‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’

पाण्याचा तुटवडा लय जाणवू लागलाय, आमच्याबराबर जनावरांची अवस्था वाईट झाली आहे. सरकार आमच्याकडं लक्ष देत नाही. नेमका आमचाच तालुका वगळून सरकारला काय मिळालं. - अशोक बाजीराव माने, हिरववाडी, ता. खटाव.
सातारा जिल्ह्यात दुष्काळी  स्थिती
सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती

सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक येईतोपर्यंत पाणी पुरणार नाय. पाच जनावरं हायती. आता केलेला शाळवाचं पीक गुडघाबर आलं की मग जनावरांना चारा निघंल. अजूनही पियाचा पाणी पुरतंयच पण लवकरच टॅंकरचं पाणी पियाव लागणार. माणसाचं कसंतरी चालून जायल; पण जनावरांचं कस हुईल म्हणून हाय ती पाणी शाळवाला देतोय. जनावरं जगवायची धडपड सुरू हाय, अशी व्यथा ठोकळवाडी (ता. खटाव) येथील वयोवृद्ध शेतकरी पारूबाई जाधव व त्यांचा मुलगा रमेश जाधव यांनी सांगितली.

पाच तालुक्यांत कमी पाऊस सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. याचा सर्वाधिक फटका माण तालुक्यातील नागरिक सहन करीत आहे. त्यानंतर खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या तालुक्यांचा समावेश होतो. मात्र सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीत खटावचा समावेश नसल्याने येथील शेतकरी नाराज झाले आहे. कुठेतरी एका भागात पाऊस झाला आणि सर्व तालुक्यास वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत. नव्या यादीनुसार गंभीर दुष्काळाच्या यादीत फक्त माण तालुक्याचा तर मध्यम दुष्काळाच्या यादीत कोरेगाव व फलटण या तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील पाचही तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. या तालुक्यात दिवसेंदिवस टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

जनावरांच्या चारा, पाण्याची काळजी जिल्ह्यात सध्या माण, खटाव व कोरेगाव या तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या तीन तालुक्यांतील २६ गावे व १३८ वाड्या-वस्त्यांवरील ३८ हजार ३१० नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ऐन दिवाळीत टँकरची वाट बघत महिलांना सण साजरा करावा लागला आहे. सध्या माण तालुक्यात सर्वाधिक २१, खटाव तालुक्यात तीन, तर कोरेगाव तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवाळीत ही परिस्थिती तर ऐन उन्हाळ्यात पाण्याची स्थिती काय होईल, या भीतीने ग्रामस्थ कासावीस झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मिळेल; मात्र शेती, जनावरांचा चारा व पाण्याची काळजी लागून राहिली आहे. मागच्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती बरी होती. या वर्षी जलसंधारणाची कामे झाली, मात्र पाऊस नसल्याने कामे होऊनही टंचाई वाढ झाली आहे. कामे झाली असली तरी पाऊस झाला नसल्याने या कामांची उपयुक्तता सध्या नाही.

खटाव तालुक्यात काळी दिवाळी जिल्ह्यात टंचाई स्थितीत माण तालुक्यानंतर खटाव तालुक्याचा नंबर लागतो. हे दोन्ही तालुके शेजारीच असल्याने पावसाचे प्रमाण सारखेच राहते त्यामुळे टंचाईची स्थिती सारखीच असते. सरकारने दुष्काळाच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश न केल्याने येथील जनता संतप्त आहे. खरिपात पिके हाती लागली नाहीत. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे आतापर्यंत पुरेसे होते. मात्र आता टंचाई जाणवत असताना सरकार हात काढून घेतल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारच्या निषेधार्थ या तालुक्यातील बहुतांशी भागात काळी दिवाळी म्हणजेच गोडधोड न खाता खरडा भाकरी खाऊन आंदोलन करत साजरा केली.

अनेक घरांच्या दारात बॅरेल जिल्ह्यात २०१२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाप्रमाणे सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. माण, खटावमध्ये अनेक घरांच्या दारात बॅरेल दिसू लागले आहे. टॅंकर आला की बॅरेल भरून ठेवण्यासाठी हातची कामे सोडून महिला व शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भीषण होऊ लागेल तसतशी या बॅरेलच्या संख्येत भर पडणार आहे.

पाण्यासाठी लाखोंचा खर्च पिके वाचविण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकरी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करीत आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये रब्बी हंगाम प्रमुख असल्याने रब्बी ज्वारीचा (शाळू) ओलीवर पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासह शेतकऱ्यांनी कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. पाऊस नसल्याने जलसाठे कोरडे पडू लागले आहेत. यामुळे विहिरी व बोअरवेलमधील पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. फळबागांसाठी टँकरने पाणी आणले जात आहे. विहिरीच्या खोलीत वाढ करणे, तसेच वाटेल त्या ठिकाणी नवीन बोअरवेल मारण्याची कामे सुरू आहेत. ३०० ते ५०० फूट खोलीच्या बोअरवेल मारल्या जात आहेत. एकच आशा पाणी लागेल आणि पिके जगतील.  

मंदीत संधी   भूगर्भात किती पाणी आहे आणि ते कुठे आहे हे दाखविण्यासाठी दुष्काळी तालुक्यात स्वंयघोषित पाणडे फिरत आहे. शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेण्याचे काम पाणाड्यांकडून सुरू असल्याचे दिसत आहे. बोअरवेलची गाडीच्या दिशेवर लक्ष ठेवून हे काम साध्य केले जात आहे. पाणी लागेल पीक, जनावरांचे भागेल या आशेवर शेतकरीदेखील मागे पुढे न पाहता खर्च करीत आहेत. जमिनीत पाणी लागतेय, नाही लागत याची जबाबदारी न घेताच पाण्याचा पॅाइंट दाखविण्यासाठी एक ते दोन हजार रुपये घेतले जात आहे. या दुष्काळतही पाणड्यांकडून मंदीत संधी शोधण्याचे काम सुरू आहे.

स्थलांतर सुरूच पाणी मिळणार नाही त्यामुळे जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगाविण्यासाठी अनेक कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक कुटुंबांचा समावेश आहे. खूपच टंचाई झाली तर जनावरांसाठी छावण्या सुरू होतात. मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी होत नाही, तसेच शेळ्या-मेंढ्या चराई करण्यास सोडणेही आवश्यक असते. यासाठी अनेक कुटुंबे कृष्णा काठाकडे जाऊ लागली आहे. ‘‘३० मेंढ्या घेऊन कृष्णा काठावर जातूया, मिरगाचा पाऊस पडला तर नाहीतर पुढच्या दिवाळीलाच माघारी यावं लागणार,’’ असे पुकळेवाडी येथील सविता पुकळे सांगतात.     पाऊस झाला नसल्यानं दहा एकर जमीन पेरणीवाचून पडून ठेवली आहे. निसर्ग आमच्यावर कोपला आहे. एकीकडे पाऊस नाही, तर दुसरीकडे चोऱ्यांचे प्रकार सुरू झाले आहेत. मागच्या माहिन्यात दोन दुभत्या म्हशी कुलूप तोडून चोरट्यांनी नेल्या, असे विखळे (ता. खटाव) येथील शेतकरी भगवान देशमुख यांनी सांगितले.   कशीतरी दिवाळी झाली. आता मेंढ्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कृष्णा काठावर जायचंय. चाळीस पन्नास मेंढ्या सांभाळायसाठी घराला कुलूप लाऊन निघालोय. पाऊस झाला तर माघारी व नायतर पुढच्या दिवाळीलाच गावाला येणार, असे पुकळेवाडी येथील शेतकरी अनसूया हरिबा पुकळे यांनी सांगितले.   दोन एकर शाळू पेरलाय, तो जगविण्यासाठी पाणी देतूया. एक पाणी कसंतरी पुरंल. शाळवाचं उत्पादन मिळणार नाही, पण जनावरं जगली पाहिजे यासाठी चारा म्हणून वापरायाचे, असे ठोकळवाडी (ता.खटाव) येथील शेतकरी रमेश जाधव यांनी सांगितले.   मला सात एकर शेती हाय, त्यामधी दोन एकर कांदा व काही शाळू पेरलाय. पाण्यासाठी आतापर्यंत सहा बोअरवेल मारल्या आहे. कांदा चांगला आला, पण पाणी कमी झालं. म्हणून आता सातवी बोअरवेल मारतोय. पाणी लागलं तर कांदा, नाही तर कांदा बी जाणार असे पांढरवाडी (ता.माण) शेतकरी दादासाहेब सीताराम पवार यांनी सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com