'दुष्काळ'नामा : बीड जिल्हा : नांगरलेली शिवारं अन्‌ सुन्न गावं (video सुद्धा)

यंदा दुष्काळानं लई अवघड झालं. पाणीच नाही राह्यलं प्यायला. दोन दिवसाआड कसाबसा एक टिप भरून आणतोय शेतातून. दोन महिन्यांपासून हे असंच सुरू हाय. - पांडुरंग मुळे, पांढरवाडी ता. गेवराई.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती
बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती

बीड ः छावण्यांचा सुकाळ तर पाणी, अन्नधान्य, रोजगाराचा दुष्काळ. पीक आलंच नसल्याने धान्याचा तुटवडा. सारं विकत घेऊन खाण्याची वेळ. कर्जमाफीचं भिजत घोंगड, विमा परतावा कुठं मिळाला कुठं नाही. पदरी दमडी नाही तर मग खरिपाची सोय लावावी कशी, लगोलग सुरू होणाऱ्या शाळा पाहता मुलांची शिक्षणं, त्यांना लागणारं साहित्य घ्यावं कसं, हे सर्व करून उदरनिर्वाह कसा भागवावा याची चिंता आता दुष्काळानं होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सतावते आहे. त्यामुळं बव्हंशी नांगरलेली शिवारं अन्‌ गावं सुन्न झाली आहेत. पाऊस पडल्याशिवाय हालचाली गतिमान होण्याची चिन्हं नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. जवळपास सहाशे चारा छावण्या सुरू झाल्याने जिल्ह्यातील चार लाखांवर जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न तूर्त सुटला आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पिण्यासाठी म्हणून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या दर्जावर ग्रामस्थांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे टॅंकरही सुरू असले तरी नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. बीड जिल्ह्यातील दुष्काळस्थिती, प्रत्यक्ष पहा (video)

यंदा दुष्काळामुळे उसतोडणी व मजुरीसाठी आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड, वडवणी, केज आणि गेवराई या तालुक्‍यांतून जवळपास ३० ते ४० टक्के स्थलांतर झाले. जे शेतकरी व शेतमजूर उसतोडीसाठी बाहेर गावी गेले त्यातील काही मजुरांनी गावी परतून तरी काय करावं म्हणून तिकडेच काम शोधण्याला पसंती दिली. तर जे गावी परतले त्यांची परवड वाढली आहे. परत आलेल्या मजुरांपैकी ५ ते १० टक्के मजुरांनी परत पुणे, मुंबई व औरंगाबादसह अन्य ठिकाणी रोजगार शोधण्याला पसंती दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. दुष्काळी कामे सुरू नसल्याने हाताला काम नाही म्हणून स्थलांतराचे प्रमाण वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मजुरी उपलब्ध करून देण्याबाबत कुणी चकार शब्द काढत नाही. हाताला कामाची मागणी वा तशी गरज असताना याविषयी शासन गंभीर का नाही हा खरा प्रश्न आहे.

कर्जमाफीचं भिजत घोंगडं तीन वर्षांपासून शेतीतून एक रुपयाचा आधार नाही. अंगावर ५१ हजार कर्ज आहे. माफ केलं सरकार म्हणते, पण त्याचं ८ ते ९ हजार व्याज हाय ते भरा म्हणते. पुन्हा पीककर्ज द्यायला, तुमची वय झाली म्हणते. शेतीचे सात बारा घेत नाय. वय जरी झाली तरी आम्हाला पाहून कर्ज देतात का, व्याज भरायला नाही, त्यामुळं कर्जमाफीचं भिजत घोंगडचं हाय. पेरणी कशी करू, सगळं निल केलं असतं तर मला कर्ज घेता आलं असतं ना. दहा वर्षांपासून कर्ज नवंजुनं करत आलो. गेवराई तालुक्‍यातील राजपिंप्रीचे ज्ञानदेव हराळे कर्जमाफीविषयी आपली व्यथा मांडत होते. राजपिंप्रीचे गुलाबराव जुंबड यांनीही त्यांच्याकडील कर्जाची कहाणी मांडली. ते म्हणाले, कर्ज काढलं ९० हजार, थकीत झाल्यानं व्याज मिळून ते १ लाख ४० हजार झालं व्हतं. दीड लाखापर्यंत माफी झाली म्हणतात, वरलं भरा म्हणते काही, आम्ही ते शिल्लक आलेले भरले नाही, पैसेच नाही. बारा एकर शेती, तिची सोय आता विम्यावरच अवलंबून. ते बी पाणी पडल्यावरच शेतीची काय ती सोय लावावी लागलं.

चाऱ्यासाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून गेवराई तालुक्‍यातील खळेगाव येथील चारा छावणीचालक बाळासाहेब आहेर म्हणाले, जवळपास दोन महिन्यांपूर्वी छावणी सुरू केली. तेव्हा चार ते पाच दिवस घरून सर्व खर्च केला. त्यानंतर छावणीत जनावरं वाढत गेली. आसपासच्या सात गावांतील जवळपास साडेअठराशे जनावरं छावणीत दाखल झाली. औरंगाबाद, नगर जिल्ह्यांतून जवळपास ७० ते८० किलोमीटरवरून चारा तर ६ ते ७ किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय. दिवसेंदिवस हे अंतर वाढतच चाललंय.

दहा एकरांवरील आंबा बाग संपल्यात जमा बीड तालुक्‍यातील नेकनूर येथील महेश दाबेकर यांची दहा एकरांवरील आंब्याची बाग जवळपास संपल्यात जमा आहे. ते म्हणाले, की २००१ मध्ये जवळपास २० ते २२ प्रकारच्या आंब्यांची १०५० झाडं लावली. झाडं लावली तेव्हा जमिनीत पाणी नव्हतं म्हणून पाणी इकत आणून टाकून ती जगवली. थोडा काळ बरा गेला, पण २०१४-१५ चा दुष्काळ संकट घेऊन आला. जवळपास ४०० ते ५०० झाडं या दुष्काळात पाण्याअभावी गेली. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असताना यंदा आलेल्या दुष्काळाने तर कहरच केला. कांड्यावर मोजण्याइतकी झाडं वगळता उर्वरित झाडं संपली. उष्णतेमुळं त्यांनी तग धरलाच नाही. 

'हूर'ला बसला फटका आपल्या गुणांनी देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘हूर’ आंब्याला यंदा उत्पादनात मोठा फटका बसला आहे. बीड तालुक्‍यातील नेकनूर परिसरात या आंब्याच्या बागा व बांधावरील झाडांची संख्या मोठी आहे. हैदराबादच्या बाजारात या आंब्याला मोठी मागणी असते. यंदा हवामानाची साथ न मिळाल्याने हूर आंब्याला नेहमीपेक्षा मोहराचे व त्यानंतर आंबे लगडण्याचे प्रमाण कमी राहिले. हूरला देश पातळीवर नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सुभान पाशा म्हणाले, यंदा किमान ३० ते ४० टक्‍के ‘हूर’चे उत्पादन घटले. पाण्याचा तुटवडा हे त्यामागचे प्रमुख कारण. अजूनही संकट संपलेले नाही. लगडलेली फळं पोसण्यासाठी मिळेल तिथून पाणी उपलब्ध करून घेत किमान उत्पादन घेण्याचा प्रयत्न आंबा उत्पादकांचा आहे.

प्रकल्पांमध्ये ठणठणाट बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांत केवळ १ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत कमी साठा आहे. ८९ लघू प्रकल्प कोरडे पडले असून, २६ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. १६ मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. मांजरा, माजलगाव या दोन्ही मोठ्या प्रकल्पांत पाण्याचा थेंब शिल्लक नाही. ९ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. ६ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

प्रतिक्रिया

पारंपरिक शेतीला फाटा देऊन रेशीम शेतीकडं वळलो. पहिलं वर्ष बरं राहिलं. यंदा मात्र पावसाअभावी तुती वाळून चालली. शिवाय शेडचं अनुदान अजून मिळालेलं नाही. शेडसाठी पदरमोड केल्यानं अडचणीत वाढ झाली.

- प्रसाद आहेर, खळेगाव ता. गेवराई.

मोठ्या आशेनं लावलेली पेरूची बाग वाळून गेली. दीड एकरातलं मोसंबी काढून टाकावं लागली. यंदा विहिरीला पाणी आलंच नाही. मागच्या पाऊस काळात जे आलं तेचं. नगर परिषदेचा टॅंकर कुटुंबाला २०० लिटर पाणी देतं. भागत नाही पण इलाज नाही.  

- नानासाहेब गवारे, देवपिंप्री ता. गेवराई.

यंदा स्थिती वाईट आहे. पाण्याचा तुटवडा आहे, जनावरांच्या चाऱ्याची स्थिती गंभीर आहे. सरकारनं या दुष्काळाकडे म्हणावं तसं काही लक्ष दिलं नाही. छावणीमुळं जनावरांची सोय झाली. १२ एकरांना ८० हजार खर्च झाला. उत्पन्न फक्‍त ६५ हजाराचं झालं. खर्चसुद्धा आला नाही. कमी किमतीत तीन जनावरं इकली. - रामेश्वर बावस्कर, ब्रह्मगाव, ता. गेवराई.

दोन हेक्‍टर जमीन, झाडं हायत डाळिंबाची ते वाळून चाललेत. शेततळं हाये त्यात टाकायला पाणी नाही. पर्याय काही नाही म्हणून, आता सुरू झालेल्या रोजगार हमीच्या कामांवर दोघंबी आलो. जनावरं छावणीत घातली. सकाळच्या पहारी तो उद्योग बघायचा अन्‌ त्यानंतर रोजगार हमीच्या कामावर जायचं. प्यायला पाणी नाही, खर्चाला पैसा नाही. शासनानं कामं वाढवायला पाहिजेत. - बिभीषण वाघमारे, गायकवाड जळगाव, ता. गेवराई.

सरकी लावली ती नाही निघाली. गावात प्याला पाणी नाही, चार पाच दिवसांपासून कुटंबातील दोघांना रोजगार हमीचं काम लागलंय म्हणून कसंतरी भागतंय. ही कामं वाढायला हवीत. - अमीनाबी सय्यद, गायकवाड जळगाव, ता. गेवराई.

शेतीला खर्च केला पण हाती काहीच नाही आलं. कापूस व्हता, तइर व्हती, बाजरी व्हती, कापूस एकरी एक क्विंटल झाला. निसत देऊ म्हणले, पण दुष्काळी अनुदान नाही, विमा उतरवला पणं ते बी हाती आला नाय. कर्ज काढलं, पाउस नाय. दोन घंटे बसून नंबर लावून पाणी भरून घेतोय, काय करावं. - बाबासाहेब यादव, पांढरवाडी, ता. गेवराई. 

 तीन वर्षं झाली काहीच पीक नाही. शासनाचा काहीच आधार नाही. प्यायला पाणी नाही, जित्राबाला चारा नाही, खायला नाही. छावणीमुळं जित्राबाला आधार झाला पणं माणसाला काहीच नाही. - ज्ञानदेव हराळे, राजपिंप्री ता. गेवराई.

छावणीत जनावरं आणलेत बसतो इथं येऊन. खरिपाची काहीच तयारी केली नाही. पाऊस पडेस्तोवर तयारी पण व्हणार नाही. जवळ पैसाच नाही, त्यामुळं इकून तिकून जुळवाजुळव करूनच भागून घ्यावं लागलं. - गुलाब जुंबड, राजपिंप्री ता. गेवराई.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com