agriculture news in marathi, drought situation, nanded, maharashtra | Agrowon

सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनात
माणिक रासवे
शनिवार, 25 मे 2019

नांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं. त्यात यंदा एवढा दुष्काळ असून सरकारबी मदत करंना झालं. बॅंका कर्ज देईनात. अन्नधान्य, पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीपस्तोर हाती काहीच शिल्लक राहणार नाही. पहिलीच देणी थकल्यामुळे सावकार लोक दारात उभं राहू देईनात. त्यामुळं शासनाने पेरणीसाठी पैशाची मदत केली तरच यंदा चाड्यावर मूठ ठेवता येईल नाही तर शेतं काळीच राहतील, अशा व्यथा एक हंगामी पीक पद्धतीमुळे स्थलांतर हा जीवनाचा भाग झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

नांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं. त्यात यंदा एवढा दुष्काळ असून सरकारबी मदत करंना झालं. बॅंका कर्ज देईनात. अन्नधान्य, पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीपस्तोर हाती काहीच शिल्लक राहणार नाही. पहिलीच देणी थकल्यामुळे सावकार लोक दारात उभं राहू देईनात. त्यामुळं शासनाने पेरणीसाठी पैशाची मदत केली तरच यंदा चाड्यावर मूठ ठेवता येईल नाही तर शेतं काळीच राहतील, अशा व्यथा एक हंगामी पीक पद्धतीमुळे स्थलांतर हा जीवनाचा भाग झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

दुष्काळाचा शिक्का कधी मिटणार 
मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यांतील बालाघाट डोंगर रांगातील भागावर कायम दुष्काळग्रस्त पट्टा म्हणून शिक्का बसलेला आहे. त्यात यंदाच्या दुष्काळाची दाहकता दरवर्षीपेक्षा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. माळरानावरील अतिशय हलक्या, मातीपेक्षा दगड अधिक असलेल्या जमिनी आहेत. जलसंधारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न केल्यामुळे डोंगर माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी सोबत माती घेऊन वाहून जाते. पावसानंतर शेत जमिनीमध्ये दगड गोट्याची संख्या अधिक दिसते. सुपीक माती वाहून गेलेल्या बरड जमिनीवर मातीचा जेमतेम फूटभर थर दिसतो. हलक्या प्रकारच्या जमिनीमुळे खरीप पिकांसाठी सतत पाऊस आवश्यक असतो.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा : पहा video

पावसाचा खंड, कमी पाऊस यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो. या भागात अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांच्या मिळेल त्या उत्पादनावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. पाऊस बऱ्यापैकी झाला तर ज्वारी, मूग, उडीद उत्पादनामुळे घरच्या अन्नधान्याची तसेच जनावराच्या चाऱ्याची चिंता मिटते. सोयाबीनमुळे नगदी रक्कम हाती येते. तुरीला पाणी कमी पडते त्यामुळे उत्पादनाची हमी नाही. रब्बीचा पिकांचा विषय नाही. सिंचनासाठी विहीर असलेले शेतकरी गहू पेरतात. परंतु, या भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांना गहू रेशनवर किंवा विकतच घ्यावा लागतो.

स्थलांतराचे चक्र अपरिहार्यच
दरवर्षी खरिपाच्या सुगी सोबत गावशिवारातील कामेदेखील संपतात.अल्पभूधारक शेतकरी तसेच मजुरांना गाव सोडून ऊस तोडीसाठी साखर कारखाना किंवा बांधकाम मजूर म्हणून पुण्या-मुंबई या सारखी शहर गाठावी लागतात. अनेकजण परिसरातील वीट भट्टयांवर कामाला जातात. अल्पभूधारक शेतकरी, मजूर यांना दरवर्षी स्थलांतर करावेच लागते. कुटुंबातील काहीजण कामाला जातात तर काही घर सांभाळायला गावीच थांबतात. दिवाळीनंतर गाव सोडायचे आणि गुढीपाडव्याला गावी परत यायचे, असे स्थलांतराचे चक्र या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

खरिपाच्या पेरणीचे भांडवल खर्च होतेय
गावातील कामावर गेलेले शेतकरी परत गावी आलेत. कामावर काटकसर करत मुद्दाम बचत केलेली चार ते पाच हजार रुपयांची रक्कम ते खरिपाच्या पेरणीसाठी सोबत आणतात. परंतु, यंदा दुष्काळामुळे खरीप पिकांच्या उत्पादन मोठी घट झाल्याने अनेकांकडे वर्षभराची गरज भागवेल एवढी ज्वारी, डाळी नाहीत. जनावरांच्या चारा, पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे रेशनवरील गहू, तांदूळ आणि पाणी तसेच चारा विकत घेण्यासाठी अनेकांचा खर्च होत आहे. पाऊस लांबण्याचा अंदाज असल्यामुळे पेरणीसाठी ठेवलेले पैसे खर्च होत आहेत. खतांच्या किमती वाढल्या आहे. बियाण्यांसाठी सावकाराच्या दारात उभं राहवं लागण्याच्या शक्यतेमुळे अनेकजण चिंतेत आहेत. लोहा तालुक्यातील खांबेगाव, सुनेगाव, कंधार तालुक्यांत मन्याड नदी ओलांडून पुढे गेले की फुलवळ, अंबुलगा, शेल्लाळी, सावरगाव, रुई, देवईची वाडी, पेठवडज आदी गावशिवारात दुष्काळाचे चित्र अतिशय विदारक आहे. मुखेड तालुक्यातील वसंतनगर, फत्तु तांडा, गोपनरवाडी आदींसह बाऱ्हाळी, मुक्रमाबाद या भागांतील वस्त्यां, तांड्यावर भीषण पाणीटंचाई आहे. शेतामध्ये जनावरांना चरण्यासाठी पालापाचोळा, वाळलेले गवतदेखील शिल्लक राहिले नाही. पानगळ झालेल्या झाडांमुळे डोंगर राने ओसाड दिसत आहेत. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरवात होते. उन्हाच्या चटक्यामुळे सकाळ -सायंकाळी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जात आहेत.

टॅंकरच्या खेपा अनियमित
जिल्ह्यातील टॅंकरची संख्या सव्वाशेपर्यंत वाढली आहे. त्यामध्ये मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यांतील एकूण टॅंकरची संख्या ८८ आहे. भारनियमन, वाहनातील बिघाड आदी कारणांमुळे नियोजित ठिकाणी चार - चार दिवस टॅंकर जात नाहीत. टॅंकरच्या खेपा चुकत असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सरकारी मदतीची गरज
केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळ जाहीर झालेल्या देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील ३०६ गावांतील १ लाख ५५ हजार ७४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदानाची ८६ कोटी ९१ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली. परंतु, बॅंकाच्या नियोजाअभावी असंख्य शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. अन्य तालुक्यातही दुष्काळी स्थिती आहे. परंतु तेथील शेतकऱ्यांना अद्याप सरकारी मदत जाहीर केलेली नाही.

फळबागा सुकून चालल्यात
गोदावरी, मन्याड या नदीकाठच्या भागात सिंचनासाठी सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडे मोसंबी, संत्रा, चिकू, पेरू, आंबा आदी फळबागा आहेत. परंतु, या महिन्यात पाणी कमी पडत आहे. ऊन वाढले आहे. त्यामुळे नांदेड तालुक्यातील लिंबगाव, नाळेश्वर आदी गावशिवारातील फळबागा सुकून जात आहेत.

व्याजाने घेतले जातात शेतीकामांसाठी बैल
शेल्लाळी (ता. कंधार) येथील बालाजी गिते हे ज्येष्ठ शेतकरी म्हणाले, की नगदी भांडवल म्हणून अनेक शेतकरी सावकरी कर्ज घेतात. त्याप्रमाणेच कायम दुष्काळी स्थितीमुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीकामासाठी बैलजोडी खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे लोहा येथील बाजारातून एखाद्या सावकाराकडून विशिष्ट किंमत ठरवून उधारीवर सव्वापट व्याजाने शेती कामांसाठी गोऱ्हे घेऊन येतात. या जनावरांचे दाखले सावकार स्वतःकडे ठेवून घेतात. या भागातील जमिनी हलक्या असल्यामुळे कोळपणी सारख्या हलक्या शेतीकामासाठी गोऱ्हे उपयोगी पडतात. खरिपाची सुगी होईपर्यंत या लहान गोऱ्हांचा सांभाळ केला जातो. त्यानंतर माळेगावच्या यात्रेच्या वेळी सांभाळलेल्या गोऱ्हांची विक्री करून येणाऱ्या रकेमतून संबंधित सावकाराच्या कर्जाची परतफेड करावी लागते. विक्री व्यवहारातून परतफेड करण्याएवढी रक्कम न आल्यास पदरमोड करून सावकाराचे पैसे द्यावे लागतात.

प्रतिक्रिया

आमच्या भागातील जमिनी वंगाळ. त्याला नाही पाणी. येळेवर पाऊस झाला तर बरं. नाही तर वर्षभर खायलादेखील महाग. दरसाल असं होत असल्याने वैताग येतो. वावराचा बयनामा करून द्यावा वाटतो. पाऊस पडना हो. त्यामुळे वनवास आहे आमचा.
- बालाजी गिते, शेतकरी, शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड 

आमची तीन एकर जमीन आहे. सोयाबीन, ज्वारी, तूर पेरतो. पण येत नाही. एक म्हैस आहे. तिला यंदा हिरवा चारा माहीत नाही. आजवर एक लिटर दूध देत व्हती. आता अर्ध्या लिटरवर आलीय. दुधाचे तूप बनवून विकतो. ताक घरीच खातो. आठवड्याला अर्धा किलो तूप निघते. दर सोमवारी कंधारच्या बाजारात विक्री करून दोनशे ते अडीचशे रुपये येतात. त्याच्यावर कुटुंबाचा कसाबसा गाडा चालवावा लागत आहे.
- माणिक केंद्रे, शेतकरी, शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड

गरिबाची मेहनत हीच जमेची बाजू आहे. शेतात मिळतील ती कामे करतो. नाही तर वीटभट्टीवर जातो. पाणी नसल्यामुळे वीट भट्ट्या बंद आहेत. कामे नाहीत. 
- दावलराव भालेराव, शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड

चालक म्हणून एका ठिकाणी कामाला होतो. आता स्वतःचे पिकअप व्हॅन खरेदी केलीय. पाणी असल्यावर भाजीपाला बाजारपेठात पोचविण्याचे भाडे मिळेत. त्यावर धकते. यंदा दुष्काळाने गाडीचे हप्ते भरणे अवघड झालेय. 
- विक्रम गिते, शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड
 
सरपंच असताना गावाच्या भोवतलच्या माळावर सलग समतल चर खोदले. त्यामुळे खालच्या बाजूच्या विहिरींची पाणीपातळी वाढली. या भागातील गावातील दुष्काळ हटविण्यासाठी जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने केली पाहिजेत.
- कोंडिबा गिते, माजी सरपंच, शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड

पाणीटंचाई असून गावात टॅंकर सुरू नाही. दुष्काळी मदत पण अजून मिळाली नाही. बॅंका कर्ज देईनात. हातात पैसे असल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवता येणार नाही. सरकारने मदत करावी. 
- गणेश गोपनर, गोपनरवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड

पाणीटंचाईमुळे अनेकजण तांडा सोडून गेले आहेत. सध्या शंभर - दीडशेची वस्ती आहे. एकदिवस आड येणारे पाण्याचे टॅंकर चार दिवसांनी आले. पाण्याअभावी हाल होत आहेत.
- दत्ता पवार, फत्तू तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड

निघाल ते साल दरवर्षी सारखंच आहे. कर्जमाफी मिळाली नाही. पहिलं कर्ज भरा म्हणत्यात. मग नवीन कर्ज देऊ म्हणतायत. यंदा शेतकऱ्यांची कर्ज भरायसारखी स्थिती आहे का? 
- एकनाथ पौळ, शेतकरी, खांबेगाव, ता. लोहा, जि. नांदेड

दोन महिने झालेत खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची वर्दळ कमी झाली आहे. फक्त आठवडे बाजाराच्या दिवशी ती काय थोडे ग्राहक दिसतात. पाणी विकत घ्यावे लागत आहे. खर्च वाढला आहे. यंदा व्यवसायात २५ ते ३० टक्के घट आहे.
- शेख मोईन, हॅाटेल व्यावसायिक, लोहा, जि. नांदेड
 

इतर बातम्या
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्य बॅंक प्रकरणात मोहिते पाटील, सोपलसोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
विश्वी येथे शेतीशाळेत मिळताहेत...बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा...