. पुढे कस ! हाच विचार प्रत्येकाच्या डोक्‍यात होता. काकडा गावातील काही शेतकऱ्यांना काही किलो सोयाबीन उत्पादकता झाली होती. सतीश किनकर याची अवस्थादेखील गावातील इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी नव्हती. अडीच एकर इतकीच जमीन असलेल्या सतीशला पाण्याअभावी शेती पेरताच आली नाही.   प्रशासनाच्या अहवालात सारे आलबेल दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असतानाच प्रशासनाने मात्र नव्या निकषांच्या आधारावर तयार अहवालात सारे आलबेल असल्याचे वर्णन केले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या रॅण्डम पीक पाहणीत समुद्रपूर तालुक्‍यातील पीक परिस्थिती चांगली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. पहिल्या दुष्काळसदृश गावाच्या यादीत देवळी, समुद्रपूर, आष्टी व कारंजा या चार तालुक्‍यांचा समावेश होता. त्यानंतर देवळीला वगळण्यात आले. उरलेल्या तीन गावांपैकी परत समुद्रपूरची स्थिती चांगली दर्शविण्यात आल्याने महामदत ॲपवरील नोंदीनुसार हा तालुका दुष्काळ यादीतून वगळला जाण्याची भिती वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत ३० ते ५० टक्‍के दरम्यान दोन लाख ३४ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पीकाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला गेला आहे. या अहवालानुसार कारंजा, आष्टी या दोन तालुक्‍यात मध्यम तर समुद्रपूर तालुक्‍यात सामान्य दुष्काळस्थिती असल्याचे प्रशासन सांगते. प्रशासनाच्या या अहवालामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत असून दुष्काळात तेराव्या महिन्याची भर प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेने घातल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com