आंबेगाव तालुक्यातील बागायती पट्ट्यात प्रथमच दुष्काळाच्या झळा

घोड नदीवरील बंधारा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे
घोड नदीवरील बंधारा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे

महाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍यातील घोड नदीवर असलेले बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. बंधाऱ्यालगत असलेले जलस्रोत आटल्यामुळे शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न शेतकऱ्यांना खुणावू लागला आहे. कळंब, चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, एकलहरे, साकोरे, चास या बागायती पट्ट्याला प्रथमच दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसू लागल्या आहेत. 

चास, वडगाव काशिंबेग, कळंब, चांडोली बुद्रुक येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दरवर्षी उन्हाळ्यातही तुडुंब भरलेले असायचे. त्यामुळे शेतकरी शाश्‍वत पाणी उपलब्ध झाल्याने टोमॅटो, वांगी, दुधी भोपळा, कारली आदी तरकारी पिके घेत. तसेच या भागात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे चास, महाळुंगे पडवळ, साकोरे, कळंब, एकलहरे, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी व चांडोली बुद्रुक आदी बागायती पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गवत, मका व अन्य चारा सुकू लागला आहे. येत्या १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

चास ते चांडोली बुद्रुक या १५ किलोमीटर अंतरात घोड नदीच्या काठावर चार कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे ५०० हून अधिक विहिरींना पाणी उपलब्ध होते. तसेच कृषी पंपांच्या विद्युत मोटारीद्वारे एक हजार शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. त्याद्वारे लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. परंतु यंदा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीत शिरूर तालुक्‍यासाठी सोडल्याने बंधाऱ्याच्या एका बाजूचे ढापे काढून पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे १५ दिवसापूर्वी बंधाऱ्यांमध्ये मुबलक असलेला पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com