पीक कापणी प्रयोग अहवालानंतर दुष्काळाबाबत घोषणा ः मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू असून त्यांचा अंतिम अहवाल अाल्यानंतर ३१ अाॅक्टोबरला टंचाईसदृश स्थिती जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दुष्काळी परिस्थिती तसेच विविध योजनांचा आढावा सोमवारी (ता. १५) श्री. फडणवीस यांनी बुलडाणा येथे घेतला. विविध विभागांच्या त्यांनी मॅरेथाॅन बैठका घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री मदन येरावार, खासदार प्रतापराव जाधव, अामदार डाॅ. संजय कुटे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर, डाॅ. संजय रायमुलकर, डाॅ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डाॅ. निरुपमा डांगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की बुलडाणा जिल्ह्यात या हंगामात ६९ टक्के (४६० मिलीमीटर) पाऊस पडला. जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान तर ५० मंडळांमध्ये ५० ते ७५ अाणि २९ मंडळात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला. केवळ दोन मंडळांतच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. जून महिन्यात २२ दिवस, जुलैत १८, अाॅगस्टमध्ये २३ अाणि सप्टेबंरमध्ये २५ दिवस पावसात खंड पडला होता. यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांना फटका बसला अाहे. प्रकल्पांमध्येही पुरेशाप्रमाणात पाणीसाठा नाही. मोठ्या धरणांमध्ये केवळ १० तर मध्यम व लघू प्रकल्पांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक अाहे.

केंद्राने दुष्काळाबाबत तंत्रशुद्ध निकष तयार केले आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात १३ पैकी ११ तालुक्यांत ट्रीगर वन अॅक्टीव्ह झाला अाहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग घेतले जात अाहेत. ३१ अाॅक्टोबरपर्यंत या प्रयोगांची एकत्रित माहिती तयार होईल. त्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाईल आणि दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी यंत्रणांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार ८७४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असून त्यांना या परिस्थितीत मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

`जलयुक्त`मध्ये चांगले काम जलयुक्त शिवार योजनेत बुलडाणा जिल्ह्यातील ७७० गावे निवडण्यात अाली होती. ६४१ ठिकाणी चागंले कामे झाली. सुमारे ७५ हजार टीसीएम जलसाठा तयार झाला. जिल्ह्यात ५००० शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात अाले होते. त्यापैकी ४७७२ शेततळे मागेल त्याला शेततळे योजनेतून पूर्ण झाली. चांगले काम झाल्याने अाणखी दोन हजार शेततळ्यांचे उद्दीष्ट वाढून देण्यात अाले. जिल्ह्यात १७५३ अपूर्ण विहिरींपैकी ६५३ कामे पूर्ण झाली. धडक सिंचन विहीर योजनेतून १३००० विहिरींपैकी ११ हजार १२५ पूर्ण झाल्या आहेत. जिगाव प्रकल्पातून जून २०२० पर्यंत २५००० हेक्टर सिंचनाचे उद्दीष्ट ठेवण्यात अाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

घरपोच दारू कपोलकल्पित राज्य सरकारने घरपोच दारुबाबत कुठलाही निर्णय घेतला नसून या कपोलकल्पीत बातम्या अाहेत. शासनाने याबाबत काहीही ठरविलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. २०० शेडनेटला तत्काळ मंजुरी बुलडाणा जिल्हा सीड हब करण्याच्या दृष्टीने अारकेवाय योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार तत्काळ २०० शेडनेट मंजूर करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com