सांगली : दुष्काळ मोठा; उपाययोजना अपुऱ्या

सांगली : दुष्काळ मोठा; उपाययोजना अपुऱ्या
सांगली : दुष्काळ मोठा; उपाययोजना अपुऱ्या

सांगली ः दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला असला, तरी होणाऱ्या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ११३ गावे आणि ७६९ वाड्यांमध्ये १५९ टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जत तालुक्यात सर्वाधिक ९८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. 

गतवर्षी पावसाळ्यात सुरवातीला पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर पावसाने पाठच फिरविल्याने आता तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या बोअर, विहिरीमधले पाणी दिवसेंदिवस कमीच होत चालले आहे. तलाव तर गत चार वर्षांत भरलेच नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ लोकांवर आली आहे. माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून टँकरची सोय केलेली असली तरी त्यामध्ये जनावरांच्या पाण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी जनावरांची विक्री करण्यास सुरवात केली आहे. काही लोकांनी जनावरे नदीकाठावर असणाऱ्या पाहुण्यांकडे पाठवली आहेत.

जिल्ह्यातील काही भागांमध्ये सिंचन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या भागात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कवठेमहांकाळ, खानापूर व तासगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील गावांमध्ये अद्याप कोणत्याच सिंचन योजना पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंतीशिवाय कोणताच पर्याय नाही. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तासगाव तालुक्यातील जरंडी, यमगरवाडी, वायफळे, दहीवडी, खानापूर तालुक्यातील पळशी, हिवरे, करंजे या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असताना, सिंचनासाठी तर पाणी मिळणे अशक्य होऊन बसले आहे. परिणामी, द्राक्षबागा या वर्षी हाताला लागण्याची शक्यता नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुकानिहाय टॅंकरची संख्या
तालुका टॅंकर संख्या
जत ९४
आटपाडी २९
कवठेमहांकाळ १०
खानापूर १४
तासगाव
मिरज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com