गेल्या चार वर्षापासून दुष्काळ आहे...

दुष्काळाने बेरोजगारी, स्थलांतरात वाढ
दुष्काळाने बेरोजगारी, स्थलांतरात वाढ

अमळनेर, जि. जळगाव : गेल्या चार वर्षापासून दुष्काळ आहे. पेरणी केली की पाऊस नसतो. दुबार, तिबार पेरणी करावी लागते. काहीच पिकत नाही. त्यामुळे कर्ज फेडू शकत नाही. चारा आणि पाणी नाही. पशुधन वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडल्या.

जुनोने (ता. अमळनेर, जि.जळगाव) येथे केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.६)  भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. पथकात जलआयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छवी छा, डिपार्मेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्‍सेना यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत कृषी सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्‍त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील होते.

सहाशे जनावरांची विक्री शेतकरी रमेश अमृत पाटील, निंबा नथ्थू धनगर यांच्या शेतात पथकातील सदस्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली. चारा उपलब्ध नसल्याने बाहेरून चारा मागवावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी जनावरांची सोय करावी लागत आहे. काही जनावरे गोशाळेत पाठविली हेत. सुमारे ६०० जनावरे आतापर्यंत विकली गेली आहेत.

पाण्यासाठी विहीर अधिग्रहित गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बिलखेडा (ता. धरणगाव) येथील विहीर अधिग्रहित आहे. विहिरीत पाणीसाठा असेपर्यंतच गावाची तहान भागेल. त्यानंतर पाण्यासाठी भटकंती होईल. टॅंकरने पाणीपुरवठ्याची आवश्‍यकता भासेल. यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. भर पावसाळ्यात पाच ते सात गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यःस्थितीत ८८ ते ९० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी पथकाला दिली.

रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर

दुष्काळाने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरीसाठी सुमारे २२ कुटुंबे परराज्यात स्थलांतरित झाली आहेत. सुमारे १५० ग्रामस्थ कामासाठी गुजरातमध्ये गेले आहेत. १५ ते २० कुटुंबे ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात गेली आहेत. त्यामुळे गाव ओसाड पडले असून, शासनाने गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी पथकाकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com