agriculture news in marathi, drought situation in south maharashtra, sangli, maharashtra | Agrowon

दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलं
राजकुमार चौगुले - अभिजीत डाके
रविवार, 26 मे 2019

गावातील जलस्रोत आटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे तीन रुपये घागर या प्रमाणे पाणी विकत आणत आहोत.
- माधुरी सुतार, परखंदळे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.

कोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं दुष्काळी स्थिती बघण्यासाठी सरकार आलं हुतं. सरकारनं दुष्काळ पाहिला अन् निघून गेलं. दरवर्षी दुष्काळात सरकार येतं अन् जातं. त्यांना आमचा भाग म्हंजी पर्यटनस्थळ वाटू लागलं हाय. या भागात याचचं दुष्काळाचं चित्र पाहायचं आणि जायचं. आम्हाला काहीतरी मदत करतील अशी आशा हुती. पण सरकार मोकळ्या हातानं आलं अन् मोकळ्या हातानंच मागं फिरलं. मदतीचं आश्वासन बी नाय दिलं, अशी व्यथा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली. 

तीव्र उन्हात पाण्यासाठी धडपड
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत सध्या तीव्र दुष्काळी स्थिती आहे. योजनांचे पाणी ज्या गावात गेले नाही त्या गावात बिकट अवस्था आहे. तीव्र ऊन आणि या रणरणत्या उन्हात एकेक घागरी पाण्यासाठी चाललेली धडपड असे अस्वस्थ करणारे चित्र गावोगावी दिसते. 

चारा छावणीने दिला दिलासा...  पहा video

बालपण चालले पाणी आणण्यात 
दुष्काळग्रस्त भागात जात असतानाच सकाळी आठ वाजताच कवठेमहांकाळ - जत रस्त्यावर आबासो गडदे व वैष्णवी गडदे ही प्राथमिक शिक्षण घेणारी भावंडे सायकलला घागरी, किटल्या अडकवून पाणी आणताना दिसली. ज्या वयात खेळायचे, बागडायचे त्याच वयात सुमारे दोन ते तीन किलोमीटर वरील एका कूपनलिकेचे पाणी ते आणत होते. आई - वडील कामाला गेलेत. आम्हाला आता सुटी आहे. यामुळे दररोज सकाळी चार खेपा पाणी आणावं लागतय असे सांगत आबासो या छोट्या मुलाने पाण्याची स्थिती स्पष्ट केली. पूर्ण उन्हाळ्यात आम्हाला असे पाणी आणावे लागत असल्याचे सांगत ही भावंडे सायकल ढकलू लागली. जिथे नागरिकांचे आयुष्यच पाण्याभोवती फिरत आहे. तेथील बालपणही पाण्याच्या नादात कसे दुरावत आहे हे चित्र वेदनादायीच होते. 

जसे दुष्काळाचे चित्र अस्वस्थ करते तसे काही सुखावह मानवी प्रयत्न मनाला गारवा देतात. अर्थात ते दुर्मीळ असतात. असाच प्रयत्न संख येथील तुकाराम महाराज यांचा. तुकाराम बाबा महाराज यांनी जानेवारीपासून खासगी छावणी सुरू केली आहे. शासनाची एक रुपयांची मदत न घेता स्वखर्चाने सुमारे दोनशे जनावरांचे पालनपोषण तुकाराम महाराज यांनी स्वत:च्या जागेत केले आहे. इथे रहाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दररोज हजारो रुपयांचा खर्च सोसत महाराजांनी परिसरातील दोनशे जनावरांना जीवदान दिले आहे.

पै पाहुण्यांशी संपर्क साधून या भागातील शेतकऱ्यांनी पाहुण्यांची जनावरेही या छावणीत आणली आहेत. दहा शेळ्या आहेत. शेळ्यांचा चारा नाही. शासनाने शेळ्या- मेंढ्यांसाठी छावणी सुरू केली नाही. गावात सुरू केलेल्या छावणीत शेळ्या घेऊन आले आहे. शेळ्या- मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावी. अशी प्रतिक्रिया शोभा आवटी यांनी व्यक्त केली. वडील कल्लाप्पा शिवपुजे यांची जनावरेही संख येथे राहणाऱ्या शोभा आवटी यांनी या छावणीत आणली आहेत. 

शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डांगोरा पिटला. या योजनेअंतर्गत अनेक गावांना गेल्या काही वर्षांपासून बक्षिसे देण्यात आली. त्यांना गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ही गावे पाण्यासाठी तहानलेली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चुडेखिंडी हे असेच छोटे गाव. पूर्ण गाव दुग्ध व्यवसायावर अवलंबून. पण सध्या या गावची अवस्था बिकट आहे. चुडेखिंडीच्या माळावर चारा छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीला भेट दिली असता धडधाकट, दणकट जनावरे छावणीत दिसली.

अनेक चारा छावणीत कृश जनावरे पाहायला मिळतात. मात्र येथे एच. एफ. होल्स्टिन जातीच्या पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्या गायी दिसल्या. छावणीत योग्य व चांगले खाद्य मिळत असल्याने जनावरांचे आरोग्य चांगले असल्याचे पशुपालकांनी सांगितले. चारा नसल्याने अनेक जनावरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु छावणी झाली आणि जनावरांचा नियमित चारा मिळू लागला. याचे समाधान प्रत्येक पशुपालकांच्या चेहऱ्यावर होते. आमच्या गावात ‘जलयुक्त’ची कामे झाली. तीन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवार हिरवी झाली. परंतु गेल्या वर्षी पाऊस झाला नाही. 

माडगुळेत पाणीटंचाई 
ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांचे माडगुळे हे गाव आहे. माडगुळेला सोलापूर जिल्ह्यातील तलावातून पाणी येते. पण सध्या त्या तलावात पाणी नाही. क्रांतिवीर कै. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या बरोबर काम केलेल्या विभूते यांना सध्याची परिस्थिती उद्विग्न करत आहे. केवळ राजकीय दौरे न करता योजना पूर्ण होण्यासाठी शासनाने ग्रामस्थांच्या संपर्कात राहवे, अशी मागणी त्यांनी केली. 

संपन्न कोल्हापूरही टंचाईच्या छायेत 
कोल्हापूर जिल्ह्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. नद्यांनी वेढलेल्या जिल्ह्यातही उपसाबंदी, कोरड्या पडणाऱ्या नद्या, आटणारी धरणं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची अडचण वाढवत आहेत. विशेष करून अति पावसाचा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पश्‍चिम भागातच पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्रोत आटल्याने अनेक गावांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कोरड्या आभाळाकडे पाहत सुरू असणाऱ्या धूळवाफ पेरण्या आणि पिण्यासाठी विकतचे पाणी मिळविण्याकरिता चाललेला आटापिटा हे दृश्य अनेक गावांमध्ये दिसत आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गापासून सात किलोमीटरवर असणारे परखंदळे हे शाहूवाडी तालुक्‍यातील गाव सध्या पाण्यासाठी झगडत आहे. खासगी विहिरींनी तळ गाठल्याने लोकांना आता विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. गावात काहींच्या कूपनलिका आहेत. तर अनेक खासगी टॅंकरही आहेत. यातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. 

तीन रुपयांना एक घागर पाणी 
परखंदळे (ता. शाहूवाडी) शिवारात माधुरी सुतार या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त होत्या. तुम्ही पिण्यासाठी पाणी कोठून आणता असे विचाल्यानंतर त्यांनी पाणी विकत आणत असल्याचे सांगितले. गावातील जलस्रोत आटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे तीन रुपये घागर या प्रमाणे पाणी विकत आणत आहोत. जानेवारीपासून आम्हाला पाणी विकत आणावे लागत आहे असे सांगत त्यांनी शेतीकामास प्रारंभ केला. 

सावर्डे (ता. शाहूवाडी) येथील बळिराम रवंदे मुलाला बैलाच्या साह्याने मशागत करण्याच्या सूचना देत होते. त्यांना पाण्याच्या विषयी विचारले असता यंदाचे वर्ष खूपच अडचणीचे ठरत असल्याचे सांगितले. आम्हाला पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. टॅंकर आला की एखाद्या भागातच रिकामा हातो. टॅंकरवाल्याच्या मर्जीनुसार दुसरी खेप कधी येईल तेव्हाच पाणी मिळणार अशी स्थिती असते. यामुळे विकतच्या पाण्याच्या प्रतीक्षेतही दिवसभर थांबावे लागत असल्याची हतबलता रवंदे यांनी व्यक्त केली. 

धूळवाफ पेरण्यांवर परिणाम होणार 
सध्या पश्‍चिम भागात धूळवाफ पेरण्यांच्या तयारीची लगबग सुरू आहे. प्रत्येकवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात या पेरण्या आटोपतात. मेमधील एखाद्या वळवावर ही पेरणी होते. परंतु यंदा वळीव झाला नाही. यामुळे कोरड्या वाफशातच राने तयार करून, बांधबंदिस्ती करून शेत तयार करणे सुरू आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत वळीव आवश्‍यक असल्याचे शेतकरी पांडुरंग कुंभार यांनी सांगितले. 

उपसाबंदी बनतेय डोकेदुखी 
सध्या बहुतांशी नद्यांवर उपसाबंदी सुरू आहे. याचा मोठा फटका नदीकाठावरील शेतकऱ्यांना बसत आहे. एक तर वीज वेळेत नाही त्यात उपसाबंदी पिकांना धोकायदाक ठरत असल्याची माहिती गोगवे येथील माणिक पाटील यांनी दिली. पावसाळ्यापर्यंत उसाची वाढ करणे आता आमच्यापुढचे पहिले लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअसवर पारा आहे. शाहूवाडी तालुक्‍यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. उसाला वेळेत पाणी मिळत नसल्याने तो जगविण्याचे आव्हान असल्याचे रविकुमार कांबळे सांगतात. 

अपुऱ्या छावण्या अन्  चाऱ्यासाठी भटकंती
जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही गावे आज अक्षरश: तहानलेली आहेत. कोरडे तलाव आणि खोलवर गेलेले जलस्रोत जलयुक्त शिवार योजनांच्या यशावर ओरखडे आणत असल्याची स्थिती सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांत आहे. अपुऱ्या छावण्या आणि चाऱ्यासाठी भटकंती करणारे शेतकरी हे चित्र सांगलीत नित्याचे झाले आहे. संपन्न समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्‍यता आहे. विशेष करून पश्‍चिम भागातील दुर्गम तालुक्‍यातील वाड्यावस्त्यात बिकट स्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, ओढे, नाले आटल्याने आता अनेक गावांना विकतचे पाणी घेउन आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसते. 

धरणांमध्येही कमी पाणाीसाठा
राधानगरी, तुळशी, वारणा दूधगंगा या धरणांत सध्या केवळ वीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कासारी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे आदी प्रकल्पात तीस टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे दहा टक्‍यांनी सर्वच धरणांत पाणीसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन करणे आता ‘पाटबंधारे’पुढे आव्हान ठरले आहे.   

प्रतिक्रिया

आमच्या भागात छावणी सुरू नसल्याने ४५ किलोमीटरवरून संख येथील विनाअनुदानित छावणीत जनावरे घेऊन आलोय. ही छावणी जानेवारीत सुरू झाली आहे.
- कलाप्पा शिवपुजे, बिळूर, ता. जत, जि. सांगली.

दुष्काळ निवारण करण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे. केवळ राजकीय दौरे करून दुष्काळ संपणार नाही. त्यासाठी ठोस अशी भूमिका घेणे आवश्‍यक आहे.
- मनोहर विभुते, माडगुळे ता. आटपाडी, जि. सांगली.

आमच्या गावात ‘जलयुक्त’ची कामे झाली. तीन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवारं हिरवी झाली. परंतु गेल्या वर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे मोठे संकट ओढवले आहे. यंदा गावात छावणी सुरू केल्याने किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
- विजय शितोळे, चुडेखिंडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

सांगलीतील तालुकानिहाय छावणी व जनावरांची संख्या
तालुका छावणी संख्या जनावरांची संख्या
आटपाडी  १०  ५२३८
कवठेमहांकाळ ९९७
जत    ०६ २५२५ 

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...