पाण्याअभावी २७०० डाळिंब, पेरूच्या झाडांची राख

औरंगाबाद : दुष्काळी स्थितीमुळे डाळिंब बागेची झालेली अवस्था सांगताना फेरण जळगाव येथील अनिल शेंडे.
औरंगाबाद : दुष्काळी स्थितीमुळे डाळिंब बागेची झालेली अवस्था सांगताना फेरण जळगाव येथील अनिल शेंडे.

औरंगाबाद : यंदासारखं साल आलचं नाही. पाणीप्रश्न गंभीर, जनावरांचे हाल तर इचारूच नका. किमान सहा ते सात वर्षे तरी डाळिंब, पेरूच्या बागेने चांगली साथ दिली असती. पण, पाणी नसल्याने २७०० डाळिंब व पेरूची झाडं काढून टाकावी लागली. कारण, इतकंच की पाणी आणणं शक्‍य नव्हतं. कुणाही शेतकऱ्याला ते शक्‍य नाही. आसपास पाणीच नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील फेरण जळगावचे सिकंदर जाधव दुष्काळी स्थिती कथन करीत होते. त्यांच्या बागेतील पंधरवड्यानंतरही शांत न झालेली डाळिंब, पेरूंच्या झाडांची राख आता तरी शासन शेतीसाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करेल का, हा प्रश्न अधोरेखित करीत होती.  सिकंदर जाधव यांच्याकडे साडेदहा एकर शेती. संपूर्ण डाळिंब, पेरूच्या बागांनी व्यापलेली होती. पण, यंदाच्या दुष्काळाची जाधव यांच्‍या प्रयत्नाला अन्‌ बागेला जशी नजरच लागली. २००६ मध्ये श्री. जाधव यांनी ७५० डाळिंबाची झाडं लावली होती. २०१४ मध्ये आणखी १४०० झाडांची लागवड त्यांनी केली. शिवाय २००६ मध्येच पेरूचीही ५०० झाडं लावली होती. जाधव म्हणाले, की शेती करायची तर पाण्याची व्यवस्था करावीच लागते. डाळिंंब, पेरूची लागवड केल्यानं दरवर्षी पाणी लागण्याच्या आशेनं बोअर घ्यायचो. पण पाणी लागतच नव्हतं.   

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी अस्वस्थ.. पहा video... शेततळं कसबसं आधार द्यायचं तर यंदा त्यात पाणी भरता येईल एवढाही पाउस झाला नाही. विकत पाणी आणतो म्हणलं तर २५ ते ३० किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. त्याचे दर परवडणारे नाहीत. शिवाय टॅंकरच्या पाण्यावर मरणकळा सोसणारी बाग जगविण्याचा प्रयत्न केला तरी गरजेपेक्षा कमी पाणी मिळून जगविलेली ती झाडं पुढे अपेक्षित उत्पादन देतीलच याची खात्री नाही. त्यामुळे जड अंतकरणाने पंधरवड्यापूर्वी डाळिंबाची २२०० अन्‌ पेरूची जवळपास ५०० झाडं काढून टाकली. पाणी असतं तर ही झाडं काढावी लागली नसती, अन्‌ त्यांनी उत्पादनही बऱ्यापैकी दिलं असतं. आता पुन्हा एकदा चांगल्या पावसाची व त्यानंतर पुन्हा नव्यानं फळबाग लागवड करण्याचे नियोजन करणार आहे. 

‘शक्‍य नव्हतं इकत पाणी आणणं’ फेरण जळगावचे चुन्नीलाल बैनाडे गावशिवारात पहिली डाळिंबाची बाग उभी करणारे शेतकरी. पण, यंदा दुष्काळानं त्यांच्या जवळपास साडेतीन एकरातील डाळिंबाच्या बागेला जगविण्याची आशा त्यांनी सोडून दिली आहे. श्री. बैनाडे म्हणाले, की दोन ते तीन वर्षांपासून पाऊस काळ कमी होत चाललाय. यंदा तर पावसाळा झाला म्हणावं की नाही अशी स्थिती होती. पाच ते सहा महिन्यांपासून उपश्यावर असलेल्या गावशिवारातील विहिरींना आता चोवीस तासांत मोठ्या मुश्किलीनं दीड ते दोनशे लिटर पाणी येतं. ते जनावरांसाठी ठेवावं लागतं. इकत पाणी आणून बाग जगवणं मलाच काय कुणालाही परवडणारं नाही. आसपास पाणीच नाही अन्‌ मिळालं तर इकत आणावं तरी किती. खर्च होऊन बसला पणं उत्पन्न नाही. खरीप नाही, फळपीकही नाही. त्यामुळं बाग पाण्याविणा सोडून देण्याचा निर्णय घ्यावा लागला.  ‘...कर्ज होऊन बसलंय’ फेरण जळगावचेच अनिल शेंडे म्हणाले, की यंदा सहा एकरात १८ क्‍विंटल कापूस झाला. तो पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटलने विकला. मृग अन्‌ आंबिया बहराचं नियोजन यंदा कोलमडलं. दोन विहिरी अन्‌ एक बोअर पण बागेसाठी पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या तर बोअरला २०० लिटरपेक्षा जास्त पाणी मिळतं नाही. इकत पाणी आणून टाकणं शक्‍य नाही. आधीचं शेतीवर झालेला खर्च यंदा वसूल झाला नाही, उलट कर्ज होऊन बसलं. पाणीच नाही त्यामुळे बाग सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. 

‘असं साल पाहिलं नाही’ जवळपास ८० वर्षांचं माझं वय पण असं साल आपण पाहिलं नाही. कुटुंबाकडं तीन एकर शेती, त्यात विहीर. त्यातून १०० ते १५० लिटर पाणी मोठ्या मुश्किलीनं निघतं. पहिल्यांदाच असं झालं. यंदा पाच महिन्यांपासून शेतात काहीच नाही. दोन जनावरांना आजवर २५ क्‍विंटल ऊस विकत घेऊन घातला. दीड गोणी तूर झाली अन्‌ दोन चार गोण्या बाजरी. झालेली बाजरी खायला लागलं ती पुरणार नाही. यंदा शेतीत झालेला खर्च वसूल झाला नाही. तिथं आपल्या पुढच्या खर्चा अर्चाचा काय विचार करावा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यातील गेवराई बाजारचे किसन जोशी यांनी दुष्काळात शेतकऱ्यांच्या चरितार्थाचं गणित कसं अवघड होऊन बसलं ते मांडलं.  ‘असं साल पाहिलं नाही’ जवळपास ८० वर्षांचं माझं वय पण असं साल आपण पाहिलं नाही. कुटुंबाकडं तीन एकर शेती, त्यात विहीर. त्यातून १०० ते १५० लिटर पाणी मोठ्या मुश्किलीनं निघतं. पहिल्यांदाच असं झालं. यंदा पाच महिन्यांपासून शेतात काहीच नाही. दोन जनावरांना आजवर २५ क्‍विंटल ऊस विकत घेऊन घातला. दीड गोणी तूर झाली अन्‌ दोन चार गोण्या बाजरी. झालेली बाजरी खायला लागलं ती पुरणार नाही. यंदा शेतीत झालेला खर्च वसूल झाला नाही. तिथं आपल्या पुढच्या खर्चा अर्चाचा काय विचार करावा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यातील गेवराई बाजारचे किसन जोशी यांनी दुष्काळात शेतकऱ्यांच्या चरितार्थाचं गणित कसं अवघड होऊन बसलं ते मांडलं.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com