agriculture news in marathi, drought situation in solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं खपाटीला 
सुदर्शन सुतार
गुरुवार, 23 मे 2019

सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी बायाबापड्यांची सुरू असलेली भटकंती, चारा-पाण्याअभावी पोटं खपाटीला गेलेली जनावरं आणि इथून-तिथून सगळीकडे ओसाड रानं, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचे हे विदारक चित्र सध्या मैला-मैलावर पाहायला अन अनुभवायला मिळते आहे. सलग तीन वर्षे पाऊस वाकुल्या दाखवत आहे. शेतात पिकलंच न्हाई, तर खाणार काय? आमच्यापेक्षा जनावरांचे हाल तर लई बेकार हायेत, अशा शब्दांत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. दुष्काळाची ही होरपळ आता सोसवत न्हाई हो, अशी आर्तताही शेतकरी व्यक्त करत आहेत, यावरून दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. 

सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी बायाबापड्यांची सुरू असलेली भटकंती, चारा-पाण्याअभावी पोटं खपाटीला गेलेली जनावरं आणि इथून-तिथून सगळीकडे ओसाड रानं, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचे हे विदारक चित्र सध्या मैला-मैलावर पाहायला अन अनुभवायला मिळते आहे. सलग तीन वर्षे पाऊस वाकुल्या दाखवत आहे. शेतात पिकलंच न्हाई, तर खाणार काय? आमच्यापेक्षा जनावरांचे हाल तर लई बेकार हायेत, अशा शब्दांत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. दुष्काळाची ही होरपळ आता सोसवत न्हाई हो, अशी आर्तताही शेतकरी व्यक्त करत आहेत, यावरून दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. 

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या दोन वर्षांत रब्बी हंगाम कोरडाच गेला आहे. खरिपातही परिस्थिती फारशी चांगली होती असे नाही, जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण त्यापैकी अवघा २०० मिलिमीटरही पाऊस यंदा होऊ शकलेला नाही. जेमतेम केवळ ३८ टक्के इतका पाऊस झाला. शिवाय तो सर्वच ठिकाणी नव्हता. त्यामुळे दुष्काळाची होरपळ अधिकच सहन करण्याची वेळ ग्रामीण भागावर आली आहे. मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांना परंपरेप्रमाणे सर्वाधिक झळ बसली आहेच. पण यंदा जिल्ह्यातील सरसकट सर्वच तालुक्‍यांत कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाचा दाह जाणवतो आहे.

विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अधिक आहे. कमी पाऊसमानामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्येच विहिरी आणि बोअरनी तळ गाठायला सुरवात केली. पुढे कसे तरी दीड-दोन महिने गेले. पण जानेवारीनंतर पाणीटंचाई अधिक जाणवू लागली. यामध्ये शेतीचा तर विषयच संपला. आज जवळपास पाच महिने झाले, पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी आणि रानोमाळ लोकांची भटकंती दिसत आहे. शाळकरी मुलांनाही सुटीचा आनंद घेता येत नाही. त्यांचा दिवस टॅंकरच्या रांगेत आणि दूरवरून सायकलवरून पाणी आणण्यात चालला आहे. मंगळवेढ्यातील गणेशवाडी, शेलेवाडी, पाटखळ, खुपसंगी, आंधळगाव, सांगोल्यातील जुनोनी, संगेवाडी, मांजरी आणि उत्तर सोलापुरातील पडसाळी, रानमसले, कारंबा, अकोलेकाटी या भागांत हे चित्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अनुभवास येते आहे.

मंगळवेढा-सांगोला महामार्गावर मंगळवेढ्यापासून आठ-दहा किलोमीटरवर गणेशवाडी हे गाव आहे. या गावात नव्यानेच श्रीराम दूध संस्थेने जनावरांची छावणी सुरू केली आहे. गणेशवाडीचेच सत्यवान चवरे, सुरेश गायकवाड, ज्ञानेश्‍वर सोलगे हे शेतकरी छावणीत जनावरांना चारा-पाणी करून गप्पा मारत बसले होते. सत्यवान चवरे यांनी चारच दिवसांपूर्वी आपल्या दोन म्हशी, दोन जर्सी आणि एक खिलार गाय या ठिकाणी दाखल केली आहे. सुरेश गायकवाड यांनी त्यांची एक गाय आणि तीन कालवडी इथे आणल्या आहेत. ज्ञानेश्‍वर सोलगे यांनी ३ म्हशी, दोन रेड्या, एक गाय आणि एक खोंड इथे आणले आहे. छावणीतील चारा-पाण्याच्या सोईबाबत शेतकऱ्यांना विचारता, सत्यवान चवरे म्हणाले, की आताशी तर छावणी सुरू झालीय, आम्हीबी आताच चार दिवसांखाली जनावरे आणलीत. पण दोन टायमाला चारा-पाणी एवस्थित मिळतंय, पर छावणी सुरू व्हायला लई उशीर झाला बघा. जनावराचे लई हाल झालं. पण करणार काय? सुरेश गायकवाड यांनीही आवंदा दुष्काळ लई बेक्कार हाय, कसं व्हणार काय ठाऊक १९७२ पेक्षाही जादा झळ या दुष्काळानं दिली बघा, असं सांगितलं. 

आपलं कायबी  हुईल ओ, पण त्या मुक्‍या जित्राबाचं हाल पाहवत न्हाई, असे म्हणत कपाळावर चिंता व्यक्त केली. ज्ञानेश्‍वर सोलगे यांनी तर काय करणार आता दिवसं ढकलायची, दुसरं काय? एवढंच उत्तर दिलं. पण आता सोसवेना ओ, पार रग काढलीय या दुष्काळानं, असं प्रत्येकाच्या बोलण्यातून येत होतं. 

४० टक्के क्षेत्रावरील बागा होरपळल्या
जिल्ह्यात फळबागाचे क्षेत्र जवळपास ९४ हजार हेक्‍टरपर्यंत आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार हेक्‍टरवर डाळिंबबागा आहेत. त्यानंतर १५ हजार हेक्‍टरवर द्राक्षबागा आणि अन्य क्षेत्रावर केळी, सीताफळ, पेरू आदी फळांचा समावेश आहे. फळबागांच्या या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ४० टक्के क्षेत्रावरील बागा सध्या जळून गेल्या आहेत. सांगोला, मंगळवेढा भागातील अनेक शेतकऱ्यांनी बागांसाठी  शेततळी उभारली आहेत. पण पाऊसच नाही, तर शेततळ्यात पाणी कुठे? त्यामुळे यंदा आंबिया, हस्त हे बहर बहुतांश शेतकऱ्यांना धरता आले नाहीत. त्यातही डाळिंब उत्पादकांना त्याचा फटका अधिक बसला. मंगळवेढ्यातील आंधळगाव, खुपसंगी, गणेशवाडी, पाटखळ, जुनोनी भागात अनेकांनी बागा उखडून टाकल्या आहेत. सांगोल्यातील संगेवाडी, मांजरी, खर्डी या भागांतही हेच चित्र आहे. 

जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी २८२ टॅंकर सुरू आहेत. त्यातून २४६ गावे आणि १५१७ वाड्या-वस्त्यांवरील ५ लाख ५४ हजार ३४६ लोकांना पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय १५० विहिरी आणि बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच जनावरांसाठी १६६ छावण्या सुरु असून, त्यात १ लाख ५ हजार ६४६ लहान मोठ्या जनावरांची सोय करण्यात आली आहे. 

उजनी धरण उणे पातळीत; लघू, मध्यम प्रकल्पही कोरडे
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीही आता उणे पातळीत पोचली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील आठ मध्यम आणि ६० लघु प्रकल्पांतील पाणीसाठाही तळाला गेला आहे. हे प्रकल्पही कोरडे ठणठणीत पडले आहेत. उजनी धरणात सध्या ४८७ मीटर पाणीपातळी आहे. एकूण पाणीसाठा ४७.७५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा उणे २१.९१ टीएमसी इतका उरला आहे. या पाण्याची टक्केवारी उणे ४०.९० टक्के इतकी खाली पोचली आहे. 
 
शेतकऱ्यांचा दिवस छावणीत
मंगळवेढ्यातील गणेशवाडी, आंधळगाव, खुपसंगी, पाटखळ या ठिकाणी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. आंधळगावातील महालक्ष्मी दूध संस्थेच्या छावणीत सुधाकर लेंढवे यांनी आपल्या २५ गाई, म्हशी आणल्या आहेत. त्या बहुतांश दुधाच्या आहेत. रोजचे २०० लिटर दूध संकलन आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत जनावरांना चारा-पाणी करणे, धारा काढणे, तिथून दूध डेअरीला घालणे असा रोजचा नित्यक्रम सुरू आहे. त्यांचा दिवस छावणीतच सुरू होतो आणि मावळतोही छावणीतच. अंकुश डांगे हेही आंधळगावचे शेतकरी त्यांचीही परिस्थिती अशीच आहे. त्यांनीही दोन जर्सी गाई आणि एक म्हैस छावणीत आणली आहे. घरातून एकमेकांच्या भाकरी बांधून घेऊन यायच्या आणि बाकी सगळं काम छावणीतच उरकायचं, असा त्यांचा नित्यक्रम आहे. बाळू लेंढवे यांनीही त्यांची पाच जनावरे या छावणीत आणली आहेत. 

शेतकरी प्रतिक्रिया

माझी २४ गुंठे जमीन आहे. त्यात पाण्याची सोय नाही. पावसाच्या जिवावर शेती करतो. पण कशाचं शेत न काय, गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने हातात काहीच लागलं नाही. चार जनावरे आहेत. त्यांचा सांभाळ करून दुधावर कसं तरी भागतंय. पण आता त्यांचेबी हाल सुरू हायत, तीनशे रुपयानं मिळंल तिथे मजुरीला जातो. आता तेही छावणीत अडकल्यानं बुडतंय.
- सुरेश गायकवाड, शेतमजूर, गणेशवाडी, ता. मंगळवेढा.

रोजचं २०० लिटर दूध जातं. पण आता हिरवी वैरण कमी असल्यानं त्यात कमी जास्त व्हतंय. पण आता पर्याय उरला न्हाई, जनावरं छावणीत आणलीत. रोज इथंच चारा-पाणी करायचं आन धाराबी काढायच्या. पण या छावण्या मागेच चालू करायला पाहिजे व्हत्या. कारण, जनावराचं हाल तेवढं नसतं झालं.
- सुधाकर लेंडवे, दूध उत्पादक, आंधळगाव, ता. मंगळवेढा

दुष्काळी उपायातील दिरंगाई, विम्याचा घोळ यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार नसल्याने अधिकच अडचण झाली आहे. फळबागा जगवण्यासाठी टॅंकरला अनुदान देण्याची व्यवस्था यूपीए सरकारने केली होती. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अगदी जळालेल्या बागा त्या वेळी चांगल्या जगल्या. त्याच पद्धतीने या सरकारनेही मागेच असा निर्णय घ्यायला हवा होता. आज किमान काही चित्र बदललेले दिसले असते. 
- अंकुश पडवळे, प्रगतशील शेतकरी, खुपसंगी, ता. मंगळवेढा

जनावरांच्या छावण्यात सोई-सुविधा आहेत. पण चाऱ्याबाबत आणखी काळजी घ्यायला हवी. अनेक जनावरे ही दुधाची आहेत. त्यांना चांगल्या दर्जाचा आणि गुणवत्तेचा हिरवा चारा किंवा पशुखाद्य मिळायला हवे. तरच शेतकऱ्यांना या दुष्काळात हातभार लागेल. अन्यथा एकदा का जनावरांची तब्येत खराब झाली, तर कठीण होऊन बसणार आहे.
- बाळू लेंढवे, शेतकरी, आंधळगाव, ता. मंगळवेढा

माझ्याकडे पाच म्हशी आहेत. छावणीत आणल्या आहेत. चाऱ्याअभावी गेल्या काही दिवसांपासून दुधात घट झाली आहे. चारा-पाणी व्यवस्थित मिळते आहे. पण छावणी सुरू व्हायला लई उशीर झाला. मागेच ती सुरू केली असती. तर दुधात घट झाली नसती. 
- बाबासाहेब क्षीरसागर, दूध उत्पादक, कारंबा, ता. उत्तर सोलापूर

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...