जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचन उपलब्ध : मुख्यमंत्री

दुष्काळी उपाययोजनांमध्ये ‘जलयुक्त’ची कामे चांगल्या पद्धतीने झाली असल्याने जिल्ह्यातील ७५८ गावे जलस्वयंपूर्ण झाली आहेत. २९४ गावांत ‘जलयुक्त’ची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसात खंड पडला असला, तरी या कामांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन उपलब्ध झाले असल्याने पिके वाचली आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
अमरावती येथे आढावा बैठक
अमरावती येथे आढावा बैठक

अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, धडक सिंचन विहिरी आदी योजनांमधून चांगली कामे झाल्यामुळे कमी पर्जन्यमान असूनही शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन मिळू शकले. ही कामे अधिक व्यापक करण्यात येतील. तथापि काही तालुके या कामांमध्ये अद्यापही मागे आहेत. त्यांनी कामाला गती द्यावी आणि येत्या दोन महिन्यांत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  

राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (ता. १४) अमरावती येथे घेतला. या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, अरुण अडसड, डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान आवास योजनेत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. योजनेतील प्रगती पाहता जिल्हा लवकरच पहिल्या क्रमांकावर जाईल. असे असले तरी काही योजनांमध्ये कामे रेंगाळली आहेत. प्रामुख्याने ग्रामसडक योजनेतील कामांची प्रगती संथगतीने होत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून २०१९ मध्ये घळभरणी होणार आहे. बळिराजा योजनेत जिल्ह्यातील १८ प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे ९७४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ७८ टक्के पाऊस झालेला आहे. मात्र पावसाच्या खंडामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यात कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाचा समावेश होऊ शकतो. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचे निकष यावर्षीपासून बदलण्यात आले आहेत. या अवर्षणाच्या स्थितीमध्ये पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८८ साठवण तलाव, ४८७५ शेततळी, २८४३ नरेगाच्या विहिरी, ९१६३ धडक सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बळिराजा जलसंजीवनी योजनेतून जिल्ह्यात १९०० कोटी खर्चून १८ प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यामुळे सुमारे २२ हजार ३४१ हेक्टर सिंचनाखाली येईल. संत्रा प्रक्रिया प्रकल्प, बेलोरा विमानतळ विकासासाठी मान्यता देण्यात आली आहे. चिखलदरा येथे स्कॉय वॉक आणि पाणी पुरवठा योजना सिडको मार्फत पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com