ऐन पावसाळ्यातही जत तालुक्याचा सामना दुष्काळाशी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जत, जि. सांगली  ः ऐन पावसाळ्यातही जत तालुक्‍याला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. जुलैअखेर हलका पाऊस झाला. मात्र खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या आहेत. आजही तालुक्‍यात ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आठ हजार जनावरे चारा छावण्यांमध्ये दाखल आहेत. ही स्थिती बघता पूरग्रस्तांप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी व रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने जत तालुक्‍यातील शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्‍यातील हक्काचा खरीप हंगाम वाया गेला आहे. दरवर्षी बाजरी व कडधान्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या जत तालुक्‍यात यंदा जवळपास पेरा झालेलाच नाही. तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मिमी आहे. आज अखेर १६८. ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रिमझिम पावसाने खरिपाला दिलासा मिळाला, मात्र मोठा पाऊस न झाल्याने पेरा वाया जाणार आहे. 

मागील वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला. तालुक्‍यात जानेवारीपासून टॅंकर सुरू झाले आहेत. यंदा टॅंकरने शंभरी गाठत ११८ संख्येपर्यंत मजल मारली होती. सध्या तालुक्‍यात ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्‍यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे त्या भागातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. मात्र आठ दिवसांत पाऊस न झाल्यास येथे पुन्हा टॅंकर सुरू करावे लागतील. 

एकवीस चारा छावण्या सुरू  मे अखेरला तालुक्‍यात चारा छावण्या सुरू झाल्या. ३० चारा छावण्यांमध्ये १६ हजार ५५३ जनावरे दाखल झाली होती. त्यातील तालुक्‍यातील जत, उमदी, मुचंडी, बाज, व्हसपेठ, करेवाडी तिकोंडी, बिळूर, जालिहाळ बु., सालेकिरी-पाच्छपूर येथील छावण्या बंद झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली दडपशाही सुरू केल्याने लवकरच या चारा छावण्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांच्याकडे चारा नाही त्या जनावरांचे मात्र हाल होणार आहेत. तालुक्‍यात आजघडीला २१ चारा छावण्यांमध्ये आठ हजार ८३३ जनावरे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com