दुष्काळी मराठवाड्याला कोकणातील पाणी वळविणार
दुष्काळी मराठवाड्याला कोकणातील पाणी वळविणार

दुष्काळी मराठवाड्याला कोकणातील पाणी वळविणार

मुंबई : पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर मंगळवारी (ता.३०) सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत; तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कारवाई करण्यास तत्त्वत: मान्यता दिली.  

आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६ अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल. पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण १४० अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

मराठवाडा हा अत्यंत अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करुन देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरू करण्यात येतील. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीखोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोचू शकणार आहे. 

पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. या खोऱ्यातील १०० अब्ज घनफूट पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांसाठी वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार गोसीखुर्द प्रकल्पातून स्थानिक नियोजनाला बाधा न आणता वैनगंगेचे अतिरिक्त वाहून जाणारे ६३ अब्ज घनफूट पाणी, अवर्षणप्रवण क्षेत्रात ४२७ किलोमीटर लांबीच्या जोड कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने ४० मार्गस्थ साठे भरले जाणार आहेत. त्यासाठी एकूण ६ उपसा स्थळांतून १५५.२५ मीटर उंचीपर्यंत उपसा करणे प्रस्तावित आहे. 

‘नदीजोड’साठी स्वतंत्र मुख्य अभियंता दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र तीन महामंडळात विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वय व एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करून हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com