शिरूरमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र

जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे सध्या बंधारे व नद्या कोरड्या आहेत. पाण्याचे व्यवस्थापन झाले नसल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता उपलब्ध असणारे पाणी पिण्यासाठी सोडावे. शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात चारा छावणी सुरू करण्यात यावीत. - पोपटराव गावडे, माजी आमदार.
कोरडे पडलेले घोड नदीचे पात्र
कोरडे पडलेले घोड नदीचे पात्र

टाकळी हाजी, जि. पुणे  ः शिरूर तालुक्‍यात पश्‍चिम भागात कुकडी व घोडनदी कोरडी पडल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कुकडीला सोडलेले पाणी जांबूत गावाला मिळाले नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

या वर्षी पावसाने दडी मारल्याने नोव्हेंबर महिन्यापासून पाण्याची गंभीर समस्या जाणवू लागली आहे. मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, शास्ताबाद, लाखेवाडी, खैरेनगर या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे फेब्रुवारीपासून या भागाला टॅंकरची उपलब्धता करून देण्यात आली होती. कान्हूर मेसाई येथे ग्रामस्थांनी पाणी योजना आणल्याने तेथील टॅंकर बंद करण्यात आला. येथे पाण्याची उपलब्धता झाली नसून, येथे पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान या भागात चारा छावणी सुरू झाल्याने जनावरांची पाणी व चाऱ्याची सुविधा झाली आहे. पाण्याचे टॅंकर सुरू राहावेत यासाठी नागरिक पुन्हा मागणी करू लागले आहे. 

कुकडी नदीला पाणी सोडण्यात आले होते. या ठिकाणी जांबूत, सरदवाडी, माळवाडी या गावांना मात्र या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. नदीला पाणी सोडले असताना देखील या गावापर्यंत पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ऊस व फळबागा सुकून गेल्या असून जनावरे सांभाळायची कशी अशी चिंता या भागातील नागरिकांमध्ये आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून जांबूत गावाला पाणी दिले नसल्याची तक्रार सरपंच डॉ. जयश्री जगताप यांनी केली आहे. घोडनदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंबेगाव भागात बंधाऱ्यांना असणारे पाणी पिण्यासाठी का होईना शिरूर तालुक्‍याला सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com