अकोला जिल्हा परिषदेकडून ‘दूधपूर्णा’ योजना

अकोला जिल्हा परिषदेकडून ‘दूधपूर्णा’ योजना
अकोला जिल्हा परिषदेकडून ‘दूधपूर्णा’ योजना

अकोला ः जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेत अभिनव अशी योजना तयार केली आहे. ‘दूधपूर्णा’ नावाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी रविवारी ईश्‍वरचिठ्ठी टाकून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. दुधाळ जनावरे वाटपासाठी अनुसूचित जाती, जमातीच्या ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनच दूधपूर्णा नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशाने योजना आहेत. दुधाळ जनावरे वाटप ही यापैकीच एक योजना आहे. ज्या लाभार्थ्यांना ही दुधाळ जनावरे मिळतात, ते लाभार्थी अनेकदा जनावरे विकून पैसे घेतात. ‘दुधपूर्णा’ उत्पादक संघ स्थापन केल्यास याला आळा घालता येईल. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. या प्रकल्पासाठी इतर दूध उत्पादक संघाची मदत घेण्यात येणार आहे. 

समाजकल्याण विभागाच्या विविध १५ योजनांसाठी १३५२ लाभार्थींची निवड करण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण विभागाचा २००८ पासूनचा अखर्चित निधी एकत्रित करून आयुष प्रसाद यांनी ‘दूधपूर्णा’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेवर सहा कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करणारी अकोला ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरणार आहे. या योजनेतून मागासवर्गीयांसाठी जिल्ह्यात दूध पूर्णा योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून प्रति लाभार्थ्यास दोन संकरित म्हशी घ्यावयाच्या आहेत. अनुदानासह बँक कर्जाच्या रूपात भांडवल उपलब्ध होणार आहे.

अशी आहेत या योजनेची वैशिष्ट्ये 

  • दुधाळ योजनेसाठी ईश्वरचिठ्ठी काढून ५२१ लाभार्थ्यांची निवड तर १४३ लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी 
  • योजनेतून मिळणार वर्षाला किमान दहा ते बारा हजार लिटर दूध 
  • योजनेचा योग्य लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत पुढील वर्षी जनावरांचा गोठा व बायोगॅस मिळेल
  • दूधपूर्णा योजनेत प्रति लाभार्थ्यांना मिळणार ८५ हजार रुपये अनुदान 
  • योजना यशस्वितेसाठी ५२१ लाभार्थ्यांची जिल्हा उपनिबंधकांकडे दूग्ध उत्पादक सोसायटी म्हणून नोंदणी करणार 
  • अमूल दूधच्या धर्तीवर अकोला जिल्ह्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com