Agriculture news in Marathi Drowned Ran Deva, carried away Shivar ... | Agrowon

बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...

राजकुमार चौगुले
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रसरसून फुललेलं शिवार आता पार ओलंचिंब झालं आहे. अतिपावसामुळं कुजणाऱ्या भाताचा तीव्र दर्प आसमंतात भरून राहिला आहे.

कोल्हापूर :
उसवलं गणगोत सारं,
आधार कुनाचा न्हाई
भिजलेल्या भुईपरी, पाणी जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला, किरपेची ढाल दे,
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे,
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..

या कवितेतील ओळी...आजही शेतकऱ्यावर वारंवार कोसळणाऱ्या अस्मानी संकटाचं जसंच्या तसं वर्णन करतात. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जसं जावं तसं दिसणारं दृश्य नक्कीच शेतकऱ्यांच्या दुर्दैवाचा फेरा मांडणारं.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रसरसून फुललेलं शिवार आता पार ओलंचिंब झालं आहे. अतिपावसामुळं कुजणाऱ्या भाताचा तीव्र दर्प आसमंतात भरून राहिला आहे.

दसरा दिवाळीचे दिवस आणि सुगी. जिल्ह्याच्या भात उत्पादकांसाठी वर्षातला आनंदाचा कालावधी. कष्टाने फुलविलेला भाताच्या राशी घरात आणत सणांचाही आनंद व्दिगुणित करण्याचा हा काळ. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अगदी मनासारखं चाललेलं. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादनवाढीची स्वप्नं पडत होती. काढणीची जुळवाजुळव सुरु असतानाच वरुणराजाने गणित बिघडवलं. आला आला म्हणेपर्यंत संपूर्ण शिवारच जलमय करुन गेला. मुबलक धान्यराशीचं स्वप्न एका रात्रीत धुळीस मिळालं. धान्याच्या राशीऐवजी पाण्याने भरलेली शिवारं पाहावी लागली, कुजणाऱ्या भाताचा तीव्र दर्प पिकाचे भवितव्य स्पष्ट करु लागला.

हे चित्र दुःखाच्या डागण्या देणारं आहे. खरिपात एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रांवर डोलणारा पश्चिम घाटातील भातपट्टा अस्वस्थतेच्या मानसिकतेतून जातोय. कापलेला भात कुठं ठेवायचा?कसा मळायचा? या चिंतेतून उत्पादकाचे मन बाहेर येण्यास तयार नाही. दाटून येणारे पावसाचे ढग चिंता वाढवतात आणि हात द्रुतगतीने पुन्हा कापणीसाठी सुरू होतात. ओलसर डांबरी रस्त्यावर पंख्याच्या सहाय्याने भात पीक  मळणीचा केविलवाणा प्रयत्न होतोय. सुगीच्या वेळी असणार आनंददायी चित्र आता अगतिकतेत बदलून गेलं आहे.

पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव, काटेभोगाव, माजनाळ परिसर हे भाताचे आगर मानले जातात. सुगीच्या दिवसांत रस्त्यावरच चाललेल्या भाताच्या मळण्या, पिंजर यामुळे रस्ते वाहनांनी फुलण्याऐवजी भात पिंजराने फुलतात. पण यंदाचे दृष्य वेगळे आहे. रस्त्यावरुनच झुळझुळ वाहत असलेले पाणी आणि रस्त्याच्या शेजारील शिवारात तरंगणारी भात शेती पहिली की निसर्गाच्या दणक्याची प्रचिती येते. आता पाऊस थांबलाय खरा, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थांबायला तयार नाही. उरला सुरला भात मळून सुरक्षित ठेण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.

चांगल्या उत्पन्नाची आशा सोडली
माजनाळ(ता. पन्हाळा) येथील विजय मगदूम यांच्या १५ गुंठे क्षेत्रातील भातात सुमारे फूटभर पाणी होते. भात कापणीस अजून १५ दिवसांचा कालावधी होता. पाऊस ओसरल्यानंतर कापलेले पिंजर डोंगरात नेऊन वाळवण्यासाठी ट्रॅक्टर मध्ये भरत असतानाच पुन्हा पाऊस आला. कसे तरी करून भिजलेले पिंजार सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. अंदाजे २० पोती भात गृहीत धरलेला होता. आता यातून किती आणि कोणत्या दर्जाचा भात होईल हे सांगणे श्री. मगदूम यांनाही कठीण गेले.

तीन दिवसांपासून शेतातच
पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही दिवसभर शेतातच आहोत. दोन दिवस ऊन चांगले असल्याने कापणीचे नियोजन केले खरे, पण आज आलेल्या पावसाने मात्र आमची त्रेधातिरपीट उडाली. अर्ध्या एकरासाठी दहा हजार रुपयांचा खर्च आला. पावसाच्या नुकसानीमुळे उत्पादन खर्च निघणेही मुष्कील झाल्याची खंत प्रकाश जाधव या शेतकऱ्याने व्यक्त केली.

कसला विमा आणि कुठलं काय?
जादा उंबरठा उत्पादनामुळे खरीप पिक विमा योजनेच्या निकषात जिल्ह्यातील शेतकरी बसत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत फारशी उत्सुकता नाही. सहा लाख शेतकऱ्यांपैकी केवळ २२०० शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यामुळे नुकसानीचा लाभ मिळण्याची शक्यताही पावसाच्या पाण्याप्रमाणेच वाहून गेली आहे. पिक विमा योजनेत शेतकरी सहभागी नसल्याने आता शासनाने जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणे मुष्कील बनले आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसान स्थिती

  • अंदाजे पीक नुकसान- ३३३६ हेक्टर
  • फटका बसलेले शेतकरी- २४ हजार ९५१
  • नुकसानग्रस्त तालुके- चंदगड, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज
  • फटका बसलेली पिके- भात, सोयाबीन, ऊस
  • सर्वाधिक नुकसानीचे पीक - भात
  • (हा प्राथमिक अंदाज असून या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.)

इतर अॅग्रो विशेष
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...