केंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री

औरंगाबाद येथे आढावा बैठक
औरंगाबाद येथे आढावा बैठक

औरंगाबाद  : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, महापालिकांचे विषय आदींबाबतची आढावा बैठक बुधवारी (ता.१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६ टक्‍के पाऊस पडला आहे. ६५ पैकी २९ मंडळांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. १६० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान २५ दिवस व त्यानंतर आतापर्यंतच्या काळात ५३ दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे संभाव्य स्थितीचा आढावा घेतला असता ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील २७१ गावांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.

जानेवारी ते मार्चदरम्यान त्यामध्ये आणखी शंभरावर गावांची भर पडू शकते. त्यानंतर यंदा जिल्ह्यातील किमान पाचशेवर गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो अशी स्थिती आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ५८ टक्‍के कपाशी, २७ टक्‍के मका तसेच बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. पावसाच्या अनियमिततेचा उत्पादनावर परिणाम होणार हे स्पष्टच आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आवश्‍यकतेनुसार मदत, विम्याचा परतावा देण्याची तयारी शासनाने केली आहे.

पिण्याच्या पाण्याचे नियोजनासंदर्भात निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा आधार देणारा असला तरी मध्यम प्रकल्पांची स्थिती दिलासा देणारी नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ५७५ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. नव्याने १२६ योजना मंजूर केल्या आहेत. मुद्रा योजनेंतर्गत ३ लाख ७० हजार लोकांना १८७२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या २०१७ अर्जांपैकी ९८ टक्‍के अर्ज मंजूर आहेत. बळिराजा योजनेंतर्गत पाच लघुसिंचन प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात १० हजार २०० शेततळी पूर्ण झाली आहेत. दुष्काळी भागात त्याचे सकारात्मक परिणाम पाहून आणखी दहा हजार शेततळी देण्याचे नियोजन सुरू आहे.

जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानात निकृष्ठ काम करणाऱ्यांकडून वसुली करण्यासह गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी पावसामुळे कमी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, कचरा प्रश्न आदी विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन संबंधीत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com