विहिरी, बोअरवेल आटल्या फळबागा जगणार कश्‍या?

मी २०१४ ला संत्र्याची लागवड केली आहे. यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च आलेला आहे. पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने बागेला पाणी पुरवू शकत नाही. त्यामुळे हा बाग टिकेल याची शाश्वती दिसत नाही. पावसाळा उशिरा आला तर झाडे तोडण्याची वेळ येऊ शकते. - चंद्रभान दलाल, संत्रा उत्पादक, जामोद, जि. बुलडाणा
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अद्याप ना पीककर्जाची तजवीज झाली ना कुठे हातऊसनवारीच्या व्यवहाराला हो मिळाला. यंदा पाऊस उशिराने येत असल्याने तयारीला थोडा वेळ मिळेल; पण हंगामासाठी पैशांची व्यवस्था कशी करावी, हा पेच न सुटणारा आहे. गेल्या वर्षात उत्पादित शेतीमालाच्या विक्रीतून खर्चही भागला नाही. या वर्षी दुष्काळ जाहीर झाला खरा पण तो निवारण्यासाठी एकही उपाययोजना आमच्या शेतशिवारापर्यंत पोचल्याचे दिसत नाही. शासनाने जाहीर केलेली दुष्काळाची मदतही मिळाली नाही. जिल्ह्यात मागील वर्षी ७५ टक्केच पाऊस पडला. त्यामुळे पीक उत्पादन कमी झाले. अनेकांना केलेला उत्पादन खर्चही निघाला नाही. विहिरी, बोअरवेल आटल्या. पाऊस येईपर्यंत पिकं जगणार कशी? शेतकरी भरभरून बोलत होते. आपल्या मनातील खदखद मांडत होते.

पिके जगवायची कशी? बुलडाणा-अकोला जिल्ह्यात विस्तारलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा प्रदेश कधी काळी जलसमृद्ध म्हणून ओळखला जात होता. आज मात्र या भागात शेतात विहीर, बोअर असले तरी शेतात जाताना प्यायचे पाणी घरून न्यावे लागते. हे सांगण्याचे कारण इतकेच की शेतशिवारातील विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. ज्यांच्याकडे पाणी आहे ते कुणाच्या शेतात दहा मिनिटे चालते तर कुणाकडे तास-अर्धा तास. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या संत्रा बागा असतील, उन्हाळ्यात भाव मिळतात म्हणून पेरलेला भाजीपालावर्गीय पिके असेल, या पिकांना पाऊस येईपर्यंत जगवायचे कसे हा पेच शेतकऱ्यांसमोर उभा असल्याचे या भागात दिसून आले. 

जनावरांना चारा-पाणी मिळणे अवघड बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ मागील तीन वर्षांपासून नागरिकांची पाठ सोडायला तयार नाही. यंदा ही दुष्काळी परिस्थिती अधिक बिकट आहे. जनावरांना चारा, पिण्याचे पाणी मिळणे अवघड आहे. जिल्ह्यातील ११ लाखांवर जनावरे यात होरपळत आहेत. चारा छावणी सुरू करण्याची मागणी होती. पण शासनाने ती पूर्ण केली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात विक्रीला येणाऱ्या जनावरांची संख्या वाढली असतानाच त्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. आता पंधरा दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे. पाऊस जर जास्त लांबला, तर जनावरांना लागणारा चारा कोठून आणावा, हा प्रश्न उद्भवणार आहे.

अर्थकारण कोलमडले सातपुड्याचा पायथा असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, अकोट या चारही तालुक्यांत मागील वर्षांत कमी पाऊस झाला. जो पाऊस पडला तो कमी दिवसांत जास्त पडून गेला. या भागात असलेल्या नदी-नाल्यांना एखाद-दुसऱ्या वेळेस पाणी वाहले. त्यानंतर पाऊस झालाच नाही. अवकाळी पाऊसही आला नाही. याचा परिणाम थेट खरीप हंगामावर झाला. जमीन सुपीक असूनही सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या खरीप पिकांची उत्पादकता जेमतेम राहली. कुणाला एकरात दोन पोते सोयाबीन झाले, तर कुणाला चार ते पाच पोते. एवढ्या पिकात तर लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्चही निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांना रब्बीत पीक घेण्यासाठी जमिनीत ओलही मिळाली नाही. तेव्हापासून शेत तसेच कोरडे पडून आहे. याचा सारा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर पडला. वर्षभराचे नियोजन कोलडमले आहे.

फळबागा जगविण्याची तगमग सातपुडा पर्वताचा हा पायथा संत्रा उत्पादनासाठी अग्रेसर समजला जातो. या पट्ट्यात किमान तीन ते चार हजार हेक्टरवर संत्रा बागा असू शकतात. एवढ्या प्रमाणात असलेले हे क्षेत्र पाण्याअभावी संकटात आहे. मोठ्या मेहनतीतून वाढविलेली झाडे सुकताना पाहिली की तगमग होते. काही शेतांमधील केळीच्या बागांचीसुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भरघोस पाणी आज कुठल्याही शेतकऱ्याजवळ नाही. अनेकजण तास-अर्धा तास मिळणाऱ्या पाण्याचा थेंबनथेंब बागेला देत आहे. पण एवढ्या पाण्यावर बागा तग धरणे शक्य नाही. यामुळे या भागातील संत्रा बागेत झाडे सुकत चालल्याचे बघायला मिळाले. फळ देण्याच्या अवस्थेत पोचलेली झाडे ताणावर सोडून शेतकरी मोकळे होत आहेत. अशीच स्थिती वाढत गेली, तर पुढचा बहर किती होईल, याची कुणालाही शाश्वती वाटत नाही.

दुष्काळपण मदतीचा पत्ता नाही या भागातील परिस्थिती सुरवातीला शासनाच्या दुष्काळी निकषांत बसली नाही. जळगाव जामोद, तेल्हारा, अकोट हे तालुके शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये सुरवातीला नव्हते. जनतेतून सातत्याने मागणी झाल्याने, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने शासनाने दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला. परंतु या दुष्काळी गावांसाठी अद्यापही निधीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची वाट पाहावी लागते आहे. 

पीकविम्याचाही दिलासा नाही या भागातील पीक उत्पादन मागील काही हंगामांपासून सातत्याने घटते आहे. अशा परिस्थितीत पीकविम्याची मदत मिळणे शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरले असते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. ज्यांना जाहीर झाला ती विमा रक्कम शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या बरोबरीची आहे. याविरुद्ध जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मोठा जनआक्रोश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विमा मिळण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली असून, यासाठी शेतकऱ्यांकडून विनंती अर्ज जमा केलेत. एकट्या संग्रामपूर तालुक्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढ्यासाठी व पीकविमा मिळण्यासाठी विनंती अर्ज स्वाभिमानी संघटनेकडे दिले, यावरून लोकभावना किती तीव्र आहेत हे स्पष्ट झाले.

पीककर्जाचेही त्रांगडे आगामी हंगाम तोंडावर येऊनही अद्याप जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात पीक कर्जवाटपाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला नाही. जिल्हा बँकेची स्थिती चांगली नसल्याने पीक कर्जवाटपाचा भार पुन्हा एकदा राष्ट्रीयीकृत बँकांवर आहे. या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करून जाणीवपूर्वक पीककर्ज देत नसल्याचा आरोप दरवर्षी होत असतो. काँग्रेसने गेल्याच आठवड्यात या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक बँक शाखेसमोर धरणे देत शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न देता पीककर्ज वाटप करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

दुसरीकडे अद्याप पीक कर्जवाटपाची स्थिती फारशी चांगली नाही. बँकाकडून प्रकरणे मंजूर केले जात नाहीत. दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या कर्जमाफीत या भागात माफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांनी नंतरच्या काळात कर्ज न भरल्याने ते थकीत झाले. शिवाय कर्जमाफी होऊन गेल्या वर्षात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा ते परत न केल्याने तेही थकबाकीदार झाले आहेत. या दोन्ही थकबाकीदारांना या वेळी बँकांकडून कर्ज मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. 

प्रतिक्रिया

दुष्काळ जाहीर होऊन चार महिने झाले तरीही मदत नाही. या वर्षी दुष्काळाची दाहकता अधिक जाणवत आहे. या भागात सिंचनासाठी कुठलाच मोठा प्रकल्प उभारला गेला नाही. गेल्या हंगामात तीनच वेळा या भागात पाऊस झाला. शासनाने दुष्काळी यादीत पहिल्यांना या तालुक्याचा समावेश केला नाही. जनतेच्या मागणीनंतर समावेश करून आता चार महिने झाली. परंतु दुष्काळाची कुठलीही मदत या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. - रमेश बानाईत, शेतकरी तथा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, जामोद

१९७२ नंतर हा दुसरा मोठा दुष्काळ पाहत आहे. त्या वेळी एवढी झळ बसली नाही. आजची परिस्थिती खूप बिकट आहे. आम्ही संत्र्याची २५० झाडे लावली आहेत. चार वर्षांची ही बाग असून सध्या द्यायला केवळ आठ मिनिटेच विहिरीतून पाणी मिळते. एवढ्या पाण्यावर ही बाग उभी आहे. दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च केला आहे. विहिरीची ११० फूट खोल पातळी गेली. या वर्षी ही बाग फुटली असती; पण आता शक्य दिसत नाही. दुष्काळ असतानाही कुठलीही मदत शासनाकडून मिळालेली नाही.  - लक्ष्मणराव काटोले, अशोक काटोले, रा. जामोद, ता. जळगाव, जि. बुलडाणा

माझ्याकडे चार एकर शेती आहे. गेल्या वेळी कापूस, सोयाबीन-तूर पेरली होती. पण लावलेलाही खर्च निघाला नाही. आता बँकेतून पैसे मिळाले तर पेरणी करू अन्यथा काहीच सोय नाही. आम्हाला कर्जमाफीही मिळालेली नाही. दुष्काळ निधी, पंतप्रधान सहायता निधी यापैकी कुठलीच मदत आमच्यापर्यंत आलेली नाही. - ज्ञानेश्वर अंबडकार, शेतकरी जामोद जि. बुलडाणा

माझ्याकडे सात एकर शेती आहे. मी गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते. पण पीक न झाल्याने कर्ज भरू शकलो नाही. आता थकीत आहे. पूर्वी आमची शेती बागायती होती. आता पाणीच नसल्याने कोरडवाहू शेतकरी झालो आहे. पैसे नसल्याने पेरणीचा मोठा पेच समोर उभा आहे. - देविदास दामधर, शेतकरी, जामोद.

अडीच एकर शेती असून, चार वर्षांपूर्वी संत्र्याची ३०० झाडे लावलेली आहेत. आता पाणी नसल्याने कॅनने पाणी द्यावे लागत आहे. दुष्काळात तरी शासनाची मदत मिळायला पाहिजे. शासनाने मदत न केल्यास शेतकऱ्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे.   - प्रकाश भीमराव मारोटकार, रा. रामापूर ता. अकोट जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com